शिवसेना-भाजपाची युती, विरोधक खूश

Update: 2019-02-18 08:17 GMT

भारतीय जनता पक्षासोबतची शिवसेनेची युतीची बोलणी संपली आहेत. भाजपासोबतच संसार करायचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. लोकसभा निवडणूकीतील जागा वाटपाचं सूत्र ही ठरलं असून शिवसेनेची आता कशालाच हरकत नाहीय. नरेंद्र मोदी सरकार वर सतत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अखेर अडचणीच्या काळात नरेंद्र मोदींची साथ द्यायचा निर्णय घेऊन मोदींचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवसेनेच्या या निर्णयामुळे शिवसेनेचा नक्की फायदा होणार आहे की तोटा.. मोदी लाट ओसरत असताना शिवसेनेला युतीचा निर्णय महागात पडणार नाही ना.. नेमकं काय होईल या युतीमुळे.

मोदी लाट आणि पुलवामा हल्ला

मोदी लाट ओसरत चाललीय याचा अंदाज शिवसेनेला आधीच आला होता. त्याचमुळे शिवसेनेने इतर कुठल्याही पक्षापेक्षा जास्त आक्रामक भूमिका घेत मोदींवर हल्ला सुरूच ठेवला होता. घर ही सोडायचं नाही आणि नीट नांदायचंही नाही अशी टीका शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांनी सुरू केली होती, मात्र तरीही शिवसेना टिकून राहिली, कारण सत्तेच्या बाहेर राहणं शिवसेनेला अनेक अर्थानी परवडणारं नव्हतं. शिवसेना फुटू ही शकली असती.

नुकत्याच झालेल्या हिंदी पटट्यातील निवडणूकांमध्ये पराभवानंतर भाजपाची पट्टीही काहीशी खाली उतरली आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा लोकांमध्ये हलका का होईना पण प्रतिसाद मिळू लागला आहे. अशातच पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा माहौल बदलून गेला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराने सुरू केलेल्या कारवाईचा पुरेपुर वापर मोदी येत्या निवडणूकीत करतील हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे येत्या काळात केंद्रातल्या सत्तेला असलेला धोका कमी झाल्याचं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे.

विरोधक सुखावले..

शिवसेना – भाजपाच्या युतीमुळे राज्यातल्या विरोधी पक्षाला मात्र दिलासा मिळाला आहे. शिवसेनेने सरकार आल्यापासून सतत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर कब्जा केला होता. शिवसेनेने जितक्या आक्रामकपणे विरोधीपक्षाच्या अवकाशावर आक्रमण केलं होतं तितका आक्रामकपणा काँग्रेस-एनसीपी ला ही आणता आला नव्हता. शिवसेनेचा आक्रामकपणा असाच कायम राहिला असता तर राज्यातला भाजपाविरोधातला मतदार आपसूक शिवसेनेकडे वळला असता. सरकारविरोधी वातावरणाचा फायदा विरोधी पक्षांना न मिळता एकाचवेळी सत्तेत असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेला मिळाला असता. मात्र, आता शिवसेनेने विरोधी पक्षातील आपली जागा रिकामी केल्यामुळे काँग्रेस-एनसीपीला एक प्रतिस्पर्धी कमी झाला आहे. युतीमुळे चौरंगी लढती एवजी थेट लढत होईल. सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शिवसेनेपेक्षा सरकार सोबत असलेली शिवसेना विरोधी पक्षांना केव्हाही परवडणारी आहे.

मुद्दा कुठला

राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येणार नाही याची चाचणी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी दुसऱ्या मुद्द्यांकडे आपला मोर्चा वळवताना दिसली होती. शिवसेनेने नेमका हाच मुद्दा भाजपाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला. मधल्या काळात शिवसेनेने उत्तरप्रदेश वारी करून भाजपाला अडचणीच्या असलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता हिंदुत्वाच्या मुद्द्याला पर्याय म्हणून देशभक्तीचा मुद्दा मिळाला असून शिवसेनेला या नवीन मुद्द्यावर भाजपासोबत आपणही तरून जाऊ असा विश्वास वाटू लागला आहे.

मोठा भाऊ कोण.. ?

शिवसेना-भाजपा मध्ये मोठा भाऊ नेमका कोण याचा फैसला दरवेळी लागेलच असं नाही,मात्र या मुद्द्यावर आता शिवसेनेनंही आपली तलवार म्यान केली आहे. निवडणूकीत फायदा होताना दिसत असल्याने भारतीय जनता पार्टीलाही मोठा भाऊ मानायला शिवसेना आता तयार आहे. लोकांमध्ये जाऊन करायच्या वल्गना आणि बैठकीतल्या तडजोडी यात जमीन-अस्मानाचा फरक असून शिवसेनेने आता भाजपा सोबत जुळवून घ्यायचं मान्य केलं आहे. यात शिवसेनेची झाकली मूठ सव्वा लाखाची राहणार आहे.

- रवींद्र आंबेकर

Similar News