कहाणी एका जीवंत जेसीबी मशीनची !

मातीपर्यंत उकरताना जास्त त्रास व्हायचा नाही. एकदा का मुरुम लागला की, सुरु व्हायचा कुदळ आणि मुरमाचा संघर्ष. तात्यांच्या प्रत्येक घावाबरोबर तोंडातुन आवाज यायचा. चिकाटीने ते मुरमातुन रान काढायचे. “मुरमाड लागलं की, कस लागायचा, पण आमी एका सुरात कुदळ मारायचो. कुदळीचा ठेका सोडायचो न्हाय.” वाचा सागर गोतपागर यांच्या लेखणीतून उतरलेली एका जीवंत जेसीबी मशीनची कहाणी

Update: 2023-09-09 11:33 GMT

माणसाच्या हाताचा अंगठा, उरलेल्या सर्व बोटांच्या समोर येतो. या वैशिष्ट्याने त्याच्या हाताची पकड घट्ट झाली. जगण्यासाठी याच हातात माणसाने कधी विळा पकडला, कधी हातोडा पकडला, शहरातील गटार साफ करण्यासाठी फावडे पकडले, तर कधी जमीन खंदण्यासाठी कुदळ. म्हादू तात्यावर ऐन तारुण्यात कुटुंबाच्या पोटाची जबाबदारी पडली. ती पुर्ण करण्यासाठी या माणसाने हातात कुदळ पकडली आणि आयुष्यभर आपल्या कामावर प्रेम केलं.

चौथीच्या वर्गात नापास झाल्यावर वडीलांनी सांगितलं की, शाळेत जाऊ नको. घरची परिस्थिती बेताची. त्या वयात मिळेल ते काम केले. वडील मातीकामच करायचे. वडीलोपार्जित माती काम करण्याचा वसा त्यांना वडीलांकडूनच मिळाला. त्याकाळात विहीर खंदण्याच्या कामावर दिवसाला चार रुपये मिळायचे. हळूहळू तात्या मातीकामात माहीर होत गेले. पाईपलाइन खंदणे, विहीर काढणे, दुष्काळात ताली टाकणे, बंधारे बांधणे अशी कामे त्यांना येऊ लागली. पहाटेला उठायचं, आपली कुदळ पाटी घ्यायची, सायकलीवर तंगडी टाकायची आणि कामाच्या ठिकाणी जायचे. आजुबाजूच्या आसद, वडगाव, भाळवणी, कळंबी, ढवळेश्वर, बलवडी आळसंद विटा या सगळ्या भागात या माणसाने सायकलवरुन प्रवास केला. त्यांच्यासोबती बाबु आबा हे होते.

दोघे दिवसभर माती उकरायचे. जवळ जवळ दिवसाला पन्नास फुट पाइपलाईन खंदायचे. अंगावर घामाच्या धारा बरसायच्या. घामाने हातातुन कुदळ सटकायला लागली की, उकरलेली भुसभुशीत माती हातावर चोळायची. माती खंदत पुढे गेल्यावर मागे भली मोठी मातीची डोंगररांग दिसायची. माती उकरणारं हे जीवंत जेसीबी कमळापुर परीसरात प्रसिद्ध झाल होतं. जमिनीत मातीपर्यंत उकरताना जास्त त्रास व्हायचा नाही. एकदा का मुरुम लागला की, सुरु व्हायचा कुदळ आणि मुरमाचा संघर्ष. तात्यांच्या प्रत्येक घावाबरोबर तोंडातुन आवाज यायचा. चिकाटीने ते मुरमातुन रान काढायचे. ते सांगतात, “मुरमाड लागलं की, कस लागायचा, पण आमी एका सुरात कुदळ मारायचो. कुदळीचा ठेका सोडायचो न्हाय.”

