हेच खरे देशद्रोही...
गेल्या काही दिवसांपासून देशात देशद्रोह्यांच्या झुंडी बाहेर पडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नकली देशभक्त बनून देशद्रोही कृत्य केले जात आहेत. काय आहे यामागील षडयंत्र जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्या या लेखातून…;
स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील एक गट हा देशविरोधी कृत्य करत होता. या देशाच्या राष्ट्रध्वजाच्या अवमानापासून ते राष्ट्रगीताविषयी चुकीची माहिती पसरवण्याचं काम हा गट इमाने इतबारे करत होता. देशाला 15 ऑगस्ट रोजी राजकीय स्वातंत्र्य मिळालं असल्याची आवई याच लोकांनी पसरवली. एवढंच नाही तर भारतीय स्वातंत्र्य हे भाड्याने मिळालं असल्याचं म्हणत भारताचा, भारतीय परंपरांचा, भारतीय संस्कृतीचा अपमान करण्याचं पाप काही हिंदूत्ववादी संघटनांकडून सुरूच आहे.
या संघटना आहेत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठाण हिंदूस्थान. या संघटनेच्या महत्वाच्या पदावरील व्यक्तींपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत विषारी आणि विखारी भाषणं देऊन देशाच्या एकतेला आणि अस्मितेला ठेच पोहचवण्याचे काम सुरू आहे.
14 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पुर्वसंध्येला आरएसएसने आपल्या मुखपत्रातून भारतीय तिरंग्याची विटंबना केली होती.
नशिबाला लाथ मारून सत्तेवर आलेले लोक आमच्या हाती तिरंगा देऊ इच्छितात. पण भारतातील हिंदू कधीच तिरंग्याला स्वीकारणार नाही. तीन हा शब्दच वाईट आहे. त्यामुळे तीन ध्वजही नक्कीच वाईट असेल. तीन हा अंक खूप वाईट परिणाम घडवून आणतो, अशा शब्दात भारताच्या राष्ट्रध्वजावर टीका करण्यात आली होती. ही झाली या देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांच्या अपमानाची परंपरा.
त्यानंतर कंगना रनौत नावाच्या अभिनेत्रीने 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं नसून पंतप्रधान मोदी सत्तेत आले त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, असल्याचं म्हटलं होतं.
आता त्याच विचाराचे मनोहर भिडे भारताच्या तिरंग्याचा अपमान करताना दिसतात. पण त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. याऊलट राज्याचे गृहमंत्री तिरंग्याच्या अपमान करणाऱ्या मनोहर भिडे याचा गुरुजी असा उल्लेख करतात. त्यामुळे यातून सत्ताधाऱ्यांची देशभक्ती दिसून येते.
एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. हे अभियान प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाविषयी आत्मियता वाढावी, यासाठी असल्याचे सांगण्यात आले. एका बाजूला पंतप्रधान हर घर तिरंगा अभियान राबवत असताना दुसऱ्या बाजूला मनोहर भिडे यांच्यासारख्या विकृत मनोवृत्तीच्या देशद्रोही लोकांनी तिरंगी ध्वजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं. राष्ट्रगीताबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं. या वक्तव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केला. जे पंतप्रधान मनोहर भिडेला गुरूजी मानतात, ज्यांचे मनोहर भिडे यांच्यासोबत संबंध आहेत, ते मनोहर भिडेवर काय कारवाई करणार?
आधी कंगनाने स्वातंत्र्यादिनाबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर 2018 मध्ये दिल्लीत जाळण्यात आलेली राज्यघटना, देशद्रोही मनोहर भिडेने केलेलं वक्तव्य, एवढंच नाही तर देशाच्या एकतेला सुरूंग लावण्याचं कट्टरतावादी संघटनांकडून केलं जात आहे. मात्र सरकारने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरील माकडांप्रमाणे भूमिका घेतली आहे. सरकारला देशात सुरू असलेलं राज्यघटनेची विटंबना दिसत नाही. सरकारला मनोहर भिडेने स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रध्वज नाकारून काढलेली रॅली दिसत नाही. त्या रॅलीत दिल्या जाणाऱ्या घोषणा ऐकू येत नाही. एवढंच नाही तर यावर एक शब्दही फुटत नाही. यांच्यावर कारवाई करता येत नाही. याचा एकच अर्थ निघतो. तो म्हणजे या सगळ्याला सरकारचा आशिर्वाद आहे.
देशाच्या राज्यघटनेत देशाच्या प्रत्येक नागरिकाला मुलभूत हक्क दिलेले आहेत. कलनम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क देण्यात आला आहे. त्यात कायद्यापुढे समानता, भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवांच्या बाबींमध्ये समान संधी देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. पण हेच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटना यांना नको आहे. त्यामुळेच देश कायम जळता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांचे केंद्रीय आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी राज्यघटना बदलण्याची मागणी केली. पण देशाचे आर्थिक सल्लागार एवढ्या गंभीर विषयावर भाष्य करतात. मात्र तरीही पंतप्रधान चुप्पी साधून आहेत? याचा नेमका अर्थ काय?
जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रवादाच्या बाता मारतो. त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि डीआरडीओचे शास्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर पाकिस्तानला माहिती पुरवत होते. मग या देशाशी गद्दारी करणारे कोण? खरे देशद्रोही कोण? यावर विचार करायला हवा. देशभक्तीच्या बाता मारणारेच देशद्रोही असल्याचं दिसून येतंय.