ओरिजनल मिस्टर YaHoo
हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल टिपिकल फिल्मी हीरो अशी ओळख असलेल्या शम्मी कपूर यांच्या जीवन प्रवासावर हेमंत देसाई यांनी टाकलेला प्रकाश... नक्की वाचा;
ज्या काळात केवळ सूर्य किंवा चंद्राच्या साक्षीने गोष्टी होत होत्या, त्या काळातला तो हीरो. आत्ताच दात घासले, नंतर तोंड धुतले, तोंडाचा चंबू केला, की टाक सोशल मीडियावर फोटो, असा तो काळ नव्हता. आज केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत आयकॉन्स तयार केले जातात.
सोशल मीडिया किंवा टीव्ही देखील नसताना, मग बॉलीवूडचे हीरो तयार तरी कसे झाले? तर त्या काळात पोस्टर्स, बॅनर्स, विविध भारती, रेडिओ सिलोन, नाक्यानाक्यावरच्या पानबिडीच्या दुकानांत मिळणारी गाण्याची बुकलेट्स, फिल्म इंडिया, फिल्मफेअर, माधुरी, भानुविलास थिएटरच्या वि वि बापटांचे छाया, र गो सरदेसाईंचे तारका यासारखी मासिके- हे सारे होते.
सर्वच गैरफिल्मी मासिकांमधून ज्या कथा प्रसिद्ध होत, त्यातील चित्रे हिंदी सिनेमातल्या नायक-नायिका समोर ठेवून काढली जायची! कथा-कादंबर्यांकच्या पुस्तकांची कव्हर्स अशाच प्रकारची. या पद्धतीने हीरोहीरोइन्सच्या प्रतिमा तयार केल्या जात.'गुड्डी' सिनेमातली नायिका जया भादुरी जेव्हा मुंबईत येते, तेव्हा टिळक ब्रीजवरच्या बॅनरवर 'तुमसे अच्छा कौन है' या शम्मी कपूरच्या चित्रपटातले बॅनर बघून आपण फिल्मी दुनियेच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहोत, असेच कदाचित तिला वाटते.. हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल टिपिकल फिल्मी हीरो कसा असावा, हे शम्मी कपूरने दाखवून दिले.
सिनेमातले त्याचे हावभाव, बोलण्याची पद्धत, नाचण्याची रीत हे सर्व फिल्मी वळणाचे होते. मी लहानपणी मुंबईत यायचो, तेव्हा मला माहीत नव्हते की, मोठेपणी मी मुंबईचाच कायम होऊन जाणार आहे! त्यावेळी ग्रँट रोडला मामाकडे यायचो, तेव्हा तेथून जवळच मलबार हिल, नेपियन सी रोड हा भाग होता. आणि त्या भागात तेव्हा शशी कपूर, शम्मी कपूर वगैरे बरेच फिल्मी कलावंत राहत असत. पेडर रोडला स्नेहप्रभा प्रधान राहायच्या, ज्यांच्यावर रामदास भटकळ यांनी अतिशय मनापासून लिहिले आहे.
गावदेवीला अमोल पालेकर होता. 1960 च्या दशकात केव्हातरी शम्मी कपूरने भरधाव कार चालवल्याबद्दल, त्याला दंड झाल्याची बातमी वाचल्याचे आठवते. ज्यावेळी इंटरनेट आले, तेव्हा त्याचा जवळजवळ प्रथम वापर करणाऱ्यांमध्ये शम्मी कपूर होता. तो इंटरनेट यूजर्स कम्युनिटी ऑफ इंडियाचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. कपूर फॅमिलीची वेबसाइट तयार करून, सर्व कुटुंबियांची ताजी माहिती तो त्यावर टाकत असे. वेबसाइटच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क ठेवत असे. शम्मी कपूरचे याबाबतीतले वेगळेपण मला अधिक महत्त्वाचे वाटते.
