अनिल गेला आणि मित्रत्वाचे आणखी एक पर्व संपले- अरुण खोरे

जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या निधनानंतर अनिल गेला आणि मित्रत्वाचे आणखी एक पर्व संपले, अशा शब्दात जेष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी अनिल अवचट यांच्यासोबतचे अनुभव मांडले आहेत.;

Update: 2022-01-27 12:36 GMT

आज सकाळीच साडे दहाच्या सुमारास डॉ.अनिल अवचट निधन पावल्याची बातमी समजली. मुंबईवरून लक्ष्मण गायकवाड यांचा फोन आला.पुण्यात दत्ता काळेबेरे यांच्याशी बोललो.

दुपारी अर्जुन डांगळे यांचा फोन आला. अर्जुनचे अलीकडेच दलित पॅंथर : अधोरेखित सत्य, हे नवे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. अर्जुनला या पुस्तकाची प्रत अनिलला द्यायची होती पण ते राहून गेल्याची खंत त्यांच्या बोलण्यात होती.

या पुस्तकात साप्ताहिक मनोहरसाठी दलित पँथर फुटीच्या वादासंदर्भात अनिल अवचट यांनी ज्या मुलाखती घेतल्या होत्या,त्याचे संदर्भ अर्जुनने दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक त्याला द्यायचे राहून गेले, ही खंत त्याच्या बोलण्यात वारंवार येत होती.

समाजाची खोल बांधीलकी असलेला,समाजातील प्रश्नांवर आणि माणसाच्या जगण्याच्या प्रश्नावर सतत लिहिणारा एक लेखक आपल्यातून निघून गेला.अनिल आपल्या सर्वांचा मित्र होता...

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात डॉ. बाबा आढाव यांच्यामुळे एक व्यापक असे सामाजिक आणि वैचारिक स्नेहाचे वर्तुळ निर्माण झाले आहे, या वर्तुळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अनिल अवचट...शिवाय मराठी साहित्यातले त्याचे स्थान इतके वेगळे की त्याची तुलना नाही करता येणार!

महिन्यापूर्वीच अनिलला त्याच्या घरी जाऊन भेटलो होतो. त्याच्याशी तासभर गप्पा मारल्या होत्या. त्याने त्याचे पुस्तक मला भेट दिले होते आणि मीही त्याला माझे गांधीजींच्या कोटेशनचे पुस्तक दिले होते.

अनिलची आणि माझी प्रत्यक्ष भेट होण्यापूर्वी पूर्णिया, या एका सुंदर पुस्तकातून तो मला भेटला होता. या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना होती. या पुस्तकातून अनिलने आम्हाला बिहारमधील एका वेगळ्याच जगात नेले होते. त्यानंतर तो भेटत राहिला... साधनेचा संपादक होता, मराठीतील विविध दिवाळी अंकात दर्जेदार लेखन करणारा एक फिरता असा लेखक होता.

मी सकाळमध्ये विद्यार्थी बातमीदार म्हणून काम करत असतानाच बाबांच्या नाना पेठेतील कार्यालयात जात असे. तेथे अनिल आणि सुनंदाची भेट झाली आणि मग हे नाते जोडले गेले. सकाळमध्ये असलेले वरिष्ठ सहसंपादक आणि नंतर साप्ताहिक सकाळचे संपादक झालेले सदा डुंबरे हे अनिल आणि सुभाष अवचट यांचे गाववाले मित्र, म्हणजे सर्वजण ओतुरचे.त्यामुळे त्यांचे सकाळमध्ये येणे-जाणे असायचे. मी नंतर लोकसत्ताला गेल्यावर देखील आणि काही वेगळ्या बातम्याच्या निमित्ताने अनिल भेटायला येत असे.

लोकसत्ता पुणे आवृत्तीचे कार्यालय पुणे कॅम्प भागात असल्यामुळे तो बऱ्याचदा मुक्तांगण केंद्रावरून लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये येत असे.त्या काळात त्याने मोठ्या प्रमाणात सुनंदासह मुक्तांगण आणि व्यसनमुक्तीसाठी काम केले. त्यांना या कार्यात पु ल आणि सुनीताबाई देशपांडे यांचे मोठे सहकार्य झाले होते.

