गांधीजींच्या पर्यावरणवादी विचारांचा वारसा जपणारे उल्हास राणे काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ पर्यावरणवादी उल्हास राणे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने पर्यावरण चळवळीचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होते आहे. उल्हास राणे यांच्या आठवणी जागवल्या आहेत ज्येष्ठ विचारवंत विनय र. र. यांनी;
ज्येष्ठ पर्यावरणवादी, वन्यजीव, पक्षी अभ्यासक आणि वास्तुविशारद उल्हास राणे यांचे मंगळवारी बंगळूरु येथे करोनामुळे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळूरु येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापिका रेने बोर्जेस या त्यांच्या पत्नी होत. व्यवसायाने वास्तुरचनाकार असलेले राणे ८० च्या दशकापासून पर्यावरण चळवळीत सक्रिय होते. वास्तुविशारद, पर्यावरण आणि परिस्थितीकी विज्ञानमध्ये पदव्युत्तर पदविका, समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक पर्यावरण संस्थांच्या उपक्रमांत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. पश्चिम घाट बचाव आंदोलन या १९८७ च्या देशव्यापी मोहिमेचे ते सहसमन्वयक होते. त्याचबरोबर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या उभारणीत सुरुवातीपासून उल्हास राणे यांचा सहभाग राहिला. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे ते दोन वेळा अध्यक्ष होते.
देशातील अग्रगण्य अशा 'सलीम अली पक्षी विज्ञान आणि प्राकृति केंद्र' (सलीम अली सेंटर ऑफ ऑर्नोथोलॉजी अॅण्ड नॅचरल हिस्ट्री-सॅकॉन), कोयम्बतूर या संस्थेचे राणे हे संस्थापक सदस्य होत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) राणे काही काळ विश्वस्त होते. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या जडणघडणीत आणि रचनेत १९८२ पासून त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. मराठी विज्ञान परिषदेतदेखील राणे कार्यरत होते.
मुंबई आणि बंगळूरु येथील 'एन्व्हायरोडिझायनर्स' या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील अनेक वारसा वास्तू, पर्यटनस्थळे यांच्या डिझाईनची कामे केली आहेत. आसामधील देशातील पहिले फुलपाखरू उद्यान उभारण्याचे काम राणे यांनी केले. त्याचबरोबर ईशान्येकडील अनेक राज्यांच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत योजना तयार केल्या.
डाॅ. उल्हास राणे यांच्या निधनाची बातमी सुन्न करणारी आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे वतीने 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019 या काळात सेवाग्राम येथे घेण्यात आलेल्या गांधी विज्ञान संमेलनात ते आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले विचार मांडले होते. त्यांची पर्यावरणाविषयी बांधिलकी गांधींजींच्या - स्थानिक संसाधनातून घरबांधणी - या देशी विचारावर आधारलेली होती. शहर आणि वास्तुरचना करताना होणारा विकास पर्यावरणस्नेही पद्धतीने व्हावा असे ते सतत मांडत असत आणि तसे कार्य देखील करत. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ अनुभवी क्रियाशील बुद्धिवंत गमावला आहे. त्यांना विनम्र अभिवादन व श्रद्धांजली.
* मराठीतून विज्ञान प्रसार करण्यात सहभागी.
* माजी अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग.
* सर्वांसाठी खुल्या - विज्ञान रंजन स्पर्धा - या ओपन बुक चाचणीचे गेली 27 वर्षे, रचना व आयोजन.
* नैसर्गिक संसाधनातून स्थानिकांना अधिकार मिळवून देणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभाग.
* राष्ट्रीय एकात्मता सांधणार्या आंतर भारतीत सहभाग. शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक, नागरिक यांच्यासाठी व्याख्यानांपासून सहलींपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले.
* पुणे येथील स. प. महाविद्यालयात रसायनशास्त्राचे 32 वर्षे अध्यापन करून सेवानिवृत्त.
* सध्या सर्जनशील माध्यमातून शिक्षण आणि मूल्यमापन या क्षेत्रात प्रयोग करत आहे.