शम्मी हा भारताचा 'एल्विस प्रेसले' होता. शम्मी कपूरला नाचताबिचता काही येत नव्हते. फक्त तो आपल्याला नाचता येते, असा उत्तम अभिनय करत असे! हे त्याला जमायचे, कारण त्याच्या अंगात संगीत आणि लय भिनलेली होती. हॉलीवूडमधले लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत, याची तो त्या काळात माहिती घेत असे आणि त्यातल्या काही गोष्टी उचलत असे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. पृथ्वी थिएटरमध्ये केवळ 50 रुपये मासिक वेतनावर शम्मीने नाटकांतून कामे केली.
शम्मीच्या डान्सिंग मूव्हजला 'गार्डन टाॅड' असे म्हटले जाते. त्यात मुख्यतः मान हलवण्याचा भाग असतो. 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' हे गाणे आठवा. त्यात शम्मी, मुमताज हे ज्या पद्धतीने हात आणि मान हलवतात, ते डोळ्यासमोर आणा. त्यामध्ये एका क्षणी मुमताज ही प्राणला सुद्धा तशीच मान हलवायला भाग पडते, ते बघताना खूप हसू येते. आणि गाण्याच्या मध्येच शम्मीकडे प्राण एक डोळा तिरका करून ज्या पद्धतीने बघतो, त्यामुळे गाण्याची रंगत आणखीच वाढते! सायराबानूचा पहिला हीरो शम्मी कपूर होता, तो चित्रपट म्हणजे 'जंगली'. त्यानंतर 'ब्लफमास्टर'मध्ये हे दोघे होते आणि 'जमीर'मध्ये मात्र शम्मीने तिच्या वडिलांचे काम केले होते. 'परवरीश'मध्ये अमिताभ बच्चनच्या वडिलांचे काम शम्मीने केले.
1955 च्या 'रंगीन रातें'च्या सेटवर शम्मीची गीताबालीशी भेट झाली. त्यातले एक गाणे आज सकाळीच मी ऐकले. पहिल्या भेटीनंतर चार महिन्यांतच त्यांनी लग्न केले. परंतु गीताबालीचे 1965 चाली देवीमुळे निधन झाले. त्या दोघांना आदित्य राज कपूर आणि कांचन ही अपत्ये झाली. गीताच्या निधनामुळे शम्मी कोलमडून पडला होता. त्यानंतर चार वर्षांनी शम्मीने भावनगरच्या राजघराण्यातील नीलादेवीशी 1969 साली विवाह केला. शम्मीच्या वहिनीने, म्हणजे कृष्णा कपूरने त्याला हे स्थळ सुचवले. भावनगरला शूटिंगसाठी गेला असताना शम्मी नीलाला भेटला. आपण मुले होऊ द्यायची नाहीत आणि केवळ आदित्य व कांचनला सांभाळायचे, या अटीवर शम्मीने तिच्याशी विवाह केला होता.
नीलादेवीने हा शब्द पाळला. शम्मी पूर्वी जेव्हा श्रीलंकेला गेला होता, तेव्हा त्याची भेट नादिया गमाल या इजिप्तच्या बॅलेसुंदरीशी झाली. साधारण हा 1953 चा सुमार होता. परंतु नादिया हिला इजिप्तला परतावे लागले आणि मग दोघे वेगळे झाले. शम्मीने 'अमारन' या एका तामिळ चित्रपटात अभिनय केला असून, तो कमालीचा यशस्वी झाला होता, हे कोणालाही माहिती नसेल! 1953 साली शम्मीने 'जीवनज्योती' या चित्रपटातून रूपेरी कारकीर्द सुरू केली.
