माझी डॉक्टरेट आई!

mothers day च्या निमित्ताने सागर गोतपागर यांनी आईविषयी मांडलेल्या वाचायलाच हव्या अशा समृद्ध आठवणी....;

Update: 2023-05-14 09:48 GMT

  हाता तोंडाला आलेलं पिक काढुन घेइपर्यंतची लगबग म्हणजे एक सुंदर सोहळा असतो. शेतातल्या बांधावरून नजर चुकवून धान्य टिपनारे पक्षी, सावधपणे आगेकुच करणारी वानरसेना, पाऊस पडतोय कि काय म्हणून जीवाला घोर लागलेला शेतकरी राजा. सगळं वातावरनंच चैतन्यमय होऊन जातं. शेतात पाखरं राखणारी आई कणसं खुडताना आवर्जून काही कणसं पक्षांसाठी राखुन ठेवते. वानरांना हाकलताना बापाला सांगते “खाऊदे सगळ्यानी हाकालल तर त्यानी काय रानं पेरल्यात का ? त्यांनी काय खायचं? बांधावर लांडोरीने घातलेल्या अंड्याची गुप्तता भारताच्या गुप्तचर खात्यापेक्षा जास्त ठेवते. मात्र त्या अंड्यातुन झालेल्या पिलांबद्धल खुप मोठेपणाने सांगते. उभ्या झाडावर कुह्राडीनं कधी कच घालु नये, माणसाशी दुष्मनी करावी पण जनावराशी करू नये अशी वचन लहाणपणापासुन सांगत आलीय. तिला जशी तिच्या मुलाला भुक लागलीय हे समजतं तसेच तिच्या गोट्यातल्या पिलांना भुक लागलीय हे सुद्धा समजतं जनावरं तिच्याशी बोलतात त्या दोघांची भाषा एकमेकांना कळते . ती जनावरांवर पोटच्या मुलाइतकेच प्रेम करते. एखाद्यावर्षी पाऊस उशीरा आला तर निदानं मुक्या जनावरांसाठी तरी लवकर पड अशी विनवनी करते. पावसाला विनवनी करणारी आई जेंव्हा पाउस पडायचा तेंव्हा पूर्ण घर गळायच आम्हाला घराच्या एका कोपय्रात ठेउन द्यायची आणि बाप आणि आई घरातल्या सर्व भांड्यात पावसाला साठवायचे. एका बाजुला तिची काळजी मीटलेली असायची तर दुसय्रा बाजुला तिला चिल्या पिल्यांची काळजी असायची. विजा व्हायला लागल्या की बाप काही होतं नाही असा धीर द्यायचा पण त्या दोघांच्या चेहय्रावर एक गंभीरता दीसुन यायची.

शेतसरीशी गद्दारी करू नये तीच्याशी प्रामाणिक राहीलं तर कायबी कमी पडत न्हाय हे तीचं तत्व. मी लहाण होतो घरात देखभाल करायला कोणी नसायचं ती मला हाय्रातुन सगळ्या शिवारात न्यायची. पातीत मला झोपवायची पात पुढ गेली की परत जागा बदलायची. चंद्रान नीळ्या आकाशात फीरावं तसा मी अख्ख्या रानातुन फीरायचो. पक्षी पहायचो रानातल्या फुलपाखरांशी खेळायचो, सणासुदीला घरात पुरणपोळ्याचा नैवेद्य बनायचा. आम्ही भावंड पुरणवाटायच्या पाट्याशेजारी बसुन रहायचो आई पुरण वाटताना तिला पुरण खायला मागायचो आजुबाजुच्या घरात देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणालाच खायला दिलं जात नसायच परंतु माझी आई देवाला दाखवायच्या नैवेद्याच्या अगोदर आम्हाला खायला द्यायची. याच्या बरोबर उलटं ती शेतात पेरणीच्या वेळी वागायची मला याच त्यावेळी खुप नवल वाटायच. शेतात ज्यावेळी पेरायला कुरी यायची तेंव्हा आम्ही सर्वजन शेतात जायचो. शेतात पेरायला आणलेले शेंगदाने आम्ही खायला लागलो की एक सुद्धा खाऊ द्यायची नाही. म्हणायची या एका शेंगदान्यापासुन पसाभर शेंगा येतात. पेरायला आनलेल्या धान्याला खाऊ न देनारी आई नेहमी शेतात कुठल्या तरी कोपय्रात चवळीच्या शेंगा पेरायची म्हणायची पोरं शेतात फीरायला आली तरी त्यांना काहीतरी खायला मिळालं पाहीजे. धान्य पेरताना आईनं सुंदर नियोजन केलेलं असायचं शेताच्या कुठल्या भागात काय पेरायच हे तिच नेमकं ठरलेलं असायचं. त्यानुसार ती कुरीवाल्याला सांगायची. शेताच्या चारी कडांना आडतास म्हणुन उंच ज्वारीचं बियानं पेरलेलं असायचं. त्याच्या बाजुला चुनुला पावट्याचं बी लावलेलं असायच. या पावट्याला उशीरा शेंगा येतात जेणेकरुन याचा वेल कडेच्या ज्वारीच्या ताटावर चढेल व शेतात दुबार पिक घेतलं तरी या वेलाला काढता यावं.

