देशप्रेम, राष्ट्रवाद, पर्यावरण, अर्थकारण, धर्म-जात, प्रतिकं याच्या प्रचलित चौकटी तोडून या सर्व गोष्टींकडे नव्याने पाहण्याची दृष्टी भारतीय जनता पक्षाने आणि आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला दिलीय.
भाजपा-आरएसएस ने दिलेल्या या नव्या दृष्टीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सोप्पकरणाच्या या प्रक्रियेसाठी भाजपा आणि आरएसएस चे खरंतर आभार मानले पाहिजेत.
सध्या भारतीय जनता पक्ष म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसंच आरएसएस म्हणजेच मोहन भागवत जे करतील-सांगतील तो राष्ट्रवाद आणि त्यांना विरोध करणारा जो-जो विचार असेल तो देशद्रोही असं स्पष्ट समिकरण आहे. या समिकरणाला देशातील बहुतेक जनता शरण गेलेली आहे.
या देशातील जनता काही वितारवंतांपेक्षा जास्त सुज्ञ आहे, असं भाजपा आणि आरएसएस चं म्हणणं आहे. या सुज्ञ जनतेसाठी ते दरवेळी नवनवीन कल्पना, कार्यक्रम, धोरणं आणि वेष्टनं घेऊन येत असतात.
मोहन भागवत यांनी लिंचींग हा शब्द भारतीय नाही, ही एक पाश्चात्य संकल्पना आहे असं म्हटलं आहे. ही बाब मान्य केली पाहिजे. इथे या होतात त्या हत्या आहेत, थोडासा राग वगैरे आला की लोक एकत्र येऊन मारतात एखाद दुसऱ्याला किंवा एखाद्या समूहाला.
देशद्रोही-धर्मद्रोही यांच्यासाठी आपल्या संस्कृतीत अशा शिक्षा होत्याच, लोकशाहीत त्या पुढे नेल्या तर फारसा फरक पडत नाही अशा पद्धतीचा हा विचार इथल्या कायद्याला आणि काही मूठभर विचारवंताना पटत नाही.
या विचारवंतांचा फारसा विचार करायची गरज नाही. यांना देश कळत नाही.
मध्यंतरी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलीकरण, जीएसटी सारखे निर्णय घेतले. धडाडीचे निर्णय घेतल्यावर थोडी पडझड होणारच. त्यातही जे अतिश्रीमंत, काळ्या पैशावाले आहेत त्यांचं नुकसान झाल्यामुळे ते रडतायत-ओरडतायत असं भाजपाने सांगीतल्यानंतर जनतेने अतिशय विनम्रपणे ते ऐकलं आणि विरोध करणाऱ्यांना काळेपैसेवाले-देशद्रोही ठरवून टाकलं.
या निर्णयांचे विरोधक जे सांगत होते ते म्हणजे मंदी, अर्थव्यवस्था धोक्यात, बेरोजगारीचं संकट गडद होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आज दृश्य स्वरूपात दिसत असल्या तरी
राष्ट्रनिर्माणासाठी देशातील जनता सक्षमपणे भाजपा आणि आरएसएसच्या मागे उभी आहे.
आता आरे मधल्या जंगलतोडीवरून वाद सुरूय. झाडं तोडली जातात म्हणून लाकडाचा व्यवसाय बंद करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या देवेंद्र फडणवीस सरकारने आरे मधली झाडं तोडायला घेतली. याला मिसरूडही न फुटलेल्या काही विद्यार्थ्यांनी विरोध करायला सुरूवात केली.
रेल्वे-बसमध्ये धक्के खाणाऱ्या भाजपाई मतदारांना मेट्रोचं महत्व माहितीय.
त्यामुळे त्यांनी या टुकडे-टुकडे गँग टाइप विद्यार्थ्यांना अतिशय संयतपणे अक्कल शिकवली आहे. केवळ 2700 झाडं तोडल्याने काही फरक पडत नाही असं त्यांना ठणकावून सांगीतलंय.
सरकारने तर अशा विकास विरोधी विद्यार्थ्यांना जेलमध्येच टाकलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जर अशा देशद्रोही विद्यार्थ्यांना सोशल मिडीयावर खडे बोलच सुनावले आहेत. एक मोठी कँपेन राबवून पर्यावरणाचा विचार करणारे विद्यार्थी कसे भरकटलेले आहेत हे दाखवून दिलंय.
येत्या काळात या विद्यार्थ्यांना नक्षलवादी कसे मदत करत होते हे ही समोर आणलं जाईल.
विविध राजकीय पक्ष फोडून, त्यातले चांगले-वाईट, नामचीन लोकं स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना पावन करून घेऊन पुन्हा मागच्या सत्ताधाऱ्यांना शिव्या देण्याचं स्वातंत्र्य भाजपा उपभोगतंय. जे गुन्हेगार आहेत त्यांच्याच हातात चाव्या देऊन चोर चोर ओरडण्यातली राष्ट्रभक्ती आजपर्यंत कुणालाही जमली नव्हती.
भारतीय कधी सुधारणार नाहीत, या देशाला एक हुकूमशहा हवाय असं मी लहानपणापासून ऐकत आलोय.
काही राजकीय पक्ष या हुकूमशाही विचारधारेच्या गरजेवर सतत बोलत आलेयत. एखाद्याच्या कानाखाली मारणं, फटकवणं हा विचारच एकदम मर्दाना आहे, जो पर्यंत स्वतःच्या कानाखाली पडत नाही, स्वतःचं घर पाडलं-जाळलं जात नाही, स्वतःचं कोणी मरत नाही तोपर्यंत.
सध्या दुसऱ्यांच्या कानाखाली, त्यातल्या त्यात आवाज नसलेल्या दुर्बल घटकांच्या कानाखाली सतत आवाज निघत आहेत, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. या वातावरणात असंच उत्साही आणि आनंदी कसं राहायचं हे शिकवल्या बद्दल पुन्हा एकदा भाजपा आणि संघाचं मनापासून आभार.
ज्यांना आनंदी आणि उत्साही राहता येत नाही, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. लिहित राहावं, त्याची पुस्तकं छापून घरी ठेवावीत. मनातली आग मनात ठेवावी. देशातल्या पवित्र वातावरणाला निगेटीव्ह विचारधारेने कलुषित करू नये.