सचिनचं अर्धशतक आणि निखिल वागळे यांनी सांगितला सँडविचचा किस्सा

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचा आज 50 वा वाढदिवस. यानिमीत्ताने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सचिन आणि त्यांची भेट कशी झाली? यापासून आगामी काळात येणाऱ्या सचिनच्या षटकारांच्या दिवसांपर्यंत माहिती सांगितली आहे. सचिनच्या वाढदिवसानिमीत्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी लिहीलेला लेख....;

Update: 2023-04-24 10:36 GMT

आज सचिनचा वाढदिवस. पन्नासावा वाढदिवस.

विश्वास बसत नाही आमचा हा लाडका हिरो चक्क ५० वर्षांचा झाला.

सचिनची माझी पहिली भेट झाली संजय कऱ्हाडेमुळे. सचिन आणि विनोद षटकार ट्रॅाफीत खेळत होते आणि अर्थातच धावांचा पाऊस पाडत होते. सचिन मोठा क्रिकेटपटू होणार हे भाकीत त्यावेळी द्वारकानाथ संझगिरी आणि मकरंद वायंगणकर या माझ्या दोन संपादक मित्रांनी केलं होतं. पुढे आणखी ४ वर्षांनी हे भाकीत खरं ठरलं.

मी सचिनला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो लाजराबुजरा होता. आजही तसाच आहे. आपल्या थोरपणाचं ओझं घेऊन तो वावरत नाही.

पुढे अजित तेंडुलकरचं ‘असा घडला सचिन’अक्षरने प्रसिद्ध केलं. त्याचा प्रकाशन सोहळा सचिनच्या साहित्य सहवासमधल्या घरी झाला. सचिन, त्याचे बाबा रमेश तेंडुलकर, अजित, संजय आणि त्याचे कॅालनीतले दोस्त. आमचा पार्थही होता. सचिनसमोर लाजून चूर झाला. रमेश तेंडुलकरांची माझी आधीपासून ओळख होती. रत्नाकर मतकरींच्या एका काव्यस्पर्धेत आम्ही परिक्षक म्हणून काम केलं होतं. सचिनच्या स्वभावातली ऋजुता थेट बाबांकडून आली आहे.

पुढे अधून मधून हा गुणी मुलगा भेटत राहिला. २००८ साली आयबीएन लोकमतच्या लाँचिगच्या वेळी आपण सचिनची मुलाखत घेऊ असं राजदिपने सुचवलं आणि आम्ही चेन्नईला ताज कोरोमंडेलमध्ये पोचलो. भारतीय टीम तिथे खेळत होती. सुनंदन लेले आधी पोहेचला. त्याने फिल्डिंग लावली आणि ठरलेल्या वेळी सचिन शुटिंगसाठी बुक केलेल्या रुममध्ये आला. त्याला प्रचंड भूक लागली होती. त्याने तोंडातून सॅंडविच असा शब्द काढताच ताजवाल्यांची एकच धावपळ झाली.

अचानक सचिनचा मूड बदलला आणि म्हणाला, चला आधी मुलाखत करु. मग पुढे दीड तास मी प्रश्न विचारत होतो आणि तो घडाघडा बोलत होता. तसाच नम्र, पण ठाम. बाबांचा उल्लेख झाल्यावर हळवा होणारा. देवमाणूस.

मुलाखत संपल्यावर सचिनने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘मजा आली. हे सगळं या आधी मला कुणी विचारलंच नव्हतं. चला सॅंडविच खाऊ.’

पुन्हा एकदा सॅंडविचची शोधाशोध. तो वेटरही सचिनचा डायहार्ड फॅन. मुलाखतभर तो सॅंडविच घेऊन दारात उभा होता.

सचिनच्या या मुलाखतीने 'ग्रेट भेट' हा शो घराघरात पोहोचवला. आधी अर्धा तास असणारा हा शो पुढे एक तासावर होऊ लागला. काही अविस्मरणीय दीर्घ मुलाखती यात घडल्या. पण सलामी दिली होती सचिनने. अशा कितीतरी आठवणी आज सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दाटल्यात. त्याची फलंदाजी तर मनात कोरलीय.

परवा द्वारकानाथ संझगिरीचा फोन आला. म्हणाला, सचिनच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त ग्रंथाली माझं पुस्तक काढतंय, नाव सुचव.

हा आमचा जुना खेळ. संझगिरीच्या अनेक लेखांची हेडिंग मी दिली आहेत. सचिनचा उदय झाला तेव्हा सचिन नावाची पहाट हे माझंच शिर्षक होतं. दोन जूनला या नव्या पुस्तकाचा सोहळा होणार आहे. संझगिरीने षटकारचे दिवस लिहावेत हे मी त्याला सुचवलंय. मंतरलेले दिवस होते ते.

असो. सचिनला एकच सांगणं-

तू ५० हो की १००, आमच्यासाठी चिरतरुणच आहेस. असाच नितळ रहा. बाबांसारखा.

साभार- निखिल वागळे यांच्या फेसबुक वॉलवरून....

Tags:    

Similar News