"सुषमा अंधारे"... सुनील सांगळे

मागील काही दिवसात "सुषमा अंधारे" हे नाव अचानक प्रकाशझोतात आले आहे. राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य लोकांतही त्यांच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या. आता ही उत्सुकता एवढी आहे की आज गुगल वर त्यांच्या नावाने सर्च केले तर 'सुषमा' एवढे टाईप केल्यावर लगेच पहिले नाव येते ते 'सुषमा अंधारे' असे आणि दुसरे नाव येते 'सुषमा स्वराज' यांचे, सुषमा भोवती निर्माण झालेल्या वादळाचा आढावा घेतला आहे लेखक सुनील सांगळे यांनी..;

Update: 2022-10-15 12:01 GMT

मागील काही दिवसात "सुषमा अंधारे" हे नाव अचानक प्रकाशझोतात आले आहे. राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य लोकांतही त्यांच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या. आता ही उत्सुकता एवढी आहे की आज गुगल वर त्यांच्या नावाने सर्च केले तर 'सुषमा' एवढे टाईप केल्यावर लगेच पहिले नाव येते ते 'सुषमा अंधारे' असे आणि दुसरे नाव येते 'सुषमा स्वराज' यांचे, सुषमा भोवती निर्माण झालेल्या वादळाचा आढावा घेतला आहे लेखक सुनील सांगळे यांनी..

सुषमा अंधारेंची मी तरी केवळ दोन भाषणे व एक मुलाखत ऐकली आहेत आतापर्यंत! त्यांच्या शिवतीर्थावरील सभेनंतर त्यांच्याबाबतच्या माहितीचे व्हाट्सअप मेसेज येऊ लागले. नंतर त्यांनी एबीपी माझा कट्टयावर जी मुलाखत दिली ती पूर्ण ऐकली आणि नुकतेच त्यांचे नवी मुंबई येथील जबरदस्त भाषण ऐकले. खरे तर त्या शिवसेनेत सामील होण्याच्या दिवसापर्यंत मला तरी त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. "माझा कट्टा' या मुलाखतींच्या कार्यक्रमात त्यांना नुकतेच बोलाविण्यात आले होते आणि त्या तासाभराच्या मुलाखतीतून त्यांनी स्वतःबद्दल आणि त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बरीच माहिती सांगितली. त्याआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तो समारंभ बातम्यात दिसला होता.त्याच वेळी त्यांची शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून नेमणूकही करण्यात आली होती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तो त्यांनाही एक धक्काच होता.

सध्याच्या शिवसेनेत जबरदस्त वक्तृत्व असलेला कोणीही नेता नव्हता. एके काळी स्वतः बाळासाहेबांशिवाय दत्ताजी साळवी, छगन भुजबळ, राज ठाकरे असे मोठे वक्ते सेनेत होते. शिवसेनेत ती कमतरता निश्चितच जाणवत होती. सुषमा अंधारेंची मुलाखत आणि दोन भाषणे ऐकता ती कमतरता आता काही प्रमाणात निश्चित कमी होईल. सुषमा अंधारेंच्या रूपाने सेनेला एक नवीन फायरब्रॅन्ड वक्ता मिळाला आहे. .त्यांना परवा मिळालेला शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहता अशा वक्त्यांची सेनेला किती गरज होती ते जाणवले. शिवसेना ही मुळात एक आक्रमक कार्यकर्ते असलेली संघटना आहे आणि सध्या त्यांचे शीर्षस्थ नेतृत्व आणि त्यामुळे इतर नेतेही संयत भाषणे करतात. कार्यकर्त्याची त्याबद्दल तक्रार नसली तरीही ते त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तीच्या विरुद्ध जाणे आहे. त्यामुळेच सुषमा अंधारेंना शिवसैनिकांकडून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अर्थात अशी लोकप्रियता क्षणभंगुरही असू शकते.

