पश्र्चिम आशिया समजावून सांगणारा पत्रकार काळाच्या पडद्याआड - जतीन देसाई

पत्रकाराला कोणताही धर्म नसतो तर तो फक्त पत्रकार असतो, असे मानणारे ज्येष्ठ पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कामाचे महत्त्व आणि पत्रकारितेचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी....

Update: 2020-11-09 14:13 GMT

पश्चिम आशियाला किंवा अरब दुनियेला आपले घर मानणारा चाळीस वर्षाहून अधिक काळ तिथे राहणारा ब्रिटन-आयर्लंड येथील पत्रकार रॉबर्ट फिस्कचं ३० ऑक्टोबरला निधन झालं. पश्चिम आशिया समजून घेणाऱ्यांनी फिस्कचं लिखाण वाचणं अत्यावश्यक आहे. किंबहुना, असं म्हणता येईल की, फिस्कच्या बातम्या, विश्लेषण आणि पुस्तक वाचल्याशिवाय पश्चिम आशिया नीट समजणारच नाही. पश्चिम आशिया अतिशय गुंतागुंतीचा आहे. या भागात अमेरिकेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे.

दहशतवादी ओसामा बिन लादेनची तीन वेळा मुलाखत घेणारा तो एकमेव पत्रकार. त्याच्या ४० वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्याने सीरियातील युद्ध, इराक-इराण युद्ध, लेबनॉनमधील युद्ध, अफगाणिस्तानात सोव्हिएत रशियाने केलेलं आक्रमण, अल्जिरियातील यादवी युद्ध, इराकवर अमेरिकेने केलेलं आक्रमण, २०११ मधील अरब क्रांती, पॅलेस्टाईन येथील घडामोडी सारख्या अनेक बाबतीत त्यांनी विपुल प्रमाणात लिहिलं. या प्रत्येक वेळेस त्यांनी स्वतः त्या त्या भागात जाऊन बातम्या दिल्या आणि या सगळ्या इतिहासाचा तो साक्षीदार झाला. अरब जगात त्यांचा प्रचंड संपर्क होता. अरबी भाषा त्याला सहज येत होती. अमेरिका किंवा ब्रिटनमधील अनेक पत्रकार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली की पश्चिम आशियात मोठ्या संख्येने बातम्यांसाठी येतात. परंतु, त्यातले अनेक जण हॉटेलच्या रूममध्ये बसून दुभाषी किंवा इतर स्थानिक पत्रकारांच्या मदतीने बातम्या व विश्लेषण करत असतात, असा त्यांचा अनुभव होता. फिस्क त्यांचा उल्लेख 'हॉटेल जर्नालिझम' असं करत. 'गोदी मीडिया' च्या विरोधात फिस्क बोलत असे.


अत्यंत परखड शब्दात फिस्क लिहीत होते. अरब जगात अशांतता निर्माण करण्यात अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचं ते सतत मांडत असत. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आल्फ्रेड हिचकॉकची 'फॉरेन करस्पॉन्डन्ट' नावाची फिल्म पाहिलेली आणि तेव्हाच त्यांनी आपण फॉरेन करसस्पाँडन्ट होऊ असं ठरवलेलं होतं. १९८९ पासून ब्रिटनच्या द इन्डिपेंडन्ट नावाच्या दैनिकात काम करणारे फिस्क सर्वात अधिक लोकप्रिय फॉरेन करस्पॉडंन्ट होते. त्यापूर्वी त्यांनी द संडे एक्सप्रेस आणि द टाइम्समध्ये काम केलं होतं. परंतु संपादकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी द संडे एक्सप्रेसमधून राजीनामा दिला. द टाइम्सचे मालक रुपर्ट मरडॉकशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी तिथून राजीनामा दिला.


फिस्कने पहिल्यांदा ६ ऑक्टोबर १९९३ ला ओसामा बिन लादेनची मुलाखत सुदानमध्ये घेतली. ओसामाची मुलाखत घेणारा फिस्क पाश्र्चात्य देशाचा पहिला पत्रकार होता. तेव्हा ओसामा बद्दल अनेकांना माहिती देखील नव्हती. अफगाणिस्तानातून ओसामा सुदानला आला होता. त्याच्यासोबत अनेक कट्टर इस्लामी अरब मारेकरी देखील आले होते. त्यांनी सुरुवातीला फिस्कला आपण अफगाणिस्तान बद्दल काही बोलणार नाही असं सांगितलं. मात्र नंतर ओसामाने अफगाणिस्तान बद्दल सविस्तर माहिती फिस्कला दिली. सोव्हिएत लष्कराच्या विरोधात आपण मुजाहिदीनची मदत केली आणि शेवटी सोव्हिएत लष्कराला परत सोव्हिएत रशियाला जाणं भाग पाडलं, असं ओसामाने फिस्कला सांगितलं. त्यांनी सांगितलं, की " अफगाणिस्तानवर सोव्हिएत लष्कराने आक्रमण केल्याच्या बातमीने मला प्रचंड संताप आला होता आणि काही दिवसातच म्हणजे १९७९ वर्ष संपण्याआधीच मी अफगाणिस्तानला पोहोचलो."

