महाराष्ट्राचा महापिता दूर कर्नाटकाच्या मातीत एकाकी विसावला ! -विश्वास पाटील

19 फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात उत्सवाने साजरी केली जाईल. मात्र, राजाला जन्म देणाऱ्या शहाजी महाराजांच्या समाधीवर साधं छप्पर नाही हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा विश्वास पाटील यांचा हा लेख.;

Update: 2022-02-12 07:45 GMT

शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि "महाराष्ट्र "या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत ( कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरावस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल !

गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती.

जेव्हा 1624 साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा इब्राहिम आदिलशहा यांची फौज इथे चालून आली होती. तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच "गनिमी कावा" नावाच्या युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता. त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या फौजेचा धुव्वा उडवला होता.




 


नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो. शिमोगा या शहरापासून एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजिगिरी नावाच्या खेड्यात( जिल्हा दावणगिरी )शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट दिली. 23 जानेवारी1664ला याच परिसरात राजांचा घोड्यावरुन पडून अपघात झाला. इथेच महानिर्वाण झाले . आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी समाधी दिसते. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातली आई-वडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो!

मल्लेश राव सारख्या मंडळीनी दावणगिरी मध्ये शहाजीराजे स्मारक समिती स्थापन केली आहे. तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावरून ही मंडळी महिन्या-दोन महिन्यातून अधेमध्ये इथे येतात . छोटे व्यवसाय करणारी, मराठी भाषा न जाणणारी ही महाराष्ट्रीयन मंडळी तिकडे शहाजीसेवा करायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची ताकद खूप छोटी आहे

" जय शिवाजी जय भवानी" अशी घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात. पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडविणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे.

गेली चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मी शिवचरित्राचा अभ्यास करतो आहे. दरम्यान मी स्वत: दोनशेहून अधिक गडकिल्ले पाहिले आहेत. सखोल संशोधन करता अशी दिसते की, मराठी इतिहासकारांनी व जाणत्या मंडळींनी मुद्दामच छत्रपती शहाजीराजे यांचा खराखुरा इतिहास , त्यांचं असाधारण राष्ट्रीय योगदान, तसेच शिवराय व त्यांच्या श्रेष्ठ पित्यामधील मुलखावेगळे नाते हा सारा इतिहास, हया सत्य कागदोपत्री घटना अगदी जाणीवपूर्वक दृष्टिआड केल्या आहेत..दडपून ठेवलया आहेत




 


शिवरायांचे गुरु म्हणून वीस-बावीस जणांची नावे चिकटवली गेली. पण पूर्ण अभ्यासाअंती मी डोळे झाकून हया प्रश्नाचे उत्तर असे देईन की, छत्रपती शिवरायांचे एकच महागुरू होते ज्यांचे नाव शहाजी महाराज !

थोडक्यात जिजाऊ नावाची महासागरासारखी माता आणि शहाजीराजांसारखा पहाडासारखा पिता दैवानेच शिवप्रभूंच्या पाठीशी दिला होता. 1636-- 37 च्या दरम्यान बेंगलोरचा महाकिल्ला केंपेगोवडा या राजाकडून रणदुल्लाखान आणि त्याचा पुत्र रुस्तुमेजमा यांनी सात महिन्याच्या लढाईनंतर जिंकून घेतला होता. तो तसाच त्यांनी शहाजी राजांच्या निवासासाठी कायम देऊ केला होता. तेव्हा या किल्ल्याला आजच्या दिल्ली दरवाजा सारखे नऊ महादरवाजे होते. किल्ल्याचा घेर एक मैल परिघाचा होता .माहुलीच्या किल्ल्यावर बादशाह शहाजानशी तह केल्या नंतर शहाजी राजाना जुलमाने कर्नाटकात जावे लागले. तिथे गेल्यावर कित्येक वर्ष एखाद्या स्वतंत्र राजा-महाराजा सारखे राजे बेंगलोरच्या किल्ल्यात राहत होते.

