भारताच्या लोकशाहीपुढील धोके कोणते ?
आजच्या लोकशाही पुढील धोके काय असतील याचे जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर ते धोके आपल्याला सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ व स्पष्ट दिसतील की त्यामुळे आपण अस्वस्थ होऊ, काळजीत पडु. इतकं काही चुकीचं आपल्या डोळ्यासमोर, आपल्या आजूबाजूला घडत असताना आपण ते शांत बसून पाहतोय या विचाराने तुम्हाला झोप लागणार नाही, सांगाताहेत कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी...;
आज आपले तरुण काय करत आहेत याचा आपण कधी विचार केला आहे का ? शिक्षण घेण्याच्या वयात , स्वतःचं भविष्य घडविण्याच्या वयात आपली तरुण पिढी राजकीय लोकांची हस्तक झाली आहेत. ज्या तरुणांच्या डोक्यात ज्ञानाचा साठा असायला हवा होता त्या तरुणांच्या डोक्यात आपण देवाधर्माच्या नावाखाली जातीपातीचं विष पेरत आहोत. याचा आपण कधी विचार केला आहे का ? ज्या वयात तरुणांच्या हातात वही पेन पुस्तक असायला हवं होतं त्या वयात आपली तरुण पिढी देवाधर्माच्या नावाखाली हातात तलवारी घेऊन फिरत आहेत. हातात झेंडे घेऊन फिरत आहेत. इतर धर्मांप्रती मनांध्ये द्वेष घेऊन फिरत आहे याचा परिणाम भारताच्या लोकशाहीवर किती वाईट होणार आहे याचा कधी विचार करण्याचा प्रयत्न आपण केला आहे का ?
ज्या भारतीय संविधानाने देशाला समाजवादी लोकशाही दिली, ती लोकशाही टिकवण्याची , रुजवण्याची जवाबदारी नक्की कुणी घायची ? ही जबाबदारी इथल्या बुद्धीजीवी लोकांची नाही का ? ज्या संविधानाने सर्वांना समानतेने वागण्याचा , बोलण्याचा व समान संधीचा अधिकार दिला. स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार दिला, त्या अधिकारांचा दुरुपयोग आजचा तरुण करत आहे किंवा त्यांच्याकडून तसं वर्तन काही राजकीय- धार्मिक सनातनी विचारांच्या लोकांकडू करून घेतलं जात आहे. त्याला जवाबदार कोण आहे ? या तरुणांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न कोणी करताना दिसत नाहीये. या जातीपातीच्या धर्माच्या राजकारणात भरकटलेला तरुणाचे वर्तन लोकशाही पुढील सर्वात मोठा धोका आहे.
बुद्धिजीवी लोकांनी समाजाच्या , देशाच्या वैचारिक, मानसिक स्वास्थ्याची जवाबदारी न घेणं ही कपटी पणाची वृत्ती आहे. आजचा बुद्धिजीवी व्यक्ती हा "माझं घर, माझा परिवार , माझी मुलंबाळं त्यांचं भविष्य आणि फक्त मी" या संकोचिंत चौकटीत जगत असल्यामुळे, त्यात अडकल्यामुळे त्याने त्याच्या डोळ्यावर झापडं लावली आहेत. त्यामुळे तो विशिष्ट परिघाच्या बाहेर पाहू शकत नाहीये. तो ना समाजात काय चाललंय ते पोहतोय, ना तो ते पाहण्याचा प्रयत्न करतोय. तो इतका मस्तवाल झाला आहे, स्व सुख भोगी झाला आहे की त्याला त्याच्या देशात काय चाललंय, तरुण पिढी कशी वाया चालली आहे, देशात देवाधर्माच्या नावाखाली कसं जातीपातीचं राजकारण केलं जातंय याच्याशी त्याला काही देणं घेणंच पडलेलं नाही. बुद्धिजीवी लोकांनी स्व सुखात आनंद मानणं, स्वतःच्या घराच्या, परिवाराच्या पलीकडे लक्ष न देणं ही या देशाची त्याने केलीली सर्वात मोठी फसवणुक आहे. हा या देशाशी त्याने केलेला धोका आहे. ज्या देशात तो शिकला, लहानाचा मोठा झाला, ज्या समाजात तो वाढला, तो समाज त्या देशातली तरुण पिढी ही देवाधर्माच्या नावाखाली दंगल घडवते आहे, माणसांमध्ये जातीधर्माचं विष पसरवीत आहे, ही तरुण पिढी इथल्या सनातनी धार्मिक, राजकीय लोकांची हस्तक झाली आहे. या अशा तरुण पिढीच्या कृत्यांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असताना इथला हा बुद्धीजीवी वर्ग या तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याची जवाबदारी घेत नाही. आपल्या समाजाप्रती, देशाप्रती तो त्याचं कुठलं दायित्व स्वीकारत नाही, ही बुद्धिजीवी वर्गाची वृत्ती या देशाच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.