सोव्हिएत लष्कर गेल्यानंतर मुजाहिदीनने काबूलवर कब्जा केला. त्याबद्दल ओसामाने म्हटलं," माझ्या मुजाहिदीनचा सोव्हिएत लष्करावर विजय झाला. परंतु लगेच मुजाहिदीन नेत्यांमध्ये भांडण सुरू झाली. शेवटी मी तिथून निघालो आणि सुदानमध्ये रस्ते बांधण्याच्या कामाची सुरुवात केली." मुजाहिदीनमध्ये भांडणं सुरूच होती. त्या काळात तालिबानचा प्रभाव वाढत होता. १९९६ च्या सप्टेंबर महिन्यात काबूलवर तालिबानने नियंत्रण मिळवलं. ओसामा तेव्हा अफगाणिस्तानात होता आणि तालिबानला सर्व प्रकारची मदत करत होता. तालिबानने सोव्हिएत काळातील अफगाणिस्तानचे सर्वेसर्वा नजीबुल्ला यांना भर रस्त्यावर फाशी दिली. ओसामा तेव्हा अफगाणिस्तानात होता आणि तालिबानला सर्व प्रकारची मदत करत होता. फिस्क जुलै महिन्यात ओसामाला दुसऱ्यांदा भेटले. यावेळी ही भेट अफगाणिस्तानच्या नगरहार प्रांतात झाली होती. तेव्हा ब्रिटनने सौदी अरेबिया व पश्चिम आशियातील इतर काही देशातून त्यांचं सैन्य परत बोलावून घ्यावं असं ओसामाने म्हटलं होतं.


अमेरिकेने तालिबान, अल् कायदाला धडा शिकवण्यासाठी २००१ च्या शेवटी अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. अल कायदानो सप्टेंबर महिन्यात अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याला अमेरिकेचे हे उत्तर होतं. मुल्ला ओमर, ओसामा व इतर दहशतवादी पळून अफगाण-पाकिस्तान सरहद्दीवर गेले. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला पख्तुन समाजातील लोक राहतात आणि येथे एका देशातून दुसऱ्या देशात सहज जाता येतं. तेव्हा सरहद्दीच्या दोन्ही बाजूला म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अमेरिकेच्या विरोधात वातावरण होतं. लोकांमध्ये संताप होता. त्या भागात बाहेरच्या कोणालाही जाणं शक्य नव्हतं आणि त्यातही श्वेतवर्णीय लोकांना तर अजिबातच नाही. फिस्क मात्र‌ गेले. श्वेतवर्णीय पत्रकारांला पाहून लोकं संतापली. अफगाण स्थलांतरित लोकांनी त्यांना मारहाण केली. त्याबद्दल नंतर त्यांनी लिहिलं," मी जर त्यांच्या जागी असतो तर मी देखील तसंच केलं असतं."

फिस्क बैरुत शहराच्या प्रेमात होते. १९८२ मध्ये सीरियाच्या हामा शहरातील लोकांनी मुस्लिम ब्रदरहूडच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष हाफिज अल-असदच्या विरोधात बंड केलेलं. सीरियाच्या लष्कराने केलेल्या कारवाईत पंधरा हजाराहून अधिक लोक मारले गेलेले. त्यात महिला व मुले देखील मोठ्या संख्येने होते. हामा येथे पोहोचणारा पहिला पत्रकार म्हणजे फिस्क. नंतर २०१८ मध्ये सीरियाच्या दमास्कसच्या दाऊमा भागात बशीर अल-असदने रासायनिक शस्त्र वापरली असल्याचा आरोप होता. पाश्र्चिमात्य देशांनी रासायनिक शस्त्र वापरल्याबद्दल सीरियन सरकारवर प्रचंड टीका केली होती. तेव्हा फिस्कने सीरियन सरकारने रासायनिक शस्त्र वापरले की नाही, ते स्पष्ट नसल्याचे म्हटलं होतं. तेव्हा फिस्क सीरियन सरकारच्या बाजूने भूमिका घेत असल्याची टीका करण्यात आली होती.

एका मुलाखतीत ओसामाने फिस्कला म्हटलं, "मला तुमच्यात एक सच्चा मुसलमान दिसतो." तेव्हा फिस्कने सरळ उत्तर दिलं," मी पत्रकार आहे." फिस्कच्या विश्लेषणाकडे जगाचं लक्ष असायचं. स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या फिस्क सारख्या पत्रकारांची आज अधिक आवश्यकता आहे.

Tags:    

Similar News