शिवरायांचा पुण्यात सईबाईंशी विवाह झाल्यानंतर शहाजीराजांनी त्यांना कर्नाटकात बोलावून घेतले होते. बेंगलोरच्या किल्ल्यातच शहाजी महाराजांनी सोळाशे 40 ते 42 च्या दरम्यान दोन वर्ष स्वतः युद्धशास्त्राचे प्रशिक्षण शिवराय, व्यंकोजी राजे, कोयाजी बाबा अशा आपल्या लाडक्या पुत्रांना दिले होते.. शहाजीराजांनी शिवरायांना पुण्यास पाठवताना त्यांच्या नावे पुण्याचा मोकासा करून दिला होता. आपल्या वडिलांनी लिहिलेली सुंदर राजमुद्रा शिवराय वयाच्या बाराव्या वर्षापासून कागदोपत्री वापरू लागले होते .


 



त्याआधी संगमनेर जवळच्या पेमगडावर निजामशहाच्या पोराला नाममात्ररित्या गादीवर ठेवून शहाजीराजांनी स्वतंत्र राज्याचा, स्वराज्याचा पहिला प्रयोग पेमगड-किल्ल्यावर केला होता.. (1632-1635 ) . तेव्हा महाराजांकडे नाशिकच्या गोदावरी पासून पुण्याच्या भीमेच्या काठापर्यंत 64 किल्ले होते. शहाजीराजे आवरत नाहीत म्हणून हिंदुस्तानचा बादशहा आणि औरंगजेबाचा बाप शहाजान 1634 मध्ये महाराष्ट्रावर चालून आला होता. तेव्हा बादशहाने यमुनेच्या काठावरचे ताजमहाल या भव्य इमारतीचे चालू असलेले बांधकाम बाजूला ठेवले होते. दक्षिणेत एक स्वतंत्र राजा उभा राहतोय म्हणून इथे येऊन दीड वर्ष शहाजीराजांशी त्याला संघर्ष करावा लागला होता..

स्वराज्याचे पहिले सरनोबत माणकोजी दहातोंडे आणि चाकणचा वीर फिरंगोजी नरसाळा ही शहाजीराजांनीच आपल्या खजिन्यातली अमुल्य रत्ने शिवरायांना दिली होती. या साऱ्या सत्य व वास्तव घटना अमान्य करायची तथाकथित इतिहासकारांची हिंमत आहे का ?

त्या काळात विजापूरच्या सर्वात शूर अशा अफजलखानाचा शिवाजीराजांनी जावळीच्या रानात वध केला . तेव्हा शहाजीराजे विजापुरात सरदार होते. अफजलची दुःखद वार्ता ऐकून बड्या बेगमेला बेहोशी आली होती. त्या जागेवर कोसळल्या होत्या. पण त्या दरम्यान पुत्राच्या गुन्ह्यासाठी विजापुरात दरबारी सेवेत असलेल्या शहाजी राजांच्या अंगाला स्पर्श करायची तिथे कोणाचीही हिम्मत झाली नव्हती. यावरूनच शहाजीराजा नावाच्या पहाडी पुरुषाचे विजापूरवर किती उपकार असतील व त्यांचा कसा दरारा असेल याची साधारण कल्पना येईल.

इतकेच नव्हे तर आदिलशहाची फारसी पत्रे सर जदुनाथ सरकार यांनी अव्वल इंग्रजीत प्रकाशित केली आहेत. त्रयस्थाना सुध्दा लिहिलेल्या पन्नास-साठ पत्रांमध्ये आदिलशहा नेहमीच शहाजीराजांचा गौरव "Shahajiraja is a pillar of our empire (शहाजीराजे आमच्या आदिलशाहीचे प्रबळ खांब आहेत) असा करायचा.

याबाबत सुजान वाचकांसाठी मी एकच उदाहरण देईन . 1662 मध्ये उन्हाळ्यात महाराष्ट्रात शिवाजी राजे आले होते . तेव्हा बावीस वर्षांच्या दीर्घ वियोगानंतर या महान पिता-पुत्रांची भेट जेजुरीला मल्हारी रायाच्या गाभाऱ्यात घडून आली होती.


