धर्माचं राजकारण - रवींद्र आंबेकर
आजपासून राज्यातील मंदिरे उघडत आहेत, या ऐतिहासिक क्षणासाठी राज्यातील १२ कोटी जनतेला मनापासून शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या लॉकडाऊन नंतर आता देश पुन्हा अनलॉक होत आहे. म्हणजे जवळपास झालाच आहे, त्यात मंदिरे अनलॉक होत नाहीत म्हणून राज्यात भारतीय जनता पक्षाने आणीबाणीची परिस्थिती आहे असं चित्र रंगवलं आणि रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. एकूणच ही आंदोलनं का होती, कशासाठी होती हे समजवून सांगायला काही फार बुद्धीमत्तेची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. वाचा रवींद्र आंबेकर यांचा लेख
मंदिरात देव नाही पुजाऱ्याचं पोट राहतं असं गाडगेबाबा म्हणत. आजपासून पुजाऱ्याचं आणि त्यावर अवलंबून असलेल्यांचं पोटापाण्याचा व्यवसाय खुला होत आहे. कोरोना मुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस अनलॉकची प्रक्रीया सुरू झाली तेव्हा आपसूकच कधी ना कधी मंदिरे ही उघडणारच होती. देशातील एकूण कोरोना रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्णसंख्या मुंबईत आढळून आली, ती संख्या वाढत आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने आंदोलनं केली, जेव्हा रूग्णसंख्या कमी होऊ लागली तेव्हा याच पक्षाने राज्यभर विविध विषयांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं सुरू केली, त्यातलं महत्वाचं आंदोलन हे राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत होतं.
राज्यातील मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने लवकर घ्यावा अशी भाजपची मागणी होती. जर मंदिरे उघडली नाहीत तर मंदिरांचे टाळे तोडण्याची ही भाषा ही केली गेली. अशी आंदोलन अनाकलनीयच आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केला तेव्हा तो इतका कडक होता की घराच्या बाहेर पडलं की पोलीसांचा प्रसाद खावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही तरी विचार करूनच लॉकडाऊन घोषित केलेला असावा, त्यामागे निश्चितच काही तरी शास्त्रीय कारण असावं. लॉकडाऊन उठवतानाही श्रद्धेपेक्षा आधी पोटापाण्याच्या व्यवसायाचं अनलॉकींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिल्लीत मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला पण महाराष्ट्रात हा निर्णय घेण्यात आला नाही म्हणून भाजपची नाराजी होती. अखेर आज पासून ही मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही मंदिरांनी ऑनलाइन बुकींग असणाऱ्यांनाच प्रवेश देणार असं सांगीतलं आहे. फिजीकल डिस्टंसिंग चं पालन करून मंदिर प्रवेश देण्याची मंदिरांनी घोषणा केली आहे.
देवस्थानं ही अर्थव्यवस्थेची महत्वाची केंद्र आहेत. हा श्रद्धे पेक्षा व्यापार मोठा आहे. यावर अनेकांची पोटं अवलंबून आहेत. हॉटेल आणि बार सुरू झाले तर मंदिरं का सुरू होत नाहीत असा भाजपाचा सवाल होता. भाजपाचा सवाल अतिशय योग्य होता. जर सुरू करायचंय तर सगळंच सुरू करायच, त्यात बार आणि मंदिर असा भेद करणं चुकीचं आहे. बार सुरू करणं वाईट आणि मंदिर सुरू करण्याची मागणी म्हणजे सात्विक अशी विभागणी करणं योग्य नाही. ही दोन्ही महसूलाची ठिकाणं आहेत. यातील पहिल्या घटकातून मिळणारं उत्पन्न थेट राज्याच्या तिजोरीत जातं म्हणून राज्य सरकारला बार मध्ये जास्त इंटरेस्ट, तर दुसऱ्या घटकातील उत्पन्न हे सरकारकडे थेट येत नाही, पण त्यातून जे राजकारण शिजतं त्याचा थेट फायदा धर्माशी संबंधित राजकारण करणाऱ्यांना होतो म्हणून भाजपाचा त्याकडे जास्त इंटरेस्ट आहे. आता मंदिराच्या अवतीभवती असलेल्यांना बिनव्याजी कर्ज द्या म्हणून भाजपाची मागणी आहे. खरं तर निर्मला सितारमण यांनी छोट्या व्यावसायिकांसाठी स्कीम घोषित केली होती, त्याचा फायदा या सर्व छोट्या व्यापाऱ्यांना मिळणारच आहे. भाजपाची खरी मागणी ही राज्यातील सर्व बेरोजगार, धंदा बुडालेल्या व्यापाऱ्यांसाठी असली पाहिजे.
राज्य सरकारने ही आता आपली कोरोनाच्या विरोधातली लढाई अधिक व्यापक करत कोरोनानंतर जे प्रश्न उद्भवणार आहेत किंवा उद्भवत आहेत त्यावर आपलं लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. आज मंदिरांसाठी झालेलं आंदोलन हे नंतर प्रत्येक घटकासाठी होणार आहे. लॉकडाऊनचे साईडइफेक्ट दिसायला अजून वर्ष जाईल. तेव्हा कदाचित कोरोनाची झळ कमी झालेली असेल त्यामुळे आधीच मंदी त्यात कोरोना अशी स्थिती आणि त्याचे वाईट परिणाम यांची किती चर्चा होईल माहित नाही, मात्र परिस्थिती बिकट, भयाण जरूर आहे.
कोरोना चा प्रसार झाला त्यावेळी जे लोक आजारी पडले, जे लोक अजून उपचार घेत आहेत किंवा ज्यांना आपला जीव गमवावा लागला अशा लोकांचे नातेवाईक यांना या मंदिर उघडण्याच्या एकूण घटनेत किती आत्मियता आहे हे माहित नाही. कोरोना रोखण्यासाठी कुठलीच श्रद्धा कामाला आली नाही. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे या महामारीसमोर निष्प्रभ ठरली.
श्रद्धा ही पक्षपाती सुद्धा असते, लॉकडाऊनच्या काळात मशीदी बंद करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला होता. कोरोनाच्या प्रसारासाठी जमात ला जबाबदार धरण्यात आलं होतं. धार्मिक ॲक्टिव्हीटी मुळे कोरोना पसरला या धारणेमुळे देशातील मुस्लीम समाज सध्या शांत आहे. मुस्लीम समाजाची स्थिती पाहून ख्रिश्चन शांत आहेत. सगळेच शांत आहेत मग दुकान कसं चालायचं म्हणून तर भाजपाने मंदिराचं आंदोलन सुरू केलं नाही ना असा प्रश्न मला कधी कधी पडतो. जमात मुळे कोरोना वाढला तसा मंदिरांमुळे वाढला तर गहजब करायलाही सध्या कोणी नाही. सेक्युलरांची अशीच बोलती बंद आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचं फावतं आहे. त्याला विरोध करणारे धर्मद्रोही-देशद्रोही ठरवले जातात. सामाजिक आरोग्याची काळजीही आता चिंतेची बाब झालीय. अनलॉक मुळे आता संपूर्ण देश पूर्वपदावर येत असताना मला आता शारीरिक आरोग्यासोबतच सामाजिक आणि धार्मिक आरोग्याची ही काळजी सतावतेय. कोरोना संपेल पण सौहार्द टिकला पाहिजे.