"लावूनि कोलित। माझा करतील घात ।। सापडलो खोळेमधी ।.."
तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा विचार करताना या सर्व पार्श्वभूमीचा विचार अपरिहार्यपणे करावा लागतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, त्याबद्दल गाथा परिवाराचे उल्हास पाटील यांनी आज तुकाराम बीजे च्या निमित्ताने विश्लेषण केले आहे.;
३४०. अभंग क्र. १६०६
आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।१।।
वाढवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ।।२।।
अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ।।३।।
जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जे वैकुंठाचे अभंग सांगितले जातात त्यापैकी हा एक अभंग आहे.
शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की, "अंतकाळीं विठो आम्हांसी पावला" याचा अर्थ काय? आयुष्यभर त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं, पण शेवटच्या क्षणी मात्र तो पावला असा याचा अर्थ होतो. ही ओळ वाचताच जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सर्व जीवनसंघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो.
त्यांचा सर्व जीवनपट डोळ्यांसमोरुन सरकत जातो. वयाच्या बाराव्या वर्षी थोरल्या भावजयीचं निधन. थोरल्या भावाचं घर सोडून जाणं. तुकाराम महाराजांवर इतक्या लहान वयात कुटुंबाची संसाराची जबाबदारी येणं. प्रथम पत्नीचा आजाराने झालेला मृत्यू. प्रथम अपत्याचा झालेला मृत्यू. थोरल्या सुनेच्या मृत्यूमुळे आणि थोरल्या मुलाच्या नाहिसे होण्यामुळे हाय खाल्लेल्या आई आणि वडीलांचा मृत्यू. एकामागे एक अशा जीवलगांच्या सोडून जाण्याबरोबरच आलेली दुष्काळासारखी आपत्ती.
असे एकामागे एक आपत्तीचे डोंगर कोसळत असताना भामनाथच्या डोंगरावर केलेल्या चिंतनातून गवसलेली जगण्याची नवी दिशा. गहाणखतं बुडवून या नव्या जीवनाचा केलेला आरंभ! या नव्या जीवनात त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना, दु:ख, छळ, मारहाण, त्यांच्यावर धर्मपीठासमोर चालवण्यात आलेला खटला, त्यांचे अभंग बुडवण्याची शिक्षा, घरदार, शेतीवाडीची जप्ती, तेरा दिवसाचं उपोषण, त्यांच्या निर्धारासमोर नमलेला ब्रह्मवृंद, जप्त केलेलं घरदार परत करण्याची कृती. पण तरीही वाढत गेलेला छळ ! हा सर्व जीवनपट तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोरुन सरकत गेला असेल.
आपण या शोषण व्यवस्थेवरच घाव घालत आहोत. यांच्या जन्माधारित श्रेष्ठत्वावर आघात करत आहोत, त्यामुळे हे लोक आपलं काहीही करु शकतात. आपला घात करु शकतात याचे स्पष्ट संकेत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेले आहेत. "लावूनि कोलित ।माझा करतील घात ।। सापडलो खोळेमधी ।.." इतक्या स्पष्ट शब्दात तुकाराम महाराज आपलं उद्या काही बरंवाईट झालं तर त्याला कोण जबाबदार असेल त्याची नोंद करुन ठेवतात.
तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा विचार करताना या सर्व पार्श्वभूमीचा विचार अपरिहार्यपणे करावा लागतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. तुकाराम महाराज इंद्रायणीकाठी कीर्तन करत असताना, सर्व लोक कीर्तनात दंग झालेले असताना एका उन्मनी अवस्थेत तुकाराम महाराजांनी धावत जाऊन इंद्रायणीच्या डोहात उडी घेतली असं सांगितलं जातं. "कुडीसहीत गुप्त झाला तुका" याची ही एक उपपत्ती सांगितली जाते.
रां. चि. ढेरे यांनी 'श्रीविठ्ठल एक महासमन्वय' या शोधग्रंथात महानुभावी साहित्याचा संदर्भ देऊन वेगळी कथा सांगितली आहे. त्यानुसार तुकाराम महाराज पूर्वायुष्यात कृष्णभक्त होते. पण नंतर ते विठ्ठलभक्तीकडे वळले. पण आयुष्याच्या शेवटी त्यांना याचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे ते देहू सोडून निघून गेले.
पुरोगामी मंडळीच्या मते, मंबाजी, सालोमालो यांनी तुकाराम महाराज यांचे विचार मांडणे बंद करण्यासाठी सनातन मार्ग वापरला. त्याच्या समर्थनार्थ ते खालील मुद्दे मांडतात.