हा सिनेमा हिट झाला होता. शम्मीने सिंगापूर, चायना टाउन, कश्मीर की कली, ॲन इव्हिनिंग इन पॅरिस, पगला कहीं का आणि जाने अंजाने या शक्ती सामंता यांच्या सहा चित्रपटांत भूमिका केल्या. शम्मीला मुमताजशी विवाह करायचा होता, परंतु तिने त्यास नकार दिला. कारण 'लग्नानंतर तुला सिनेमात काम करता येणार नाही' असे शम्मीने सांगितले होते. टिपिकल पुरुषी मानसिकता असलेला तो नट होता. शम्मीचे मूळ नाव शमशेर. हा लहानपणी कोलकत्त्यात होता. कारण तेव्हा पृथ्वीराजजी हे तेथे रंगभूमीवर काम करत होते आणि न्यू थिएटर्सच्या चित्रपटांतूनही. मात्र शम्मीवर बंगाली संस्कृतीचा कुठलाही प्रभाव दिसून येत नाही! शालेय वयातच शम्मी मुंबईला आला, तेव्हा वडाळ्याला सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये आणि नंतर डॉन बॉस्को स्कूलमध्ये तो शिकला.
वडाळ्याच्या फाइव्ह गार्डनकडून आपण वडाळा स्टेशनकडे येतो, तेव्हा कॉर्नरला सेंट जोसेफ आहे आणि डावीकडे वळून सरळ गेले की डॉन बॉस्को! 'कपूर्स' पूर्वी त्या भागातच राहायचे. केवळ तेच नव्हे, तर मदनपुरी, के एन सिंग, राजेंद्रसिंग बेदी हे त्याच परिसरात राहायचे. केएन हे पृथ्वीराज कपूर यांचे मित्र. 'आवारा'मध्ये ते व्हिलन आहे. पण दोघांची साॅलिड दोस्ती होती. मी त्या परिसरात फिरायला जायचचो, तेव्हा केएन हे काठी घेऊन आपल्या बंगल्यांमध्ये फेरी मारत असत आणि कोणाची नजरानजर झाली, की त्यांच्या स्टाइलमध्ये एक भुवई वर करून बघत असत... काही वर्षे सहगलही तेथे राहत होता आणि दादर टीटीच्या वा किंग सर्कलच्या कॉर्नरवरील दुकानांच्या पायऱ्यांवरही बसलेला असे म्हणे! बेदींचे माटुंग्याचे घर दोनतीन वर्षांपूर्वीच मी बघून आलो आणि त्याच परिसरात 'आफ्रिका हाऊस' मध्ये शंकर वैद्य आणि सरोजिनी वैद्य राहत असत, त्यांच्याकडेही मी गेलो आहे. असो. त्यानंतर नव्या घरी राहायला गेल्यावर शम्मी कपूर न्यू एरा स्कूलमध्ये शिकला. ही शाळा ह्यूजेस रोडवर आहे.
शम्मी रुईया कॉलेजमध्ये अल्पकाळ होता. पण तिथे तो आणखी टिकून राहिला असता, तर रूईयाच्या कट्ट्यावर त्याला अनेक रंगकर्मी दोस्त म्हणून मिळाले असते! शम्मीचा पहिला चित्रपट जो 'जीवनज्योती' होता, त्यात त्याची नायिका चाँद उस्मानी होती. यथावकाश चाँद ही सहनायिका, चरित्र अभिनेत्री म्हणूनच काम करत राहिली. रेल का डब्बा, गुल सनोबर, लैला मजनू, ठोकर, खोज, शमा परवाना, चोर बजार, मेहबूबा, ऐहसान,साहिल, तांगेवाली, मिस कोकाकोला, नकाब, डाकू, सिपाहसालार, मेमसाहिब, महाराणी, कॉफी हाऊस, मोहर, रात के राही, कॉलेज गर्ल, बसंत, प्यार किया तो डरना क्या, जब से तुम्हे देखा है, प्रीत न जाने रीत, छोटे सरकार हे शम्मीचे चित्रपट फारसे कोणालाही माहिती नाहीत.
