सावधान! जगात तीन "C" मुळे मिनिटाला ११ मृत्यू
सावधान! जगात तीन “C” मुळे मिनिटाला ११ मृत्यू!, कोणते आहेत हे तीन ‘C’ वाचा संजीव चांदोरकर यांचे विश्लेषण;
तीन "C" : Corona, Conflicts and Climate Change मुळे जगभरात मिनिटाला ११ मृत्यू होत आहेत. कोरोना महासाथ जगातील सर्व देशांवर आदळून दीड वर्ष होऊन गेले; हे आरोग्य क्षेत्रातील अरिष्ट आहेच. पण त्याने अर्थव्यवस्था देखील उध्वस्त केल्या.
विशेषतः गरीब आणि विकसनशील देशांतील; ज्या देशात ८० ते ९० % लोकसंख्या हातावर पोट घेऊन जगत असते; हाताला काम बंद म्हणजे घरातील चूल बंद आहे. जगात कोरोना मृत्त्यूदर झपाट्याने कमी होत असला तरी अजूनही मिनिटाला ५ कोरोना बळी जात आहेत.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार येत्या काळात भूक बळींची संख्या कोरोना बळीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. त्यात आता जगात विविध देशांमध्ये/ शत्रू राष्ट्रांमध्ये वाढत असणाऱ्या हिंसक संघर्षांची भर पडली आहे. सध्या २३ देशांत रक्तरंजित संघर्ष सुरु आहेत; त्यातून हजारो नागरिक देशधडीला लागत आहेत .
त्यात यामध्ये दरवर्षी भर लहरी होत चाललेल्या निसर्गाची भर पडली आहे. अतीवृष्टी व त्यातून येणारे पूर, वेळी यावेळी पडणारा पाऊस, अवर्षण, अती हिमवृष्टी (Extreme Events) वाढत आहेत. अकाली मृत्यूंसाठी तीन "C" : Corona, Conflicts and Climate Change कारणीभूत होत आहेत. मिनिटाला ११ मृत्यू या तीन सी मुळे घडत आहेत.
जगात ना पैशाची कमी आहे ना अन्न धान्याच्या साठ्याची... युनोच्या अन्न सुरक्षा परिषदेनुसार भुकेल्यालाना किमान अन्न पोहोचवण्यासाठी ८ बिलियन्स डॉलर्सची गरज आहे. तर जगात मागच्या वर्षी १८०० बिलियन्स डॉलर्स शस्त्रास्त्र निर्मितीवर खर्च झाले. (म्हणजे अन्न सुरक्षेसाठी लागणाऱ्या पैशापेक्षा २३० पट !)
हे असे बदलणार नाहीय; कारण ना अकलेची वानवा आहे ना विश्लेषणाची; याला दीर्घकालीन उत्तर फक्त राजकीयच असू शकते. किमान विचारी आणि संवेदनशील तरुणांनी याची नोंद घ्यावी.
(ऑक्सफॅमच्या अहवालावर आधारित)
संजीव चांदोरकर