अंधश्रद्धा आणि त्यामागील मूळ काय?

तुमच्या आजुबाजूला अनेक घटना अंधश्रद्धा आहेत. हे तुम्हाला माहिती आहेत. तरीही तुम्ही या घटनांकडे दुर्लक्ष करतात का? ग्रामीण भागातील या अंधश्रद्धा तुम्हाला काय शिकवतात? वाचा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा लेख;

Update: 2020-10-26 03:40 GMT

ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक अंधश्रद्धांचं मूळ हे शोधात आहे. एखाद्या अनामिक गोष्टीवर अथवा समस्येवर उपाय शोधताना त्या लोकांच्या परीने केलेले प्रयत्न त्या त्या प्रथांच्या मागे असल्याचे दिसुन येते. यातील अनेक अंधश्रद्धांचे तोंड विज्ञानाच्या दिशेने असल्याचे जाणवते. त्यातल्या अनेक अंधश्रद्धा आहेत या बद्दल दुमत नाही. मात्र, त्या उलगडताना त्यांचे योग्य प्रकारे विश्लेषण नाही केले तर ग्रामीण लोक अडाणी आहेत. असा चुकीचा संदेश यातुन जाण्याची शक्यता असते. या अंधश्रद्धांना अंधश्रद्धा जरूर म्हणावे पण त्यांचा उगम कसा झाला हे तपासणे महत्त्वाचे आहे.

आदिवासी गावांमध्ये आजही आरोग्याच्या अनेक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही अनेक लोकांनी साधा स्टेथोस्कोप पाहीलेला नाही. या भागात एखाद्याला आजार झाला तर अनेक गावात आजही गावातील पुजाऱ्य्रासमोर त्याला बसवले जाते. पुजारी समोर पाट ठेवतो. त्याच्याजवळ असणाऱ्या पोकळबांबुमध्ये असणाऱ्य़ा बिया पाटावर टाकल्या जातात. त्याचा कौल लावून उपचार केला जातो. खरतर ही एक अंधश्रद्धा आहे. परंतु ही निर्माण होण्यामागची कारणे ही शोधाचे प्रयत्न आहेत. हे विसरुन चालणार नाही. समोर असणाऱ्या रोग्याला पाहत बसणे चरफडत असताना पाहने हा माणसाचा गुणधर्म नाही.

या भागात पुर्वी दवाखाने नव्हते. लोकांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातुन अंधश्रद्धा निर्माण झाल्या. यामध्ये अनेक शोधदेखील लागले ते आयुर्वेद विज्ञानाच्या कसोटीवर देखील टीकणारे आहेत. अनेकदा साप विंचु चावल्यावर झाडपाल्याची औषधे रुग्णास दिली जातात. एखाद्याचा हात मोडला तर तो बसवण्याचे तंत्र अवगत असलेली असंख्य लोकं या भागात पहायला मिळतील.

शेळी मेंढी चे मोडलेले पाय बसवण्याचे कौशल्य अवगत असणारी अनेक लोकं सापडतात. अनेकदा डॉक्टरदेखील अशा व्यक्तिकडे रुग्णाला रेफर करत असतात. गडचिरोली जिल्ह्यातील ठानेगाव येथे मोडलेल्या हाडांवर उपचार करणारे वैद्य आहेत.

गावागावात अनेक प्रथा अशा आहेत की, त्यांचा देवाशी संदर्भ असला तरी दैनंदिन आयुष्याशी देखील सहसंबंध आढळतो. अनेक लोकं हवामानाचे अंदाज कोणत्या पक्षाने झाडाच्या किती अंतरावर घर बांधल किंवा यावर्षी कोणतं फळ जास्त पिकलं यावरुन पावसाचे अंदाज काढताना दिसतात. या प्रथा ज्या काळात उपग्रह, हवामान खाते नव्हते. तेंव्हा लोकांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे शोध लावण्याचे केलेले प्रयत्न आहेत.

यामध्ये अजुन संशोधन केलं गेलं पाहीजे. यात अनेक तथ्ये सुद्धा आहेत. जमिनीच्या पोटात कुठे पाणि लागेल हे शोधनं ही विहीर खोदतानाची गरज होती. यामध्ये अनेक गावात वेगवेगळ्या प्रथा दिसुन येतात. यांचे संदर्भ तुम्हाला कोणत्या पुस्तकात सापडत नाहीत म्हणुन त्यांना तातडीने अंधश्रद्धा न म्हणता यावर अभ्यास व्हावा. चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्या पण यांचे योग्य विश्लेषण व्हावे. भुकंपाची जाणीव पशुपक्षांना आधी होते त्यावरुन निरीक्षणातुन शोधलेल्या गोष्टींवर नक्कीच अभ्यास व्हायला पाहीजे. कोणता ढग कुठे बरसेल, हा वरतीकडचा पाउस आहे की खालतीकडचा, कितीवेळ पडेल असे अंदाज सर्रास वर्तवले जातात. ते केवळ अंदाज नाहीत. ते निरीक्षण अनुभव आहे.

ग्रामीण भागात जत्रा असतात. पुर्वी माध्यमं विकसित झाली नव्हती. यात्रेच्या ठिकाणी लोकं एकत्र यायची कोण जीवंत आहे? मेलंय आजारी आहे. कुणाचं लग्न झालं यासारखी विचारपुस या ठिकाणी व्हायची. देवाला कापलेले कोंबडे बकरे लोकं खायची. यामध्ये गावात करमणूक व्हायची, या करमणूकीमध्ये देवाची भाकणुक असते. या भाकणुकीत कोणता यज्ञ नसतो. कुठल्या मुर्तीचं पाण्यात विसर्जन नसते.

याला सुद्धा शेतीच्या भविष्याची जोड असते. सहसा यामध्ये वर्तवल जाणारं भविष्य हे सुखावणारं असतं. सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुक्यातील रेवनगाव येथील वेताळबाच्या भाकणुकीत केलेला अंदाज असा होता...

"डोंगर राज्य राखीन" म्हणजे हे डोंगर दय्रा खोय्राच राज्य आहे ते मी राखीन म्हणजे यासाली चांगला पाउस पडेल हा सुखावणारा निरोप घेउन लोक जायची पुन्हा पेरणी करायची.'

यामध्ये अंधश्रद्धा निश्चित आहेत असतील. यांच योग्य विश्लेषण व्हायला हवं. यावर अभ्यास व्हायला हवा. ग्रामीण अंधश्रद्धांच मुळ तपासायला हवं म्हणजे लोकांना हे लोक रानाटी अज्ञानी अशिक्षित वाटणार नाहीत.

- सागर गोतपागर

Tags:    

Similar News