Scam 1992: गुरू, संजू आणि हर्षद
गुरू असो की संजू हे बायोपिक प्रेक्षकांचा मेंदू धुण्यासाठी बनवले जातात की, प्रतिमा निर्मितीसाठी बायोपिक चित्रपटातून वस्तुस्थिती का समोर येत नाही? वाचा बायोपिक चित्रपटातून गुन्हेगारांच्या गुन्ह्यांचं उदात्तीकरण कशासाठी? विनय काटे यांचा लेख;
गेल्या आठवड्यात Scam 1992 ही वेबसिरीज पूर्ण बघितली. निर्मितीमूल्य, कथा, अभिनय आणि दिग्दर्शन याबाबतीत ही वेबसिरीज अफलातून आहे आणि भारतात बनलेल्या पहिल्या पाच सर्वोत्तम वेबसिरीजमध्ये नक्की येईल. प्रतीक गांधीने हर्षद मेहताचा जो रोल साकारलाय तो बिनतोड आहे. शेअर बाजारातील कॉम्प्युटर येण्याआधीचा काळही छान दाखवलाय. पण, या सिरीयलमध्ये हर्षद मेहता ह्या व्यक्तीला जितके देवत्व बहाल केले आहे आणि त्याला जवळपास निर्दोषच दाखवले आहे ते कुठेतरी "गुरू" किंवा "संजू" या सिनेमाच्या पॅटर्नसारखे आहे. या सिनेमात प्रेक्षकांचा मेंदू इतका छानपणे धुतला जातो की त्याची विवेकबुद्धी हरवून तो या व्यक्तींच्या प्रेमात पडून त्यांना आदर्श वगैरे मानू लागतो.
"गुरु"मध्ये गुरुकांत देसाई ज्युरीसमोर भाषण देताना सांगतो की, इथे सामान्य माणसाला व्यवसाय करायची सोय नव्हती आणि त्याने लाथ मारून किंवा लाच देऊन ती व्यवस्था मोडून काढली. गुरुचं background score आणि अभिषेक बच्चनने दमदारपणे म्हणलेले ते डायलॉग प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच आणतात आणि असं वाटतं की हाच खरा धंद्याचा तारणहार! Scam 1992 मध्येही हर्षदच्या तोंडी असेच संवाद देण्यात आलेले आहेत. जिथे परकीय बँका कशा देशी बँकांना मनी मार्केटमध्ये उतरू देत नाहीयेत आणि त्यासाठी हर्षद कसा बँकांचा तारणहार बनतो आणि शेअर मार्केटसोबतच मनी मार्केटमध्ये पण फायदाच फायदा बनवून देतो.
साधं अर्थशास्त्र ज्याला माहीत आहे. तो माणूस हे खूप व्यवस्थित जाणतो की, वस्तू किंवा सेवा निर्माण केल्याशिवाय आणि त्यासोबतच त्यांना विकत घेणारा पैसे असणारा ग्राहक असल्याशिवाय कुठलंही मार्केट किंवा अर्थव्यवस्था तेजीत येऊच शकत नाही. कुठल्याही वस्तू किंवा सेवा निर्माण न करता, कुठलीही परकीय/अंतर्गत गुंतवणूक न करता, कृत्रिम पद्धतीने मागणी वाढवून आणलेली तेजी थोड्या काळानंतर हमखास मंदीत परावर्तित होते. हर्षदने फक्त बाजाराचे निर्देशांक चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने manipulate केले होते, ज्यात जसा काही लोकांचा फायदा झाला तसं बहुसंख्य लोकांचं नुकसानही झालं.
हर्षदने जे केलं ते कॉम्प्युटर-इंटरनेट क्रांती येण्याच्या आधीच्या बँकिंग प्रणालीत दोन बँकांच्या मधील जे transactions होते. त्याला लागणाऱ्या दोन आठवड्याच्या दीर्घ काळाचा आणि कागदी Bank Receipt चा घेतलेला गैरफायदा होता. जो पैसा त्याने शेअर बाजारात टाकला तो त्याचा नव्हताच, आणि तो शेअर बाजारात टाकण्यासाठी त्याला देण्यातही आला नव्हता. त्यातही त्याने नकली Bank Receipt वापरून फसवणूक केली, जिच्यासाठी कुठलेही तारण नव्हते. 1992 साली स्टेट बँकेत सर्वसामान्य लोकांनी ठेवलेल्या ठेवीतून आलेली 500 कोटींची रक्कम असंच कुणीतरी दलाल उचलून विनातारण शेअर बाजारात लावतो. हे सामान्य माणसाला चुना लावणे आहे.
हर्षद मेहताने जे केलं त्यात तमाम बँकांचे उच्चपदस्थ अधिकारी सामील होते. पण त्यांच्यावर खूप काही कारवाई झाली नाही. भविष्यात पुढे 1998 साली केतन पारेख नावाच्या दलालानेही असाच घोटाळा केला. अगदी अलीकडे नीरव मोदी, विजय माल्या वगैरे लोकांनीही बँकांच्या उच्चपदस्थ अधिकारी लोकांसोबत संगनमत करून असेच हजारो कोटींचे घोटाळे केले आणि त्यात ना कुणी जेलमध्ये गेले ना कुणा बँक अधिकाऱ्याची नोकरी गेली. घोटाळा कधीही एक माणूस करत नसतो, तर त्यात वेगवेगळ्या बाजूने असंख्य लोक असतात, तो एक organised crime असतो, पण बाकीची नावे कधी जगासमोर येत नाहीत. व्यवस्था बदलत नाहीत आणि नवीन घोटाळा करण्यास तसाच वाव राहतो.
संजू सिनेमात जसं संजय दत्तचं जेलमधील दुःख उदात्तीकरण करून दाखवलं, जसं काही तो स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलमध्ये गेला होता, अगदी तसंच Scam 1992 मध्येही हर्षदला तपास यंत्रणा किती त्रास देत होत्या, त्याचे घरचे कसे दुःखात होते वगैरे इमोशनल मसाला आहेच. फक्त B.Com शिकलेला एक पोरगा जॉबरपासून अवघ्या 10 वर्षात "बिग बुल" बनतो आणि वयाच्या 35-36 व्या वर्षी भारताच्या शेअर बाजारावर नियंत्रण मिळवतो, हे मोठा संघटित घोटाळा केल्याशिवाय शक्य नाही. हर्षद मेहता हा फक्त पत्त्यातला जोकर होता, ज्याला हुकुमाच्या मोठ्या पानांची साथ होती. जोकर चुकीचाच होता आणि त्याचे अज्ञात हुकुमाचे मालकही चुकीचेच होते. खेळ मात्र अजूनही संपला नाहीये!!
- डॉ. विनय काटे