स्मरण हुतात्मा बाबु गेनू यांचे

Update: 2020-12-12 03:43 GMT

आज १२ डिसेंबर. आज महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचा जन्मदिन.हिंदु महासभेचे संस्थापक डॅा मुंजे यांचाही जन्मदिन व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचाही वाढदिवस आजच. मात्र या सर्वांविषयी आदर व्यक्त करून आजची पोस्ट मी अर्पण करत आहे, हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीस. महात्मा गांधींच्या परकीय मालावर बहिष्कार घालण्याच्या हाकेला प्रतिसाद देताना मुंबईच्या या तरुण गिरणी कामगाराने हौतात्म्य पत्करले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव ता्लुक्यात जन्मलेल्या बाबू गेनू सैद यांचे नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य होते. मुंबईत गिरणीत काम करून ते उदरनिर्वाह करीत असत. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले.

१२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ते ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रज ड्रायव्हरने ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबु गेनूंना हौतात्म्य लाभले. पुढे १७ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण कापड बाजारातील एका छोट्या गल्लीला नाव व आंबेगावात एक छोटेसेच स्मारक या पलिकडे स्वदेशी व सत्याग्रहाच्या या सच्च्या गांधीवादी कार्यकर्त्याचे स्मरण मात्र कुणालाच राहिले नाही. हुतात्मा बाबू गेनू व स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आत्माहुती देणाऱ्या असंख्य अनामिक हुतात्म्यांना श्रद्धांजली.

Similar News