'शहीद भगतसिंग'मध्ये शम्मीने भगतसिंगचे काम केले होते, हे ते किती जणांना माहिती आहे? शम्मीच्या 'बॉयफ्रेंड'मध्ये मधुबाला त्याची नायिका होती आणि त्यात धर्मेंद्रने पोलीस इन्स्पेक्टरचे काम केले होते. हा चित्रपट मी पुण्यात डेक्कन टॉकीजला मॅटिनीला बघितला होता. शम्मी कपूर आणि लीना चंदावरकर यांचा 'प्रीतम' श्रीकृष्ण टॉकीजमध्ये पिटात बसून 75 पैसे तिकिटावर बघितला होता! त्यात शम्मीपेक्षा मेहमूदनेच अधिक धमाल केली होती.. शम्मीचे मोजके चित्रपटच हिट झाले आणि तेच लोक पुन्हा पुन्हा बघतात. परंतु बाकीचे चित्रपट चालले नाहीत व मॅटिनीलाही फारसे लागले नाहीत किंवा टीव्हीवरही लागत नाहीत. मात्र ब्लॅक अँड व्हाइटमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात, शम्मी कपूर उंच, सडसडीत होता आणि तेव्हा तो मिशा राखत असे. त्यावेळी तो अतिशय तरतरीत आणि उमदा दिसत असे. त्याच्यात फिल्मीपण आले नव्हते. अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे गुण होतेच. उंचेपुरे व्यक्तिमत्त्व.
आवाजाचा वापर कसा करायचा आणि प्रसंगी भावुकता कशी आणायची हे त्याला नीट कळे. परंतु त्याला बिमलदा, ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांच्यासारखे उत्तम दिग्दर्शक मिळाले असते, तर त्याच्यातला फिल्मीपणा कमी झाला असता. शम्मी कपूर हा मुळात उस्फूर्त कलावंत आहे, मात्र केवळ व्यापाराचा विचार करणाऱ्या टुकार निर्माता-दिग्दर्शकांनी अनेक चांगल्या अभिनेत्यांचा 'कोळसा' करून टाकला होता, त्यातला एक म्हणजे शम्मी कपूर! कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण नसिरुद्दीन एकदा म्हणाला होता की, शम्मी कपूर हा माझा आवडता अभिनेता आहे! यावरून लक्षात येईल, की शम्मी हा अभिनेता म्हणून उत्कृष्ट होता. पण एकाच साच्यात चित्रपटाच्या चकल्या पाडणार्या बॉलीवूडकरांनी त्याचा मिसयूजच अधिक केला.. त्यामुळे पडद्यावर तो नेहमीच ढोबळ, बटबटीत, त्याच त्या भूमिका केल्या. त्याच्या अभिनयात अतिरंजितपणा असे, तो दिग्दर्शकामुळे आणला गेला आणि त्याचेच कौतुक होत गेले! त्यामुळे त्याच्यातला अस्सल अभिनेता हरवून गेला.. नाटकातला अभिनय असतो, तसा शम्मी सिनेमात करत होता आणि लोक टाळ्या वाजवत होते! वास्तवातला शम्मी कपूर हुशार, टेकसॅव्ही, आधुनिक होता.
ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातला शम्मी कपूर आकर्षक होता. रंगीत चित्रपटांत तो बेढब, बोजड दिसत होता. तरीसुद्धा रफीच्या गाण्यांवर तो थिरकत असल्यामुळे प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतला. मात्र त्या शम्मी कपूरपेक्षा मला सुरुवातीचा सहजसुंदर अभिनय करणारा, ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातला शमशेर उर्फ शम्मी कपूर अधिक आवडतो. काही वर्षांपूर्वी शम्मी कपूरवर 'श्री दीपलक्ष्मी'च्या दिवाळी अंकात मी 'बाबू मोशाय' या नावाने दीर्घ लेख लिहिला होता. तो लेख आता काही माझ्या हाताशी नाही. त्याच्याबद्दल मनात जे जे साचले होते, ते आज उत्स्फूर्तपणे लिहिले आहे. शम्मी कपूरचा आज जन्मदिन. 90 वर्षांचा शम्मी कपूर कसा दिसला असता, याची आपण कल्पनाही करू शकत नाही... 'यहाँ के हम है राजकुमार' या गाण्यातला शम्मीच बहुतेकांच्या डोळ्यासमोर असेल...
हेमंत देसाई, (राजकीय विश्लेषक)