धुळवडीच्या दिवशी सर्व गावकरी धुळवड खेळण्यात दंग असताना तुकाराम महाराज नाहिसे झाले. नाहीसे झाल्यावर तीन दिवसांनी त्यांचे टाळ आणि घोंगडी जंगलात सापडली. नाहीसे झाल्यापासून सातव्या दिवशी मंबाजीने जाहीर केलं की तुकाराम महाराजांना घ्यायला वैकुंठाहून विमान आलं होतं आणि ते त्यात बसून वैकुंठाला निघून गेले. तुकाराम महाराज नाहिसे झाल्यावर जिजाई आणि भाऊ कान्होबा यांनी केलेला आक्रोश.
सनातन्यांनी बळीराजापासून थेट महात्मा गांधी आणि दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या केलेल्या हत्यांच्या आधारे अशाप्रकारे आपल्या वर्चस्वाला सुरुंग लावणाऱ्यांना संपवण्याची सनातन्यांची कार्यपद्धती आहे. या सर्वांच्या आधारे तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या कथा या गुन्हेगारांनी आपला गुन्हा लपवण्यासाठी रचलेल्या आहेत आणि समाजात पसरवलेल्या आहेत असा एक मतप्रवाह आहे.
यासर्वांमध्ये तुकाराम महाराजांना घ्यायला वैकुंठाहून विमान आलं आणि तुकाराम महाराज त्यात बसून सदेह वैकुंठाला गेले हीच कथा जास्त लोकप्रिय आहे. प्र. के. अत्रे यांनी 'संत तुकाराम' चित्रपटात भव्य सेट उभा करुन, तुकारामांच्या वैकुंठगमनाचा प्रसंग ट्रीक सीनद्वारे पडद्यावर साकार केला. सिनेमाध्यम इतकं प्रभावी असतं की पडद्यावर जे दाखवलं जातं ते लोकांना खरंच वाटतं. ते त्यांच्या मनात रुजतं. ठसतं.
काही वारकऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी अशी भूमिका मांडली की काहीही असलं तरी तुकाराम महाराजांची हत्या केली असं म्हणायचं नाही. कारण असं म्हणणं म्हणजे दुष्टांचं मनपरिवर्तन करण्यात तुकाराम महाराजांना अपयश आलं असा त्याचा अर्थ होतो. तुकाराम महाराजांना त्यामुळे कमीपणा येतो. म्हणून असं म्हणायचं नाही.
"सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमता ।।" म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या खऱ्या वारसांना शक्य होत नाही. ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सत्याचा पाठपुरावा करतात. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले या विधानाचा विचार करावा लागतो.
तुकाराम महाराज तर स्पष्ट शब्दात सांगतात, "येथे मिळतो दहीभात । स्वर्गी ते नाही मात ।।" मेल्यावर स्वर्गात गेलो तरी पुण्य संपल्यावर स्वर्गातून बाहेर ढकलून देतात. असा अशाश्वत स्वर्ग कशाला हवा?असा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे. "ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी ।" असल्याने तिथे माझं मन गुंतू देऊ नको असं तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज जसा स्वर्ग नाकारतात तशीच मुक्तीही नाकारतात.
"सांडुनी सुखाचा वाटा । मुक्ती मागे तो करंटा ।।" असं म्हणून तुकाराम महाराज थांबत नाहीत तर "का रे ना घ्यावा जन्म । प्रेम लुटावे नाव ।।" असा प्रश्न विचारतात. आम्हाला मुक्तीचं कौतुक नाही, ती तर आमच्या गांठोळीला आहे असं सांगून पुढे जाऊन "तुका म्हणे आता मज । न लगे सायुज्जता ।।" इतक्या स्पष्ट शब्दात मुक्ती नको, मोक्ष नको, सायुज्जता नको असं सांगतात.
सायुज्जता का नको? कारण एकदा त्या परमात्म्यात विलिन झाल्यावर भक्तीप्रेमसुखाचा अनुभव घेता येत नाही. उलट मी कीर्तनात असा रंग भरीन की स्वर्गस्थ असेल त्याला स्वर्गवास कडू वाटेल आणी जो मुक्त झाला आहे त्याला मुक्ती सोडून पुन्हा जन्म घ्यावा वाटेल. असंख्य अभंगातून तुकाराम महाराज मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ नाकारतात आणि भक्ती प्रेमरसाचा आनंद घेण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल अशी पांडुरंगाला विनवणी करतात, हे जर सत्य असेल तर मग ते वैकुंठाला जातील कसे?
