ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून? बरंच काही..
भिमा-कोरेगाव शौर्यदिनाच्या निमित्ताने अभिवादन करुन इतिहास जागवला जातो. परंतू अनेक लोक हा इतिहास नाकारतात. ते का नाकारतात याचा धांडोळा घेतलाय.. आंतराष्ट्रीय ब्लॉकचेन तंत्रज्ञ गौरव सोमवंशी यांनी 'नेटिव्ह अमेरिकन' (रेड इंडियन) म्हणजे काळयाच्या इतिहास समोर ठेऊन.... ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? हे समजण्यासाठी आपण एकदा अमेरिकेकडे कडे वळूया. अमेरिकेचं उदाहरण देतांना सुद्धा कमीतकमी दोन पद्धतीने ते सांगता येईल, एक तर 'नेटिव्ह अमेरिकन' (रेड इंडियन) यांच्या इतिहासावरून, किंवा ब्लॅक्सच्या. आज फक्त नेटिव्ह अमेरिकन (रेड इंडियन) यांच्यावर लिहितोय.
8 ऑक्टोबर रोजी दरवर्षी अमेरिकेत कोलंबस दिवस साजरा केला जातो. पण आता हळू-हळू जागरूकता निर्माण होत आहे आणि कोलंबसला शिव्या घालून पडद्याआड करण्याचा आणि त्याचे प्रस्थापित अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे की बरोबरच आहे माझ्या मते. कोलंबसला खोट्या इतिहासाने मोठे केले होते, परंतु आता तिकडील सोशल मीडिया वरून आलेल्या जागरूकतेने त्याला त्याची योग्य ती जागा दाखवण्यात येत आहे. पण का आणि कसे?
आपण जेव्हा म्हणतो की कोलंबस ने 1492 मध्ये अमेरीकेचा शोध लावला तेव्हा त्याचा असा काही अर्थ निघतो की त्या अगोदर ते भूखंड कोणाला माहीत नव्हतेच. पण तिकडे लोकं राहत होती त्यांचं काय? हजारो वर्षे ते तिकडे राहत असून सुद्धा त्यांनी स्वतःची जमीन "शोधली" पण नाही का? चला तुम्ही म्हणता तर असा विचार करू की कोलंबसमूळे ते भूखंड पहिल्यांदा "इतर" जगाला कळाले. पण हे देखील चूकच आहे कारण युरोप मधील सर्वात आक्रमक आणि लढवय्या समजल्या जाणाऱ्या 'व्हायकिंग' यांनी कोलंबसच्या 500 वर्ष अगोदर ग्रीनलँड वरून अमेरिकेवर हल्ला केला.. आणि पुढे झाले काय? तर नेटिव्ह अमेरिकनस्नी त्यांना पाणी पाजून पळवून लावले.
बरं मग कोलंबस ने कमीतकमी अटलांटिक महासागर तरी पार केले होते का? की, जुन्या जागेवर नव्या मार्गाने गेला असेल भाऊ पहिल्यांदा?! तर हे पण चुकीचं. 2 नेटिव्ह अमेरिकन (रेड इंडियन) हे कोलंबसच्या 1500 वर्ष अगोदर अटलांटिक महासागर ओलांडून हॉलंडला (नेदरलँड) पोचले होते. कोलंबस सोबत काही गोंडस गोष्टी जोडून त्यामधील त्याचे नीच आणि क्रूर व्यक्तिमत्व लपवण्यात आले ("बिचाऱ्या कोलंबसला कळलंच नाही हं शेवटपर्यंत की त्याने इंडिया नाही अमेरिका शोधला आहे", "कोलंबसला वाटायचं की पृथ्वी गोल नाही सपाट आहे आणि त्याचं जहाज एका टोकावर येऊन पडून जाईल", इत्यादी). पण मुळात, खरं हे आहे की कोलंबस हा सोन्याचा लालची होता, आणि नेटिव्ह अमेरिकन यांना आपण आपले गुलाम बनवून, त्यांना विकून सोनं कमवू शकतो हे त्याचे थोर विचार. थोडक्यात, त्याने जर कोणता पराक्रम केलाच आहे तर एका लेखकाच्या मते की 15 वर्षाच्या अंतरात त्याने अमेरिका आणि अमेरिकन गुलामगिरी दोन्ही 'शोधल्या'. त्याने युरोपला पाठवलेल्या पत्रांमध्ये सगळं नमूद आहेच, ऑनलाइन पण चेक करा.
गोऱ्या अमेरिकन इतिहासकारांनी (आणि नंतर हॉलीवूड, मीडिया वगैरे) तुमची फार मोठी दिशाभूल केली असे वाटत असेल तर थोडा धीर धरा, आत्ता कुठे आपण मूळ विषयाकडे वळतोय. नेटिव्ह अमेरिकन्स बद्दल एक चित्र असं रंगवल जातं की ते फक्त काही मागासलेल्या जमातींचा समूह होता जे एकमेकात भांडायचे, ज्यांना काहीच "मॉडर्न" यायचं नाही. आणि आपले युरोपियन गोरे लोकं आले आणि यांना 'माणूस' बनवलं असं काही तरी. हे सत्यापासून दुरान्वये ही संबंध नसलेले चित्र रंगवण्यात आलं. कसं?