एकदा अनिल दिवाळीच्या सुमारास आला आणि मी त्याला विचारले, सध्या काय सुरू आहे? त्याने मला त्याच्या शबनम पिशवीतून मोराचे चित्र आणि त्याला जोडलेली कविता अशी शुभेच्छापत्रे दाखवली. दिवाळीसाठी ही शुभेच्छापत्रे लोकांनी विकत घ्यावीत आणि त्यातून मुक्तांगण संस्थेला यांना मदत करावी असे ते आवाहन होते. मग आम्ही ती बातमी छापली.

याबाबत बोलत असताना देखील हातात कागद घेऊन अनिल ओरिगामी चित्र तयार करत होता. त्याचे हे विलक्षण असे सृजनशील हात, आणि त्यात गुंतणारे त्याचे डोके आणि अंत:करण हे काहीतरी वेगळेच रसायन होते!

तो दरवर्षी व्यक्तिचित्रणात्मक असे लेखन मौज दिवाळी अंकात करत असे...

एकदा त्याने 'पुण्यातील तीन व्यावसायिक ',असा एक लेख लिहिला होता. मौज दिवाळी अंकात तो वाचल्यावर मी चकीत झालो होतो. बुधवार चौकातील रतन टॉकीज समोर गाडी लावणारे, भागवत नावाचे चिवडेवाले यांच्यावर एक भाग त्यात होता.सकाळमध्ये असताना आठवड्यामध्ये दोन-तीन वेळा तरी मी आणि डुंबरे, कधीतरी साळुंखे असे या भागवत चिवडेवाल्यांकडे आम्ही जात असू. मौज दिवाळी अंकात वाचल्यावर मी भारावून गेलो आणि मी त्या चिवडेवाल्याकडे गेलो. रामचंद्र भागवत चिवडेवाले असे त्यांचे नाव असावे. त्यांना मी या लेखाचे सांगितल्यावर ते मला म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अवचट येथे येऊन गेले होते. तिथे ते कधीतरी चिवडा पार्सल घेऊन जातात. बोहरी आळीमधल्या एका व्यावसायिकावर ही त्यांनी असेच लिहिले होते.

अगदी अलीकडच्या काळात आर्यन खान आणि समीर वानखेडे असा सामना वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्यावर मला अनिलच्या एका जुन्या पुस्तकाची आठवण झाली. गर्द हे त्या पुस्तकाचे नाव. पुण्यात कुठे अमली पदार्थ किंवा ड्रगसारखे पदार्थ मिळतात आणि त्यात तरुण मुले कशी अडकली आहेत, याचा शोध त्यांनी त्या पुस्तकात घेतला होता. हे पुस्तक साधारण १९८०/८२ च्या दरम्यान पुण्यातील श्रीविद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी यांनी प्रकाशित केले होते. भविष्यात जी संकटे भारतातील तरुणांपुढे वाढून ठेवली होती, त्याचा दूरगामी दृष्टीने शोध घेणारा अनिल हा लेखक होता आणि त्याचे वेगळेपण आणि दूरदृष्टी या पुस्तकातून हे जाणवते,अगदी आजही!

गेल्या महिन्यात अनिलच्या घरी गेलो. सकाळची वेळ होती. त्याला मी संपादित केलेले गांधीजींच्या मराठी इंग्रजी कोटेशनचे पुस्तक दिल्यावर मला अनिलने तुला माझे एक पुस्तक मी देतो,असे म्हणत तो उठला आणि त्याने समोरच्या पुस्तकांच्या कपाटातील एक पुस्तक शोधून मला दिले.

मी सहज त्या पुस्तकांच्या कपाटाकडे नजर टाकली आणि खरोखर नव्याने थक्क झालो! कितीतरी अनिलची पुस्तके त्यात मला दिसत होती. अमेरिका नावाचे प्रकरण असेल, माणसं आणि अशा अनेक पुस्तकांचा एक मोठा लेखक माझ्यासमोर बसलेला होता आणि आम्ही छान गप्पा मारत होतो.

अनिलच्या आवाजात एक कायम प्रेमाचा, जिव्हाळ्याचा ओलावा असायचा आणि त्यामुळे त्याची आपुलकी आपल्या मनाला नेहमीच स्पर्श करणारी असायची.