शेतकय्राच्या पेरणीचं एक वैशिष्ट्य असते त्याने विवीध कामासाठी कीतीही मुहुर्त बघितला तरी ही शेतीच्या कामात तो कधीचं मुहुर्त बघतं नाही. वातावरनाचा कल आणी पावसाचा अंदाज यावर तो शेताची कामे करीत असतो. आईनं या शेतसरीच्या सानिध्यात अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले. तिनं केलेला संघर्ष हा मला भारत पाकीस्तान युद्धापेक्षासुद्धा खतरनाक वाटतो. हा संघर्ष ती तिच्या बालपणापासुन करत आली आहे. तिचे बालपन हे कष्ट करण्यात गेलं. घरात चिडल्यावर कधी कधी म्हनते हे काम माझ्या पाचवीलाच पुजलंय.

गावागावात अशी अनेक कष्टाळलेली माणसं आढळुन येतात ज्यांच आख्ख आयुष्य शेतात जनावरात गेलं. त्यांनी पिकवलेलं धान्या आख्या जगातं पोहचलं पण या उभ्या जन्मात त्यांनी शेजारचं तालुक्याचं गाव बघितलं नाही, माझी आई एक दीवस सुद्धा शाळेतं गेली नाही पण तिला उमगलं तत्वज्ञान जगण्याच प्रेमाचं. तीनं वर्गात कधीच अ,आई गिरवलं नाही पण तिन शेताच्या पाठीवर आयुष्यभर गर्भार हिरवीगार अक्षरं लिहीली. माझा बाप कुठलच पायथॅगोरसच प्रमेय शिकला नाही पण तो शेतात खोप घालताना लाकडाचे मजबुत त्रिकोण करतो. आज या दोघांना शेतीची व्याख्या माहीत नसेल पण ते नित्यनेमानं त्या व्याख्येला जगवत आहेत. एच टु ओ ची संज्ञा सुद्धा माहीत नाही त्यांना पन कुठल्या पिकाला कधी तहाण लागते केंव्हा पाणि दिलं पाहीजे हे ते नेमकं जाणतात. आकाशात आलेला काळाकुट्ट ढग कधी आणि कुठे बरसेल हे ती नेमकं सांगु शकते. तिचं गणित तुमच्या गणकयंत्रापेक्षासुद्धा वेगवान आहे.

वर्षानुवर्षे शेतसरीची वटी नित्यनेमाने भरणाय्रा आई बापाला कोणताही वेतन आयोग नाही आयुष्यात एकही दीवस सुट्टी नाही. त्यांनी त्यांच्या जगण्याच्या तत्वज्ञानानं अख्ख्या जगाला जगवल परंतु त्यांच्या आयुष्यात सुख आणणारं तत्वज्ञान कुणालाही उमगल नाही.

Tags:    

Similar News