तुकाराम महाराज काही ढोंगी, कीर्तनकार नव्हते. बोलायचं एक, सांगायचं एक आणि वागायचं त्याच्या विरुद्ध अशी दुटप्पी मानसिकता तुकाराम महाराजांची नव्हती. तर "बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले" असं म्हणणाऱ्या आणि स्वतः तसंच वागणाऱ्या ज्या दुर्मिळ विभूती असतात त्यापैकी एक तुकाराम महाराज होते. मग ते आपल्या शिकवणूकीच्या विपरीत आचरण कसे करतील?
वैकुंठाबद्दल जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या तुकाराम दर्शन या ग्रंथात बरीच चर्चा केली आहे. आपल्या 'वैकुंठी तो ऐसे नाही' या लेखात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, "संतांनी मात्र स्वर्गप्राप्तीच्या ध्येयावर कडाडून हल्ला चढवला आहे. यज्ञ करून स्वर्गाला जावे व तेथील दिव्य भोग भोगावेत या मिमांसाकांच्या आदर्शावर गीतेने टीका केली आहे. ज्ञानदेवांनी तर, "मज येता पै सुभटा । या व्दिविधा गा आव्हाटा । स्वर्ग-नरकु या वाटा । चोरांचिया ।।" अशा शब्दात स्वर्ग आणि नरक या चोरांच्या वाटा आहेत असं म्हटलं आहे.
इहलोकाविषयी इतकं अपार प्रेम ज्यांच्या मनात होतं ते तुकाराम महाराज वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी कोणालाही न सांगता वैकुंठाला निघून जातील असा विचार करता येत नाही. तुकाराम महाराजांचा जीव स्वर्ग, मोक्ष, मुक्ती वा वैकुंठासाठी तळमळत नव्हता तर "बुडता हे जन न देखवे डोळा" ही त्यांची आंतरिक तळमळ होती. त्यासाठीच तुकाराम महाराज जीवाच्या आकांताने दुष्ट रुढीपरंपरा, अंधश्रद्धा, शूद्रातीशूद्रांचं माणूसपण नाकारणारी वर्णव्यवस्था, समाजातली उच्चनीचता, भेदाभेद यावर तुटून पडत होते. तेच आपलं जीवितध्येय, जीवितकार्य त्यांनी ठरवलं होतं. ते काम पूर्णत्वाला पोचलेलं नव्हतं.
तुकाराम महाराज सांसारिक जबाबदारी टाळून पळून जाणाऱ्यातले नव्हते. मुलंही लहान होती. अशा परिस्थितीत तुकाराम महाराज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतील आणि आपणच वारंवार नाकारलेल्या वैकुंठाला निघून जातील अशी कल्पनाही आपण करु शकत नाहीत. यातून तुकाराम महाराजांच्या अचानक निघून जाण्याचं गूढ अधिकच रहस्यमय बनतं.
जी गोष्ट आयुष्यभर नाकारली, तीच त्यांनी केली असं म्हणणं हा तुकाराम महाराजांचा घोर अपमान ठरेल. असं म्हणणं तुकाराम महाराजांच्या लौकिकाला साजेसं ठरणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगांचे अर्थ लावताना तुकाराम महाराजांच्या जीवनाशी, तत्वज्ञानाशी ते सुसंगत असले पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे.
तुकाराम महाराजांचं नेमकं काय झालं याचं उत्तर ज्याने त्याने आपल्या मगदूराप्रमाणे शोधावं. पण एक गोष्ट निश्चित आहे की धुळवडीच्या दिवशी तुकाराम महाराज आपल्यातून गेले, आपल्याला सोडून गेले. आपण तुकोबांना कायमचं अंतरलं. या दु:खाने धरणी फाटावी इतकं दु:ख त्यांच्या कुटुंबियांना झालं. "शोके मेदीनी फुटो पाहे" अशा शब्दांत ते व्यक्त झालं.
हा दिवस सणाचा नाही. आनंदाचा तर मुळीच नाही. हा दु:खाचा दिवस आहे, परम दु:खाचा, यातना देणारा दिवस आहे. यादिवशी आपण गंभीर झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हयातभर आपल्यासाठी जो संघर्ष केला, जो छळ सोसला, ज्या यातना सहन केल्या, त्यांचं स्मरण करुन तुकाराम महाराजांना आदरांजली वाहून त्यांचा विचार सर्वदूर पसरवण्याचा, त्याचं अपूर्ण कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा, त्याचं अधुरं स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे. तुकोबांच्या वारसांना ज्या क्षणी याचं भान येईल तो क्षण म्हणजे परिवर्तनाची सुरुवात असेल.
- उल्हास पाटील
गाथा परिवार
संपर्क – 9975641677
http://gathaparivar.org/