सोनचिडिया, डकैत आणि स्लीमन

Update: 2019-03-03 04:03 GMT

अभिषेक चौबेचा 'सोनचिड़िया' (2019) पाहिल्यावर आठवण झाली ती 'मेजर जनरल सर कर्नल विलियम हेनरी स्लीमन'ची (1788-1856). स्लीमन 1809 मध्ये ब्रिटीश सैन्यात भरती झाले. सैनिक ते मेजर जनरल हा त्यांचा प्रवास फार इंटरेस्टींग आहे. विलियम हेनरी स्लीमन यांनी भारतातल्या ठगांचा बिमोड केला. त्यासाठी त्याचं नाव जास्त चर्चेत आलं. ठगांना मारण्यासाठी त्यांनी जी युक्ती वापरली ती भारी होती. भारतातल्या सुमारे 3000 ठगांचा खात्मा स्लीमन यांनी 1830 ते 1856 या कालावधीत केला होता. हे सर्व ठग राजस्थान, मध्यप्रदेशच्या सीमारेषांवर व्यापाऱ्यांना लुटत. फक्त लुट नव्हे तर व्यापाऱ्यांना मारुन त्यांचा मुद्देमाल घेऊन पसार होत.

भारतातल्या पहिल्या संघटीत गुन्हेगारीचा अर्थात माफीयांचा पुरावा राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या या भागात मिळतो. हे ठग, पिंडारी, लुट करणारे डकैत यांना भारतात मोठा इतिहास आहे. ते खूप चलाख होते. अगदी साधे दिसायचे. व्यापाऱ्यांच्या काफिल्यात सहज सामील व्हायचे आणि एकदा का त्यांचा विश्वास संपन्न केला की रात्री व्यापारी बेसावध असताना त्यांना मारुन टाकायचे. लाल गमछा किंवा मग लाल रुमालानं ते व्यापाऱ्यांचा गळा घोटत. त्यामागे मिथक आहे. ते ठग कालीमातेचे भक्त होते. लाल हा कालीमातेचा पवित्र कपडा. व्यापारी म्हणजे त्यांचा काली मातेला दिलेला बळी.

विलियम हेनरी स्लीमन

तेव्हा राजस्थान आणि मध्यप्रदेशात या पिंडारी आणि ठगांच्या गँग धुडगुस घालत होत्या. अगदी संघटीत पध्दतीनं. 1790 ते 1840 या कालावधीत ठगांनी सुमारे 950 लोकांना ठार केलं होतं. ते व्यापाऱ्यांना मारायचे आणि तिथंच जंगलात गाडून टाकायचे.

विलियम हेनरी स्लीमनकडे ब्रिटीश सेनेनं ठग आणि पिंडारींचा खात्मा करायची जबाबदारी सोपवली. स्लीमन हा प्रचंड तल्लख बुध्दीचा लष्करी अधिकारी होता. भारतीय वास्तव्यात त्यानं इथली भाषा शिकून घेतली. त्यामुळं स्थानिकांशी संवाद साधण्यात त्याचा हातखंडा होता. ठगांचा पाडाव करण्यासाठी मध्यप्रदेशातल्या जबलपूरमध्ये स्लीमननं छावणी तयार केली. इथं त्यानं खबऱ्यांचं जाळं विणलं. हे खबरी स्थानिक भारतीय तरुण होते. ते ठगांच्या गँगमध्ये सहजरीत्या मिसळत. ठगांच्या पाडावासाठी ठगांच्याच कार्यपध्दतीचा वापर स्लीमननं केला. त्याला यश ही मिळालं. फरंगी नावाच्या एका मोठ्या काफिल्याच्या ठगाला स्लीमननं पकडलं. त्याला प्रचंड मारहाण केली. त्याच्याकडून ठगांनी नक्की किती लोकांना मारलंय याची माहिती मिळवली. जंगलातून व्यापाऱ्यांची पूरलेली प्रेतं बाहेर काढली. त्यानंतर ठगांना नेस्तनाबूत करण्याचा सपाटाच स्लीमननं लावला होता. सुमारे 3000 ठगांना त्यानं ठार केलं. मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथं त्याची मोठी दहशत तयार झाली होती. तिथं त्याच्या छावणीच्या बाहेर मोठं झाड होतं. त्या झाडावर फास लटकवलेले असायचे. तिथंच तो पकडून आणलेल्या ठगांना सरेआम फाशी द्यायचा.