या देशाची लोकशाही टिकवणं रुजवणं ही बुद्धिजीवी लोकांच्या हातात व तरुणांच्या खांद्यावर आहे. हि जवाबदारी या दोघांची आहे. पण फक्त यातला एक भरकटलेल्या आहे आणि दुसरा डोळ्यांवर झापडं लावून बसला आहे. म्हणजेच "न कुछ बोलूँगा, न कुछ सुनुगा और नाही कुछ देखूंगा" या वृत्तीने जगत आहे. या देशातील तरुणांनी वाईट मार्गांनी भरकटने व बुद्धिजीवी लोकांनी कुठलीच भूमिका न घेणं हा या देशातील लोकशाही पुढील सर्वात मोठा धोका आहे.
काल-पर्वा पासून आपल्या राज्यात एक नवीनच खेळ चालू झालाय. तो म्हणजे मशिदीवरील भोंग्यावरून. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न उतरवल्यावर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केल्यापासून समाजामध्ये धार्मिक भावना भडकावून आपापसात तेढ निर्माण करण्याचा कार्यात तरुण पिढी आघाडीवर आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचा आधार घेऊन खोटी माहिती लोकांमध्ये पसरवून तरुणांच्या मनात धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे. हे इथल्या बुद्धिजीवी लोकांना स्पष्ट दिसत असूनही राज ठाकरे यांच्यावर खोटी माहिती देऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून कोणी गुन्हा दाखल केला नाही. सामाजिक तेढ निर्माण करणारे व्यक्ती सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट डोळ्यांसमोर दिसत असताना सुद्धा बुद्धिजीवी लोकांनी कुठली भूमिका नं घेणं हा लोकशाही पुढील सर्वात मोठा धोका आहे.
या देशामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले आहेत. मग तो नागरिक कुठल्याही जातीधर्माच्या असो. प्रत्येक नागरिकाला ज्याच्या त्याच्या धर्माच्या चालीरीती प्रमाणे संविधानिक मार्गाने जगण्याचं स्वातंत्र्य आहे. मग असं असताना आपल्या देशातील तरुण पिढी ही असंविधानिक का वागत आहे. याचा आपण एक सामाजिक घटक म्हणून विचार केला पाहिजे व तरुणांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, संविधानिक मार्गावर आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते केलं पाहिजे.
