सूडकथेचा पुढचा अंक: निखिल वागळे
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या संपत्तीवर ED ने धाड टाकली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की कोणता पवित्रा घेणार? काय असेल महाआघाडी सरकारचं भवितव्य? वाचा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं सडेतोड विश्लेषण;
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ईडी) ने धाड टाकली. या धाडीच्या मागे राजकीय सूडबुद्धी आहे यात शंका नाही. यापूर्वीही देशात आणि राज्यात भाजप विरोधकांवर मोदी सरकारने अशा धाडी टाकल्यात. विरोधकांवर दबाव आणायला हे तंत्र गृहमंत्री अमित शहा यांनी सर्रास वापरलं आहे.
प्रश्न हा आहे की यापुढे कोण झुकतो आणि कोण त्याला समर्थपणे तोंड देतो. ईडी चौकशीनंतर राज ठाकरे थंड पडले, शरद पवार ठामपणे उभे राहिले. संजय राऊत तर ईडीवरच थेट आरोप करतात. पण शिवसेना नेते चिंताग्रस्त आहेत यात शंका नाही. महापालिका निवडणुकीआधी आणखी किती नेत्यांना लक्ष्य केलं जाणार, ही काळजी त्यांच्या मनात आहे. ठाकरे सरकार पाडण्यासाठीही चाललेला हा आटापीटा आहे. उद्या थेट मातोश्रीवर धाड टाकली गेली तरी आश्चर्य नाही. नारायण राणे आणि इतर कॅांग्रेसी नेत्यांना खिशात टाकण्यासाठी भाजपने हीच भानगड फाईल वापरली अशी चर्चा आहे.
पण महत्वाची गोष्ट ही की, याविषयी जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. काल ईडीने उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स तात्पुरते जप्त केले. लोक विचारताहेत, मुंबई परिसरात एक घर घेताना आमच्या नाकी नऊ येतात, हे ११ अलिशान फ्लॅट्स आले कुठून? किरीट सोमय्यांना तुम्ही कितीही शिव्या द्या ते दुटप्पी आहेत म्हणून. पण विरोधकांचे आर्थिक गुन्हे शोधून काढण्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञांची मोठी टीम आहे. संजय राऊतपासून यशवंत जाधव, अनिल परबपर्यंत अनेक सेना नेत्यांची यादी त्यांनी जाहीर केली आहे. हे पुढारी भ्रष्ट नाहीत याची खात्री असती तर जनता त्यांच्या बाजूने उभी राहिली असती. पण गेली ३० वर्ष मुंबई महापालिकेत झालेली टक्केखोरी जनतेने पाहिली आहे. ही टक्केखोरी सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचते हे सर्वांना चांगलंच ठाऊक आहे.
भाजपचं फावतंय ते इथेच. शिवसेनेबरोबर सत्तेत भागीदार राहिल्याने त्यांना सगळ्या आतल्या भानगडी माहीत आहेत. किंबहुना त्यात तेही सामिल होते. चोराची चाल चोरालाच कळते, त्यातलाच हा प्रकार.पण सत्तेचा हत्यारासारखा वापर करुन विरोधकांना कोंडीत कसं पकडायचं हे कौशल्य भाजपकडे आहे. त्या तुलनेत राज्य सरकार बावळट आहे. त्यांच्या कारवाया नेहमीच लेच्यापेच्या असतात. भाजप नेते भ्रष्टाचारी नाहीत असं कोण म्हणू शकेल? पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराचं तंत्र बदललंय. कदाचित म्हणूनच राज्य सरकारच्या हाती काही लागत नाही.
ही सूडकथा कुठपर्यंत जाणार सांगता येणार नाही. आज महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत. पण ईडीच्या धाडीमुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्येही घबराट पसरली आहे. तेव्हा आधी सेनेला वाचवू की राष्ट्रवादीला, असा पेच त्यांच्यापुढे आहे. यात कॅांग्रेस कमालीची शांत आहे. आपले नेते आज सूपात असतील तर उद्या जात्यात येऊ शकतात याची जाणीव त्यांना आहे.
नजिकच्या भविष्य काळात हे सूडाचं राजकारण विलक्षण रंगेल. बरबटलेल्या हातांची ही लढाई जनता शांतपणे पहातेय आणि जमेल तिथे करमणूक करुन घेतेय.
ज्याचे हात स्वच्छ असतील तोच या टोळीयुद्धात टिकाव धरेल, हे पुन्हा एकदा सांगतो.
-निखिल वागळे