अण्णाभाऊ-राकट दलित वस्तीतून प्रकटलेली वाङ्मयीन प्रभा: डॉ.सुरज एंगडे

अण्णाभाऊंनी साहित्यातून दलित प्रश्नांची हाताळणी व्हावी इतका व्यापक केला.महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक छोट्यामोठ्या शहरात आणि राज्याबाहेरही ठिकठिकाणी ज्यांचे पुतळे उभारले गेल्याचे आपल्याला आढळते असे अण्णाभाऊ हे बहुदा एकमेव सर्जनशील साहित्यिक असावेत, अण्णाभाऊंच्या जयंतीदिनीडॉ. सुरज एंगडेंनी वाहिलेली शब्दांजली..

Update: 2021-07-31 14:39 GMT

कथात्मक राजकीय वाङ्मयाच्या वादळी क्षेत्रात धाडसाने मुशाफिरी करणाऱ्या अगदी आरंभीच्या भारतीय लेखकांमध्ये अण्णाभाऊंचा समावेश होतो.

अण्णाभाऊ ही राकट दलित वस्तीतून प्रकटलेली एक वाङ्मयीन प्रभा होती. 1 ऑगस्ट, 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात असलेल्या वाटेगाव नावाच्या खेड्यातील गावकुसाबाहेरच्या मांगवस्तीत एका भूमिहीन शेतमजूर आईवडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.

अण्णाभाऊंची जीवनकहाणी मोठी चित्तवेधक आणि प्रेरणादायी आहे. त्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य दलित रोजगार मिळवण्यासाठी मुंबईची वाट धरत. त्याप्रमाणे अण्णाभाऊही 1930 च्या दशकाच्या शेवटी शेवटी आपल्या वडिलांबरोबर पायी चालत वाटेगावहून मुंबईला आले. मुंबईत येताच अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे होणाऱ्या अवहेलनेबरोबरच कामाच्या ठिकाणी होणारे शोषण आणि जुलूमजबरदस्तीही त्यांना सहन करावी लागली. परिणामी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली दारिद्र्य आणि शोषण याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्रमिकांच्या चळवळीकडे ते स्वाभाविकपणे आकृष्ट झाले. या चळवळीच्या प्रभावातून अण्णाभाऊ लेखनाचे प्रयोग करु लागले. प्रामुख्याने दुःख आणि दैन्य यांनी भरलेले दळभद्री नागरी जीवन, घरची ओढ, आणि चाकरीतले शोषण याबद्दलची गीते, कविता आणि पोवाडे ते लिहू लागले.

अण्णाभाऊंच्या लेखनाने साहित्यविश्वाचे केंद्रच बदलले. मानवी अभिव्यक्तीचे त्यांनी राजकीयीकरण केले. कथात्मक राजकीय वाङ्मयाच्या वादळी क्षेत्रात धाडसाने मुशाफिरी करणाऱ्या अगदी आरंभीच्या भारतीय लेखकांमध्ये अण्णाभाऊंचा समावेश होतो. त्यांची पात्रे कृत्रिम, भव्य, उदात्त वगैरे नसत. आपण सामान्यतः सहज अंदाज करू शकू असेच त्यांचे वर्तन असे. ती स्वभावात कृष्ण छटा असलेली, गुन्हेगारी पार्श्वभूमीतील आणि विवादास्पद असत. आपली भौतिक परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात ती असत. आणि बदलायची तर ती आत्ता या घडीलाच बदलली पाहिजे अशी खूणगाठ त्यांनी बांधलेली असे. रोमँटिक कादंबरीतील एखाद्या सोशिक पात्राप्रमाणे बदल टांगणीवर ठेवायची त्यांची तयारी नसे.