त्या काळात आत्तासारखं एका खोऱ्यात एक ट्रॉलीभर माती उकरनारं जेसीबी नव्हतं. पण म्हादू तात्या आणि बाबु आबा नावाचं जेसीबी या भागात प्रसिद्ध होतं. बाहत्तरला मोठा दुष्काळ पडला. सर्व मातीकामे बंद झाली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. तात्या या दुष्काळात कामासाठी मुंबईला निघुन गेले. तिथे राहण्याचा प्रश्न निर्मान झाला. काम मिळालं नाही. उपासमार होऊ लागली. त्यात त्यांनी पुन्हा गावाची वाट धरली व पुन्हा नव्या जोमाने काम सुरु केले. दुष्काळाची कामे सुरु झाली व लोकांच्यात पुन्हा नव चैतन्य निर्माण झालं.

तात्यांना लेझीमाचा खुप नाद होता. कामातूनसुद्धा त्यांनी लेझीमची कला जोपासली होती. त्या काळात लग्नाला डॉल्बी किंवा बॅंजो नसायचा. पण माणसं रात्र रात्रभर लेझीम बघायला जागायची. हलगीच्या ठेक्यावर वेगवेगळे लेझीमाचे डाव रंगायचे. तात्या या डावात निपुण होते. त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसांचे लेझीमाचे मंडळ होतं. त्यांच्याकडून ते वेगवेगळे डाव शिकले होते. लेझीमाची स्पर्धा असायची. जे मंडळ एखादा डाव सादर करेल, त्या डावाला दुसऱ्या मंडळाने डाव द्यायची स्पर्धा लागायची. या मंडळात शिरंग नाना होते. ते सांगतात “अभ्यासात जसं गणित बराबर आलं पाहीजे, तसा लेझमात हलगीवाल्याचा ठेका बराबर आला पाहीजे. ठेका चुकला की, गडी एकमेकांना धडकले म्हणुन समजा.” हलगीच्या ठेक्यावर लेझीम सुरु व्हायची. माणसं वेगवेगळे डाव लावायची. कारल्याचा आकार करणे, मोरांगी डाव, धनगरी डाव असे डाव प्रसिद्ध होते. ही सर्व कष्ट करणारी लोकं करमणुकीसाठी खेळ खेळायची. त्यांनी ही संस्कृती निर्माण केली होती. दुसरा एक गमतीशीर खेळ असायचा. एकाने डोक्याची टोपी गुपचुप झाडाच्या शेंड्यावर नेऊन ठेवायची. त्यानंतर दुसऱ्याचे डोळे बांधायचे. समोर हलगीवाला असायचा. त्याला टोपीची जागा माहीत असायची. त्याची हलगी सुरु व्हायची “टांग टांग टांग.” हलगीचा ठेका मध्येच बदलायचा आणि डोळे झाकलेला माणूस हलगीच्या इशाऱ्यावर झाडावर जाऊन टोपी घेऊन यायचा.

आज हे सगळे किस्से सांगताना तात्यांच्या डोळ्यात तरुणपण दिसत होतं. तात्यांना मुलगा नाही. तात्या व नानी दोघे कसेबसे आपलं आयुष्य काढत आहेत. तात्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना वेगवेगळी दुखणी लागली आहेत. त्यांचे सांधे पुर्ण खराब झाले आहेत. आयुष्यभर जेसीबीप्रमाणे काम करणाऱ्या या जेसीबीच्या सांध्यातलं ऑइल पुर्णपणे संपून गेलं आहे. तात्या गहीवरल्या डोळ्यांनी कोपऱ्यातल्या कुदळीकडे बोट दाखवतात.

ग्रामीण भागातल्या या माणसांनी श्रमिकांची संस्कृती विकसित केली. खेळ,साहित्य आणि कला निर्माण केल्या. म्हादू तात्यांसारखी गावाकडील अनेक माणसं हे खरे संस्कृतीचे पाईक आहेत.

 - सागर गोतपागर

Tags:    

Similar News