अनेकदा तुफान वक्तृत्व असणारे लोक त्यांच्या वक्तृत्वाला मिळणाऱ्या प्रतिसादात वाहवत जातात आणि त्यांचे संघटनात्मक कामाकडे दुर्लक्ष होते व ते हळूहळू संघटनेत मागे पडतात. अंधारे यांचा संघटनात्मक कार्याचा इतिहास पाहता, त्यांच्याबाबत हे होण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय त्यांच्याबद्दल सेनेतील जुन्या नेत्यांना मत्सर वाटणेही स्वाभाविक आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव सुषमा अंधारेंना आहे हे त्यांच्या मुलाखतीतून जाणवले. कोणत्याही पक्षात हेवेदावे, कुरघोडी करणे व अंतर्गत राजकारण हा एक वेगळा प्रकार असतो जो सामान्य माणसासमोर कधीही येत नाही. त्याला तोंड देणे हा पक्षीय राजकारणाचा एक अपरिहार्य भाग असतो आणि तो सुषमा अंधारे यांनाही टाळता येणार नाही. या सगळ्या गोष्टींवर मात करून सेनेत टिकून राहणे हे त्यांना कितपत जमेल ह्यावर त्यांचे भविष्य अवलंबून राहील.

वास्तविक त्या आंबेडकरवादी विचारसरणीच्या आहेत आणि सेनेचा पूर्वेतिहास बघता त्या इथे कशा समरस होतील हा प्रश्न मुलाखतीत त्यांना विचारला गेलाच. त्याला उत्तर देतांना त्यांनी जी उत्तरे दिली त्यातूनही त्यांची प्रगल्भता जाणवली. राजकारण हा शेवटी संधी मिळण्याचा खेळ असतो. त्यांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे "दादा आजपर्यंत तुम्ही आमच्याकडे कधी लक्ष दिले होते का? म्हणून मला मुख्य प्रवाहातील पक्षात यावे लागले" या त्यांच्या प्रश्नावर खांडेकरही निरुत्तर झालेले दिसले. जी गोष्ट खांडेकरांची तीच आपल्या सगळ्यांची! पोस्टच्या सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्यांनी सेनेत प्रवेश करेपर्यंत आपल्यापैकी किती लोकांना त्याच्याबद्दल माहिती होती हा प्रश्नच आहे.

त्यांच्या विरोधकांनी आताच त्यांचे दहीहंडी उत्सवाच्या संदर्भातील उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल कडक भाषेत बोलणारे व्हिडीओ प्रसारित करायला सुरवात केली आहे. अर्थात त्यांना हे असे काही होईल याची कल्पना होतीच आणि त्यामुळे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पक्षप्रवेशाच्या वेळेसच त्यांनी पक्षप्रमुखांना त्या व्हिडिओंची कल्पना दिली होती. त्यांना सर्वात अडचणीचा प्रश्न विचारला गेला होता तो होता मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या विषयावर तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल! हा प्रश्न मात्र त्यांच्या आजपर्यंतच्या वैचारिक भूमिकेच्या पूर्ण विरोधी असल्याने त्यांची थोडी अडचण झाली, तरीही त्यांनी तो प्रश्न व्यवस्थितपणे टोलवला.

त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवरील पकड, त्याशिवाय विविध बोली भाषांचा अधूनमधून वापर, त्यांच्या कायदेविषयक शिक्षणातून आलेला आत्मविश्वास, महाराष्ट्रात मोठ्या बहुसंख्येने असलेल्या दलित, भटक्या आणि विमुक्त जाती, ओबीसी यांच्या प्रश्नाबद्दल त्यांचा अभ्यास आणि तळमळ, आणि त्याच्या जोडीला ते प्रश्न मांडायची हातोटी यामुळे त्या शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाच्या व्यासपीठावरून त्या जेंव्हा राज्यभर फिरतील तेंव्हा त्या शिवसेनेसाठी एक asset ठरतील असे वाटते. आज जेंव्हा सगळे मातब्बर आणि प्रस्थापित नेते ईडीच्या भीतीने काहीही बोलायला घाबरतात किंवा सरळ पक्ष बदल करतात, तेंव्हा काहीही गमावण्यासारखे नसणारे आणि सामान्य परिस्थितीतील सुषमा अंधारेंसारखे नेतेच आज ताठ मानेने विरोध करायला उभे राहू शकतात ही वस्तुस्थिती आहे.

(या लेखाचे लेखक सुनिल सांगळे सामाजिक व राजकीय अभ्यासक असून त्यांची "जातीव्यवस्था व महाराष्ट्रातील जातीजमाती" हे मराठी व "Caste System in India : Origin, Evolution, Influence & Future" हे इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. )



Tags:    

Similar News