[button data-color="" data-size="" type="square" target="" link=""]ब्रिटीशांनी भारतीय रेल्वे स्टेशनचं नाव 'स्लीमनाबाद' असं ठेवलंय.[/button]

ठगांची भाषा, त्यांची कार्यपध्दती, त्यांचा बिमोड आणि भारतातल्या गुन्हेगारी जाती जनजाती यावर स्लीमननं चार पुस्तकं लिहलीयत. त्यातला रिसर्च भन्नाट आहे. त्यानं केलेल्या कामाची परतफेड म्हणून ब्रिटीशांनी भारतीय रेल्वे स्टेशनचं नावच 'स्लीमनाबाद' असं ठेवलंय. मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथं हे स्टेशन आहे. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आजही स्लीमन यांचा फोटो लावलेला आहे.

ठग आणि पिंडारींच्या मोठ्या गटानं मुस्लीम धर्माचा स्वीकार केला होता. त्यातून हिंदू ठग आणि मुसलमान ठग यांचा अनेकदा संघर्ष व्हायचा. हे त्यावेळचं गँगवार होतं. शिवाय इंटरेस्टींग गोष्ट अशी की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1857 च्या उठावाच्या आधी आणि नंतरही या ठग, पिंडारींच्या गँग्सनी स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली. स्लीमन आणि इंग्रजांविरोधातला हा त्यांचा एल्गार होता.

ठग, पिंडारी ते डकैत हा प्रवास भन्नाट आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात या डकैतांनी ऊत आणला होता. उत्तरप्रदेशात ठाकूर विरुध्द मल्लाह असा डकैतांचा आपसातला लढा होता. शिवाय मागासवर्गीय समाजातला मोठा गट हेळसांड सहन न झाल्यानं आणि सवर्णांचा अन्याय आणि गरिबीला कंटाळून डकैत झाला होता. यावर 'Dishonored by History - Criminal Tribes and British Colonial Policy, हे मीना राधाकृष्णा याचं पुस्तक कमालीची माहिती देतं.

असो.

तर दिग्दर्शक अभिषेक चौबे याचा 'सोनचिड़िया' हा सिनेमा सवर्ण आणि मागासवर्गीय जातीतल्या डकैतांचा चेहरा दाखवतो. ते क्रूर होते पण देवभक्त आणि माणूसकी असलेले होते असं या सिनेमात दाखवण्यात आलंय. 70-80 च्या दशकात चंबल घाटी आणि त्याच्या आसपास नक्की काय घडत होतं याचा पूर्ण आढावा या सिनेमात आहे. डकैत फुलन देवी, मानसिॆग आहेत. जाती-पातीचं राजकारण आहे. महिलांवर होणारे बलात्कार आहेत. हा बलात्कार तिथल्या सामाजिक घडीत कसा मुरलाय याची गोष्ट आहे.

या सिनेमात फुलन देवीच्या तोंडी सुंदर डायलॉग आहे. " यह बमन, मल्लाह, ठाकूर सभी मर्दो के लिए, औरत की कोई जात नही. सबके लिए वह समान है, सबसे निचे की जात है उसकी."

हा डायलॉग प्रचंड अस्वस्थ करणारा आहे. अभिषेक चौबेच्या आतापर्यंतच्या सर्वच सिनेमांचे फेमिनिस्ट स्टडी म्हणजेच स्त्रीवादाच्या साच्यात बसवून त्याच्या सिनेमाचा अभ्यास व्हायला हवा. एव्हढा भन्नाट सिनेमा बनवतो हा माणूस.

या सिनेमाचा स्क्रिन प्ले आणि डायलॉग एव्हढे सहज सोपे आहे की प्रेक्षक डकैतांच्या या गोष्टीत हरवून जातात. हे श्रेय विजय ग्रोवर या नव्या दमाच्या स्क्रिन प्ले आणि डायलॉग रायटरचं.

अप्रतिम हा एकमेव शब्दच सोनचिड़ियासाठी आहे.

Similar News