 



त्यादरम्यान शाहिस्तेखानाच्या बुडाखाली पुणे होते. त्यामुळे राज्यांचा परिवार राजगडावर राहत होता. तेव्हा शिवरायांनी आपल्या पित्याला हतीवर सोन्याच्या अंबारीत बसवले होते. त्यांच्यासमवेत अंबारीत मातोश्री जिजाऊसाहेब आणि मातोश्री तुकाबाई बसल्या होत्या. हत्तीवरून मिरवणुकीने मिरवत शिवराय जेजुरीपासून ते राजगडापर्यंत आपल्या पिताश्रींनी घेऊन आले होते. पण त्यांचा मानमरातब राखण्यासाठी शिवराय मात्र आपल्या प्रिय पित्याची पादत्राणे पोटाजवळ पकडून जेजुरी पासून ते राजगडा पर्यंत चक्क अनवाणी पायाने चालत गेल्याचे पुरावे इतिहासच देतो.

परवा 21 जानेवारीला शहाजीबाबांच्या दूर कर्नाटकाच्या रानातल्या त्या छोट्या दगडी समाधी जवळ मी आणि माझी पत्नी चंद्रसेना नतमस्तक झालो होतो. राजांच्या स्मृतींची ती आजची दुरावस्था पाहून माझ्या डोळ्यांतून झरझर अश्रुधारा वाहत होत्या..

याच गावात शहाजी राजांनी बांधलेले जुने वाडे आजही तसेच अस्तित्वात आहेत. पण गेल्या साडेतीनशे वर्षाच्या काळात अन्य मंडळींनी त्याच्यावर कब्जा केला आहे. संबंधित छायाचित्रे बाजूला दिली आहेत. ती जरूर पहा. तसेच त्या काळात दक्षिणेतल्या मराठी बांधवांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी एवढ्या दूर येणे शक्य व्हायचे नाही, म्हणूनच शहाजीराजांनी 16 62 मध्ये बांधलेले माता भवानीचे एक जागृत मंदिर सुद्धा इथून आठ किलोमीटरवर आहे.

आज अस्तित्वात असलेली ती समाधीची जागा केवळ एका महाराष्ट्र पुत्राच्या उपकारामुळे वाचली आहे याची आठवण माझे इतिहास संशोधक मित्र इंद्रजीत सावंत व महेश पाटील बेनाडीकर यांनी मला करून दिली. नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉक्टर पंजाबराव देशमुख मंत्री होते. तेव्हा कर्नाटकाच्या दौऱ्यावर असताना ते होजिगिरीच्या रानात या पवित्र स्थळाचा स्वतः शोध घेत गेले. त्यांनीच तेव्हा आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीमध्ये हे ठिकाण घेतले. नाहीतर ही अल्पस्वल्प जागा सुद्धा जागेवर राहिली नसती.

दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील साहित्य, इतिहास आदी क्षेत्रातील कोणीही इकडे फिरकत नाहीच. परंतु गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात ना कोणी इकडे मंत्रालयातले फिरकले ना कोणी महालातले गेले.

आज सर्व राजकीय पक्ष सागरात शिवरायांचे स्मारक बांधण्याची व त्यासाठी हजारो कोटी खर्च करायची भाषा बोलत आहेत. ते स्मारक होईल तेव्हा होईल. पण त्याआधी शिवरायांना जन्म देणाऱ्या त्यांच्या पित्याच्या सावलीसाठी कर्नाटकात एक टेम्पो भरून पत्रे तरी पाठवून द्यायची व्यवस्था करू या.

महाराष्ट्राच्या महापित्याच्या स्मारकापासून दूर होताना माझे मन भरून आले होते . माझ्या अंगात लेखकीय रक्त आणि मेंदूत कल्पनेचे पंख असल्यामुळे मी त्या स्मारकाच्या द्वाराजवळ थबकलो. थोडे आभाळाकडे पाहिले. मनात कल्पना केली जर हे स्मारक बघायला शिवराय आणि जिजाऊ साहेब आज स्वतः तिथे दाखल झाले तर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल ?

जिजाऊ मातोश्री हळहळत बोलतील," आम्ही या मराठी मुलखासाठी कोणता वसा, वारसा आणि भविष्यकाळ दिला ?अन बाळांनो दिल्लीकर जहांगीर आणि शहजान सारख्या बादशाहाना पुरून उरणार्‍या आमच्या महाप्रतापी कुंकवाच्या धन्याच्या स्मृतींचे आपण हे काय हाल चालवले आहेत ?"--- ( संक्षिप्त)



विश्वास पाटील

authorvishwaspatil @gmail.com

Tags:    

Similar News