त्याच्या प्रत्येक कामात आपण बरोबर असले पाहिजे असे आपल्याला वाटायचे आणि त्याचीही तीच भूमिका असायची. त्यामुळेच बाबांच्या कामात आणि नंतर सुनंदाने सुरू केलेल्या त्यांच्या कामात त्याने झोकून देऊन काम केले होते. मराठीमध्ये रिपोर्ताज हा एक लेखन प्रकार गेली काही वर्षे रुळला आहे, त्याचे मोठे श्रेय अनिलला दिले पाहिजे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन, प्रश्न समजून घेऊन, लोकांशी बोलून लिहिले पाहिजे याची एक अतिशय चांगली वाट त्याने मराठी पत्रकारितेत, मराठी साहित्यात घालून दिली आणि आज त्या वाटेवरून अनेक पत्रकार व लेखक विनाअडथळा जाताना आपण पाहतो, तेव्हा अनिलच्या या लेखनाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

गेल्या दोन-तीन वर्षात बाबा आढाव, दत्ता काळेबेरे, शारदा वाडेकर, मुकेश बामणे, मोहन वाडीकर यांच्या अनेक भेटी झाल्या. त्यातून अनिल अवचट यांचीही नवी ओळख किंवा आहे तीच ओळख अधिक समृद्धपणे अधोरेखित झाली.

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीच्या पन्नास साठ वर्षांच्या काळात अनिलने जे योगदान दिले ते योगदान आपल्याला विसरता येणार नाही. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाच्या आरंभीच्या संपादक मंडळात तो होता, कार्यकारी संपादक म्हणूनही तो काम करत होता. शिवाय बाबांच्या बरोबर अनेक सामाजिक चळवळीच्या प्रवासात तो भ्रमंती करत असे.निपाणीतील तंबाखू कामगार महिलांचे दुःख अंधेरनगरी निपाणी, या लेखात त्याने पुरोगामी सत्यशोधकमधून मांडले होते. असे कितीतरी विषय तो सतत लिहीत राहिला होता. आता परवाच्या २०२१ मौज दिवाळी अंकात त्याने बाबा आढाव यांच्यावरही एक सुंदर लेख लिहिला आहे.

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एक मोठे पर्व असलेल्या, एक गाव एक पाणवठा, या पुस्तकाबाबत अनिल अवचट यांनी किती आग्रह केला आणि लिहिण्याचा पाठपुरावा केला होता याचा उल्लेख बाबांनी त्यांच्या या प्रस्तावनेत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अनिलचे वेगळे योगदानही विसरता येणार नाही.

बाबांची दोन्ही मुले अलीकडेच पुण्यात आली होती. त्यावेळी अंबरने आढाव आणि अवचट कुटुंबीय एकत्र आल्याचे काही फोटो समाज माध्यमावर शेअर केले होते. त्यावेळी बाबांच्या बरोबर असलेला अनिल किती आनंदात दिसत होता!

आज अनिलच्या निधनाच्या बातमीनंतर शेकडो मित्रांनी फेसबुकवर आणि व्हाट्सअपवर फोटोसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुक्ता आणि यशोदा या आपल्या दोन्ही लेकींकडे मुक्तांगणची जबाबदारी सोपवून अनिल निघून गेला आहे. अनिलची वेगवेगळी पुस्तके आणि त्याची सामाजिक उत्तरदायित्वाची स्वच्छ अशी भूमिका आणि त्यांनी सुरू केलेले काम यामधूनच त्याची आठवण आपल्या सर्वांना राहणार आहे. अनिलच्या अनेक गोष्टींची आज आठवण येते. फेसबुकवर मधल्या काळात तो त्याच्या आईच्या संबंधात लिहीत होता. काही दिवस तो नियमितपणे कबिराचे दोहे मराठी करून लिहित असे. तेही आपण वाचत असू. सुंदर आणि साधे मराठी, थेट मनाला भिडणारे हे लेखन हेच अनिलचे वेगळेपण होते.

अनिलसारखा माणूस खूप मोठा असतो, त्याचा सगळाच अवकाश आपल्याला गवसतो असे नाही! जगन्नियंता, काही साचे असे बनवतो; की ते पुन्हा निर्माण होत नाहीत! अनिल अशा दुर्मिळ वर्गातला होता!

अरुण खोरे, पुणे.

(गुरुवार,दि.२७ जानेवारी,२०२२).

Tags:    

Similar News