देशातील नागरिकाची ओळख कोणती?
अभिनेते किरण माने यांनी भाजपविरोधात मतप्रदर्शन केले म्हणून त्यांना स्टार प्रवाहवरील मालिकेतून काढण्यात आले आहे, असा आरोप होतो आहे. विक्रम गोखले, शरद पोंक्षे यांच्यासारखे अभिनेते त्यांची राजकीय मतं जाहीरपणे व्यक्त करत असताना त्यांच्याबाबतीत कोणतीही कारवाई होत नाही पण भाजप आणि विशिष्ट विचारधारांविरुद्ध बोलल्यावर कलाकाराला काढले जाते, हा कोणता न्याय, असा सवाल उपस्थित करत परखड विश्लेषण केले आहे पत्रकार गणेश कनाते यांनी...;
आपली ओळख कोणती? जात-पंथ-संप्रदाय-धर्म यांच्या आधारे निर्माण होते ती की भारतीय राज्यघटना आपल्याला प्रदान करते ती? आपली ओळख आणि अस्मिता जात-पंथ-संप्रदाय-धर्म यांच्या आधारे निर्माण करायची-टिकवायची की एक देश-एक नागरिक या आधारे निर्माण करायची-टिकवायची? हा या देशातील नागरिकांसाठीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असायला हवा. या प्रश्नाची पार्श्वभूमी भारत-पाकिस्तानच्या विभाजनाच्या, पाकिस्तान-बांग्लादेशच्या विभाजनाच्या प्रक्रियेच्या मुळाशी निगडीत आहे. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आपण आजवर न देऊ शकल्याने आजची स्थिती निर्माण झालेली आहे.
वरवर बघता भारत-पाकिस्तान हे दोन देश धार्मिक अस्मितेच्या प्रश्नावर एकमत न झाल्यामुळे विभाजान होऊन अस्तित्वात आलेले देश आहेत. जर हे १००% खरे असते तर ज्या भूभागाला पाकिस्तान म्हणून ओळख मिळाली तिथले सगळे गैर-मुसलमान यांनी भारतात स्थलांतरित व्हायला हवे होते आणि ज्या भूभागाला भारत म्हणून ओळख मिळाली त्या भूभागातील सर्व मुसलमानांनी पाकिस्तानात स्थलांतरित व्हायला हवे होते. परंतू दोन्ही नवनिर्मित देशांतील तेव्हा अल्पसंख्य होऊ घातलेल्या हिंदू आणि मुसलमानांनी विविध कारणांनी आपापल्या जन्मस्थळी टिकून राहण्याचा निर्णय घेतला.
त्याचमुळे आज भारतात मुसलमानांची लोकसंख्या जवळजवळ २१.३० कोटी एवढी असून ती एकूण भारतीय लोकसंखेच्या १५.५% आहे. तुलनेत भारतातील हिंदूंची सख्या ९६.६३ कोटी एवढी असून ती एकूण लोकसंख्येच्या ७९.८% एवढी आहे. १९५१ साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार त्यावेळी मुसलमानांची लोकसंख्या ३.५४ कोटी इतकी होती आणि ती एकूण लोकसंख्येच्या ९.८% इतकी होती तर हिंदूंची लोकसंख्या १९५१च्या जनगणनेनुसार ३०.५ कोटी इतकी होती आणि ती एकूण लोकसंख्येच्या ८४.१% होती. एका अभ्यासातून मांडलेल्या आकडेवारीनुसार २०५० साली जगातील सर्वाधिक हिंदू आणि मुसलमान भारताचे नागरिक असतील.
आजघडीला आपली पहिली चिंता आपला देश, आपले नागरिक आणि त्या नागरिकांत निर्माण केली जाणारी जात-पंथ-संप्रदाय आणि धार्मिक अस्मितेच्या आधारावर निर्माण केली जाणारी ओळख आणि अस्मिता ही आहे. कारण या जाणीवपूर्वक निर्माण केल्या जाणाऱ्या ओळखीमुळे देशात दुफळी माजण्याची स्थिती निर्माण होत आहे. काहींच्या मते तर ती आधीच निर्माण झालेली आहे आणि ती भविष्यात अधिकाधिक चिंताजनक होत जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातल्या काही घटनांकडे पहिले पाहिजे आणि आज जी घटना आपल्या समोर आहे ती एका मराठी कलाकाराला त्याने सार्वजनिकरीत्या स्वतःची राजकीय मते व्यक्त केली म्हणून स्टार प्रवाह या करमणूक वाहिनीने त्याला एका मालिकेतून काढून टाकले आहे, या घटनेकडे पाहिले पाहिजे. एकीकडे, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, आरोह वेलणकर इत्यादी मराठी अभिनेत्यांनी त्यांची राजकीय मते स्पष्टपणे व्यक्त केली असतानाही त्यांना जर कुणी नाटकातून, वाहिन्यांतून आणि चित्रपटांतून काढून टाकत नसेल तर केवळ संघ आणि भाजप या विशिष्ट विचारधारांना समर्पित विचारव्युहांना एखादा कलाकार/अभिनेता जर विरोध करत असेल आणि त्याला मालिकेतून काढून टाकण्याचा एखादी वाहिनी निर्णय घेत असेल तर पुरोगामी विचारांच्या कलावंतांनी/लेखकांनी/विचारवंतांनी निःसंदिग्ध शब्दांत याचा विरोध केला पाहिजे. गरज पडल्यास रस्त्यावर येऊन विरोध केला पाहिजे.
(मी सरसकट मराठी करमणूक वाहिन्यांचे कोणतेही कार्यक्रम बघत नसल्याने या कलावंताच्या अभिनय क्षमतेबद्दल माझे चांगले किंवा वाईट असे कोणतेही मत नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
आपण कोण आहोत? आपण आधी हिंदू आहोत, मुसलमान आहोत, ख्रिश्चन आहोत, बौद्ध आहोत, जैन आहोत, शीख आहोत की सर्वप्रथम भारतीय आहोत हा कळीचा प्रश्न आहे. याचे आपण सुस्पष्ट उत्तर दिले पाहिजे. माझे उत्तर आहे की आपण सर्वप्रथम भारतीय आहोत. कोण्या एकाचा धर्म हा त्याच्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा मोठा असूच शकत नाही. या देशातील सर्व नागरिकांनी या देशाच्या घटनेला त्यांच्या धर्मग्रंथांपेक्षा जास्त महत्व दिले पाहिजे. हे जर मान्य केले तर आपल्या ओळखीचा, अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न जो अधिकाधिक किचकट होत चाललाय तो सोडवावायला मदत होईल.
म्हणून या राज्यातील जनतेने या कलाकाराच्या मागे उभे राहिले पाहिजे, या राज्याच्या सरकारने या वाहिनीस सुयोग्य समाज दिली पाहिजे आणि जो कुणी दोषी असेल त्या व्यक्तीवर/संस्थेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.