आज आपण आपल्या देशातील सामान्य लोकांचं वर्तन पाहतो तर एक गोष्ट निरीक्षणास येते ती म्हणजे इथली जनता आमदार, खासदार यांच्याकडून फार चुकीची अपेक्षा करते. या सामान्य जनतेला वाटते या आमदार खासदारांनी त्यांच्या लग्नकार्याला, घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याची मयत करायला यावं त्याच्या धाव्याला यावं. आणि जो या र्सव कार्यक्रमांना हजर राहील तो आमचा नेता. जो चारचौघात आमच्या गळ्यात हात घालील तो आमचा नेता. पण तो आपला नेता ज्याला आपण निवडून दिलंय तो आपल्या तालुक्याचा विकास करतोय का याची चौकशी कोण करत नाही. तो नेता आपल्या तालुक्यातील रस्ते चांगले बनवतोय का ? तालुक्यात नवीन उद्योग धंदे आणतोय का जेणेकरून तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळेल त्यांना बाहेर गावी रोजगारासाठी जावं लागणार नाही. आपण निवडून दिलेला आमदार आपल्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडतोय का ? तालुक्यातील पाण्याचा प्रश सोडवतोय का ? तालुक्यात आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणून काही करतोय का ? तर असे प्रश्न आपल्या लोकांना पडत नाहीत. सामान्य लोकांनी त्यांनी निवडून दिलेल्या आमदाराकडून वरील प्रमाणे चुकीच्या अपेक्षा ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांना त्या नेत्यांना मूलभूत प्रश्न विचारता येत नाहीये. इथला सामान्य माणूस जोपर्यंत त्याने निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर अंकुश ठेवणार नाही, त्यांना प्रश्न विचार नाही तोपर्यंत भारताची लोकशाही मजबूत होणार नाही. समृद्ध होणार नाही. जोपर्यंत व्यक्ती पूजा थांबणार नाही तोपर्यंत देशाला भवितव्य नाही. कारण ज्या वेळेस आपण या लोकप्रतीनिधींना प्रश्न विचारतो त्यावेळेस त्यांचे अंध भक्त आपल्याला दशद्रोही म्हणून लेबल लावतात. जो कोणी त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारील तो प्रत्येक व्यक्ती देशद्रोही. आणि जो कोणी त्यांच्या नेत्यांचं कौतुक करील तो देशभक्त. लोकांच्या या व्यक्तिपूजेमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. कारण व्यक्तिपूजेमुळे लोकशाही लयाला जाते आणि हुकूमशाही उदयाला येते. ही व्यक्ती पूजा लोकशाही समोरचा खूप मोठा धोका आहे.
ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो ती मीडिया २०१४ पासून बिकावू मीडिया झाल्याची परिचिती आपल्या सगळ्यांना येत आहे. ठरवलेल्या व्यक्तींची ठरवून मुलाखत घेणे , काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे आधीच ठरलं असल्यामुळे त्या मुलाखती मध्ये असलेला जिवंतपणा मरून जातो. एखादी चांगली सामाजिक घटना असलेली बातमी मीडिया दाखवणार नाही पण सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांची भाषणे ही मीडिया लाइव्ह दाखवते. मीडिया ही TRP साठी हे सगळं असे वाटते आहे. मीडियाची संशोधन वृत्ती मरण पावली आहे. ज्या संशोधन वृत्तीमुळे लोकशाहीची मुळे मजबूत होतात ती मीडियाची संशोधक वृत्ती मरण पावली आहे. ती मीडिया बिकावू झाली आहे. हल्ली तर या मीडियाचे गोदीमीडिया असे नामकरण झाले आहे. लोकांची मीडियावरून विश्वासहर्ता कमी होणे हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.
एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल पूर्वीच्या काळी चित्रपटांचा राजकारणासाठी एवढा उपयोग होत न्हवता पण हल्ली चित्रपटांचा राजकारणासाठी सर्रास उपयोग होत आहे. आत्ताच्या काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून हे आपल्या लक्षात आले असेल. चित्रपटांच्या माध्यमातून खोट्या माहिती पसरवायच्या आणि लोकमत एका पक्षाच्या बाजूने झुकवायचे. असं सर्रास चालू आहे. गेल्या दोनतीन वर्षांपासून सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट मांडणाऱ्या लोकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. जी व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलेल, धर्माच्या विरोधात बोलेल अशा व्यक्तींचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक तरी होत आहे किंवा त्यांच्यावर IT सेल च्या माध्यमातून शिव्यांचा भडिमार तरी होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांना व्यक्त होताना अडचण येत आहे. सरकार विरोधात बोलणे , त्यांच्या चुकीच्या पॉलिसी विरोधात बोलणे हा या देशातील जनतेला संविधानाने दिलेला अधिकार आहे. तो अधिकार सोशल मीडिया वापरून देत नाहीये. लोकांना त्यांचा मूलभूत अधिकार वापरू न देणे हा सविधानावर घाला आहे. मूलभूत अधिकारांच्या पायावर लोकशाहीची इमारत उभी आहे. त्या मूलभूत अधिकारांवरच जर घाला झाला तर लोकशाहीची इमारत ढासळायला वेळ लागणार नाही. मूलभूत अधिकारांवर घाला होणं ही लोकशाहीसाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे.