अण्णाभाऊंच्या अनुभवाला जे आले तेच त्यांनी आपल्या साहित्यातून दिले. त्यांचे लेखन हे पूर्णतः अनुभवजन्य होते. फकिरा ही त्यांची पारितोषिकविजेती कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे. तीत त्यांनी मांग समाजातील एक जोमदार व्यक्तिचित्र रेखाटले आहे. आपल्या कसबी, कष्टाळू, मेहनती, कलाकुशल आणि अत्यंत धार्मिक वृत्ती असलेल्या समाजाच्या अद्वितीय क्षमता जगाला दाखवण्याचा कथाकादंबरी लेखन हा मार्ग अण्णाभाऊंना सापडला.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये मांग समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. इतिहास आपल्याला सांगतो की मांग समाज हा जवळजवळ नेहमीच न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला समाज आहे. अण्णाभाऊंच्या पूर्वी होऊन गेलेले लहुजी साळवे नावाचे मांग गृहस्थ महात्मा फुल्यांच्या शिक्षणविषयक चळवळीचे एक बिनीचे कार्यकर्ते होते. या लहुजींच्या बाहुबळाच्या आधारेच फुल्यांना त्यांच्यावरील आणि पत्नी सावित्रीबाईंवरील अनेक शारीरिक हल्ल्यांना तोंड देता आले. त्यांच्या शाळेत मुले यावीत यासाठीही लहुजींची खूपच मदत झाली. म. फुल्यांच्या कागदपत्रात आणि ब्रिटिश सरकारला त्यांनी सादर केलेल्या अहवालातही लहुजींबद्दल फुल्यांना वाटणारा आदर आणि त्यांनी त्यांना दिलेली मानवंदना आपल्याला आढळून येते.

वाङ्मयाचा शस्त्र म्हणून वापर

1960 साली महाराष्ट्रात दलित साहित्याचा नवोन्मेष सुरु झाला. तत्पूर्वीच अण्णाभाऊंनी मराठी साहित्यविश्वात कादंबरी, दलित नाटुकली , नाटके असे विविध प्रकारचे दलितकेंद्रित साहित्य निर्माण करण्यास सुरुवात केली होती. आपल्या बळकट मनगटाच्या आणि डोळे दीपतील अशा लखलखीत प्रतिभेच्या जोरावर साहित्यक्षेत्रातील उच्चनीचतेची श्रेणीबद्ध उतरंड अण्णाभाऊंनी खिळखिळी केली. या अर्थाने ते 'भारतीय' सर्जनात्मक लेखनाचे जनकच होत. त्यांच्यानंतरही वर उल्लेखलेल्या बहुविध साहित्यप्रकारात एकाच वेळी निर्मिती करण्याचा वसा फारसा कुणी घेतलेला दिसत नाही.

प्रभावी जातीची आडनावे धारण केलेल्या लेखकांनी आपली भाषा संस्कृतप्रचुरतेने नटवली आणि ते महान विचारवंत ठरले. परंतु अण्णाभाऊ, नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार ,दया पवार, वामन निंबाळकर, शरणकुमार लिंबाळे यांच्यासारख्या विशिष्ट परिघातील अनेक लेखकांना मात्र त्यांची भाषा, त्यांची शैली आणि त्यांचा खडा सूर यामुळे हीन लेखले गेले. अर्थात अण्णाभाऊ किंवा दलित पँथरच्या अन्य लेखकांनी याची कधी पर्वा केली नाही कारण त्यांची शैली आपल्या लोकांवरील, त्यांच्या भाषेवरील आणि संस्कृतीवरील त्यांच्या प्रेमातून जन्मलेली होती. आत्मविश्वास बाळगण्याचा मार्ग माझ्यासारख्या माणसांना त्यांनी खुला केला. समाजात प्रभुत्व असलेल्या लोकांचा सुमारपणा हाच आदर्श मानून त्यांच्या मान्यतेकडे डोळे लावून न बसता आपण आहोत तसेच मस्त आहोत असे आत्मभान त्यांच्यामुळेच आम्हाला प्राप्त झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्याच राज्यातील नेत्याचा प्रचंड प्रभाव आण्णाभाऊंवर होता. " जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव " या त्यांच्या सुप्रसिद्ध गीतातून या प्रभावाचेच दर्शन आपल्याला घडते.

अण्णाभाऊंचा कार्यकाळ अतिशय थोडा होता. वयाच्या केवळ 49 व्या वर्षी 18 जुलै, 1969 रोजी सिद्धार्थ नगरात सरकारने त्यांना दिलेल्या घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तत्पूर्वी आपल्याला मिळालेल्या अल्प काळात त्यांनी 35 कादंबऱ्या, 13 लघुकथा, 3 नाटके , 1 कवितासंग्रह, 14 लोकनाट्ये, 1 प्रवासवर्णन आणि 10 पोवाडे अशी भरघोस साहित्यसंपदा निर्माण करून ठेवली होती. अजून चार पुस्तके या ना त्या टप्प्यावर होती. त्यांच्या सात कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यापैकी एकाला राष्ट्रीय तर आणखी दोन चित्रपटांना राज्य पुरस्कार लाभले.