नेटिव्ह अमेरिकन हे जर का गोऱ्या युरोपियन पासून हरले तर त्यामागे युरोपियन लोकांचं शून्य काम होतं. मानव इतिहासात सर्वात मोठं प्लेग हे तेव्हा अमेरिकेत पसरलं होत आणि जवळ-जवळ 90% नेटिव्ह अमेरिकन लोकसंख्या त्यामध्ये मरण पावली. 90%!!. गुगल विकिपीडिया सगळं वाचा. मासेचुसट्स सारख्या राज्यात तर 96% लोकसंख्या मरण पावली. जेव्हा गोरे युरोपियन हे अमेरिकन भूखंडावर आले तेव्हा त्यांना "रेडिमेड" शेती, रस्ते, घर , पाण्याच्या सोयी, वगैरे हे सगळं तसच्या तसं मिळालं. ते तर जाऊ द्या, पण नेटिव्ह अमेरिकन वसाहतीमध्ये राहायचं कसं, आणि त्यांची औजारे वगैरे हे वापरायची कशी, हे "शिकवायला" सुद्धा त्यांना एक नेटिव्ह अमेरीकन लागला जो इंग्रजीमध्ये पण निपुण होता (त्याचं नाव 'स्क्वँटो'/Squanto, त्याची कहाणी सुद्धा एकदा वेगळी वाचाच, हॉलिवूड ने याच्यावर काही बनवायला हवं)
अमेरिकन घटना ही लिहीत असताना सुद्धा नेटिव्ह अमेरिकन लोकांकडून यांनी धडे घेतले होते (Iroquois Confederacy असं सर्च मारा गुगल वर). याची नोंद नंतर एक रेजोलुशन पास करून सुद्धा घेण्यात आली, अमेरिकन सेनेटने. लोकशाही सुद्धा तिकडून शिकली आहे, ती काही आज सुद्धा एका "प्रिन्स" आणि "राणीला" मानणाऱ्या गोऱ्या युरोपियन लोकांनी नाही शोधली.
मग असं असतांना गोऱ्या अमेरिकन इतिहासकारांचा इतका अट्टाहास कशाला खोटं बोलायचा, खोट लिहायचा? कारण हे लोकं आजची नेटिव्ह अमेरिकन आणि युरोपियन गोऱ्या लोकांमध्ये असलेली सामाजिक आणि आर्थिक विषमता इतिहासाच्या माध्यमाने "नॉर्मल" करतात. की हे लोकं "तेव्हा पण स्वतःहून मागासलेले होते म्हणून आज पण आहेत". "बिचाऱ्यांना जगण्याची अक्कल नाही जो पर्यंत हे गोरे याना काही शिकवत नाहीत". वगैरे.
जेव्हा हे नेटिव्ह अमेरिकन आपली माणुसकी कमी करून यांच्या समोर उभे केले जातात तेव्हा याच गोऱ्या लोकांना त्यांच्यावर प्रचंड प्रेम वगैरे येते. कारण आपली मानवता, अस्मिता, प्रतिष्ठा, हे आपण कमी करून प्रस्थापित शोषकांसमोर गेलो की ते आपल्याला जवळ घेतातच. हमखास. कारण मॅलकॉम एक्स म्हणतो तसं स्वतःची सत्ता ते आज गाजवत असतील तर त्यांच्या साठी सर्वात उपयोगी साधन म्हणजे शोषितांचे मन.
आणि भीमा-कोरेगावचे सत्य याच एका गोष्टीला तडा देते. की 'खालचे मागासलेले' लोकं सुद्धा यांच्या सैन्याला भारी पडले. त्यांना समोरासमोर भिडले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढत राहिले, जिंकले. कारण तो इतिहास आजचे वर्तमान होण्याचे सामर्थ्य राखतो. उद्याचे भविष्य बदलण्याची ताकद राखतो. आणि या मुळे बाबासाहेब म्हणतात तसे भारतीय इतिहास म्हणजे इकडच्या ब्राह्मण इतिहासकारांनी लावलेली एक थट्टा-मस्करीच आहे ज्यामध्ये बालिश दंतकथाच पेरून ठेवल्या आहेत. आणि कोणीतरी म्हणल्या प्रमाणे जो समाज इतिहास वाचत नाही तो फक्त लाचारीची पुनरावृत्ती करतो.
पण आज नेटिव्ह अमेरिकन जनतेने (आणि तिकडच्या खऱ्याखुऱ्या पुरोगामींनी) मिळून कोलंबसला त्याची जागा दाखवली आहे, आणि अमेरिकन इतिहासातील विकृतीकरण उलटवून लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ब्लॅक्सचा इतिहास सुद्धा याच प्रकारे दडपण्यात आला, पण त्यावर नंतर कधी. सध्या फक्त भीमा-कोरेगावकडे लक्ष देऊया आणि इतिहासाचे महत्व एकमेकांना पटवून देऊया. तिथूनच या आणि अनेक ऐतिहासिक घटनांवर हल्ले होतीलच, पण ती थोपवुन लावण्याची क्षमता तुमच्यात आहे हे लक्षात राहू द्या, कारण हे काही पहिल्यांदा होत आहे असे नाही.
जय भीम!
गौरव सोमवंशी
ईमेल : gaurav@emertech.io
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance
(सदर लेख https://roundtableindia.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द झाला असून लेखकाच्या सहमतीनं तो मॅक्स महाराष्ट्रसाठी पर्नप्रसिध्द करण्यात आला आहे.)