आज एक घटना घडली त्या घटनेने दाखवून दिले की कधी नाही एवढ्या दबावात आपली न्याय व्यवस्था आहे. आज उच्च न्यायलायत भीमा कोरेगावची केस सुनावणीसाठी होती पण उच्च न्यायालयाचे जस्टीस जाधव यांनी ही केस त्यांच्या कोर्टासमोर सुनावणीसाठी नाही असं म्हणून ती केस त्यांनी चालवली नाही. जिथे न्यायवस्थाच इतक्या दबावात असताना सामान्य माणसाने न्याय मागायचा कुठे ? सामान्य माणसाचा कोणी वाली आहे ? त्याला कोण न्याय मिळवून देणारा ? हा प्रश्न मला पडतो.
भारताची लोकशाही खिळखिळी होत असल्याची ही लक्षणे आहेत. भारताची लोकशाही जर वाचवायची असेन तर सगळ्यांना जागं व्हावं लागणार आहे. वेळोवेळी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीविरोधी एकजुटीने आवाज उठवला पाहिजे. तरच आपण लोकशाहीला वाचवू शकतो.
माझा एक स्व अनुभव सांगतो. माझ्या एका मित्राबरोबर घडलेला प्रकार. त्याचं घर गावापासून थोडं लांब व रस्त्याच्या कडेला होतं. व घराच्या आजूबाजूला जवळ कोणी राहण्यासाठी न्हवते. घराच्या पाठीमागे मोठा डोंगर व त्या डोंगराजवळ एक मोठा ओढा व झाडंझुडुपं होती. त्यामुळे रात्रीचं तिथे चोरांची भीती असायची. आणि खूप वेळा चोर आले ही होते. म्हणून त्या मित्राने गावातील ग्रामपंचायत सदस्याला सांगितले की त्याच्या घरामागे एक विजेचा खांब आहे त्या खांबावर ग्रामपंचायत मार्फत एक मर्क्युरी लावा जेणेकरून घरामागच्या जागेत व डोंगराकडे रात्रीचा उजेड राहील. त्यामुळे तिथे कोणी असेल तर दिसेल. त्यावेळेस तो ग्रामपंचायत सदस्य त्याला म्हणाला तुम्हाला ग्रामपंचायतची मर्क्युरी लाईट टाकून द्यायला तुमच्या घरात मतदान किती आहे ते अगोदर सांगा ? यावर तो मित्र काहीच उत्तर देऊ शकला नाही. निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींचं हे जे जातीपातीचं, मतदानाच्या आकड्याचं राजकारण आहे हे या देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे आणि त्याचबरोबर लोक प्रतिनिधीचं अशा मानसिकतेच्या राजकारणाचा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.
तरुण पिढीचं असंविधानिक कृत्य आणि लोक प्रतिनिधीचं मतदानाच्या आकड्याचं राजकार हे देशाच्या एकतेसाठी धोकादायक आहे, इथल्या विविधतेने नटलेल्या परंपरेसाठी धोकादायक आहे आणि त्याचबरोबर भारताच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. म्हणून भारतातल्या प्रत्येक नागरिकाने तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याने भारतीय संविधानाची प्रास्ताविका रोज वाचली पाहिजे, तिच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. जी प्रास्ताविका म्हणते की, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस; सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधान सभेत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.
या अशा पवित्र, समानतेच्या, बंधुभावाच्या, विचाराने प्रेरित असलेली ही आपल्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका तरुणांच्या मनात रुजवली पाहिजे वाढवली पाहिजे, तरच समृद्ध लोकशाहीची फळं खायला मिळतील! म्हणून जेव्हा तरुणांच्या मनात संविधानिक जाणीवा जागृत होतील तेव्हाच या देशातील लोकशाही पुढे असलेले धोके टळतील. अन्यथा अनर्थ अटळ आहे.
वैभव चौधरी ( विधी विद्यार्थी) पुणे
इमेल- vaibhavchaudhari721@gmail.com