याबरोबरच विविध मासिकांत, नियतकालिकांत त्यांनी लिहिलेले असंख्य लेख, कविता आणि अन्य प्रकारच्या लेखनाचा शोध अद्याप घेतला जात आहे. वैजयंता नावाच्या तमाशा कलावतीचे पात्र हेच त्यांच्या एका कादंबरीचे प्रमुख पात्र आहे. अशा प्रकारे दलित स्त्रियांच्या जीवनाला प्रमुख स्थान देऊन स्त्रीवादी कादंबऱ्या लिहिणारे अण्णाभाऊ हे आपल्या काळातील एकमेव भारतीय लेखक असावेत.

लालबावटा कलापथकातून अमर शेख आणि द. ना. गवाणकर यांच्या पहाडी आवाजाच्या जोरावर अण्णाभाऊंच्या काव्याने महाराष्ट्राची राजकीय अस्मिता जागवली. तथापि इतरत्र घडते त्याचप्रमाणे इथेही शहरी उच्चवर्गीय ब्राह्मण मंडळीच महाराष्ट्राचे निर्माते म्हणून स्वतःचा उदोउदो करुन घेताना आपल्याला दिसतात.

झगमगत्या चित्रपटसृष्टीतील अभिजनवर्गातही अण्णाभाऊंचे मित्र होते. बलराज सहानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. 1948 साली रॉक्ला या पोलंडमधील शहरात भरणार असलेल्या बुद्धिवंतांच्या जागतिक शांतता परिषदेत अण्णाभाऊंना उपस्थित राहता यावे म्हणून बलराज सहानींनी त्यांचा सर्व खर्च देऊ केला. पण सरकारने पासपोर्टच न दिल्याने अण्णाभाऊ या परिषदेला जाऊ शकले नाहीत. बी. एन. गायकवाड या अण्णाभाऊ आणि इंग्लिश साहित्य या दोहोंचे अभ्यासक असलेल्या पंडिताने अण्णाभाऊंचे अष्टपैलुत्व, त्यांची धीरोदात्तता आणि विविध कलाप्रकारांवरील त्यांचे प्रभुत्व यामुळे त्यांची तुलना खुद्द शेक्सपिअरसारख्याशी कशी करावीशी वाटते हे यथार्थपणे मांडले आहे.

1961 साली अण्णाभाऊंनी " माझा रशियाचा प्रवास" हे एखाद्या दलित लेखकाने लिहिलेले पहिले प्रवासवर्णन आपल्याला दिले. कविता, पोवाडे, पटकथा, लघुकथा, नाटके आणि सदरें असे नानाविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. अनेक भारतीय भाषांबरोबरच सोव्हिएट रशियातील व युरोपीय भाषांतही त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली. अण्णाभाऊंचे समग्र साहित्य हा मात्र दीर्घ प्रतीक्षेत असलेला परंतु अद्याप पूर्ण न झालेला प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे साहित्याचा व्यासंगी, संघटक आणि सर्जनशील लेखनातील जादूगार म्हणून अण्णाभाऊंचे योगदान महाराष्ट्राच्या बाहेर आणि मुख्यतः इंग्लिश भाषिक प्रदेशांत अद्याप पुरते ज्ञात झालेले नाही.

तथापि दलित साहित्य चळवळीने मात्र या उच्च कोटीच्या प्रज्ञावंताची योग्यता नीट ओळखून 2 मार्च, 1958 रोजी मुंबईत दादर येथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते. या ठिकाणी केलेल्या आपल्या ओजस्वी भाषणात ते कडाडले," ही पृथ्वी दलितांनी आपल्या हातावर तोलली आहे." हे भाषण म्हणजे दलित अस्मितेचा संस्मरणीय जाहीरनामा आहे.

अण्णाभाऊंनी साहित्याचा हेतू त्यातून दलित प्रश्नांची हाताळणी व्हावी इतका व्यापक केला. ते म्हणाले, "दलित व्यक्तीचे जीवन डोंगरातून झुळझुळत येणाऱ्या निर्झराच्या निर्मळ पाण्यासारखे असते. त्याचे नीट निरीक्षण करा आणि मगच त्याच्याबद्दल लिहा."

(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, 'कास्ट मॅटर्स' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. 'जी क्यु' या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे.

लेखक : सुरज येंगडे : suraj.yengde@gmail.com

भाषांतर : अनंत घोटगाळकर

मूळ प्रकाशन: इंडियन एक्सप्रेस 23 ऑगस्ट, 2020

Tags:    

Similar News