तेंडल्या लका आता तरी खोटं बोलू नकोस!
आज तक वरील एका कार्यक्रमात क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी केलेला दावा खोटा असल्याची टिका नवयान महाजलसाचे शाहीर सचिन माळी यांनी केली आहे. वाचा सचिन तेंडुलकर यांचा दावा खोटा ठरवणारा सचिन माळी यांचा लेख..;
आज तक (Aaj tak)च्या "20-20 सलाम क्रिकेट" या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकर बोलला होता की, "मी माझ्या वडिलांना वचन दिले होते, कधीही तंबाकूची जाहिरात करणार नाही आणि मी कधीही अशी जाहिरात केली नाही. त्यासाठी नव्वदीच्या दशकात सलग दोन वर्षे मी माझ्या बॅटवर स्टिकर न लावता खेळलो होतो."
परंतु सचिन तेंडुलकरचा(Sachin tendulkar) हा दावा खरा नाही. ज्यांनी 1996 चा वर्ल्ड कप पाहिला असेल त्यांना आठवत असेल की, हा वर्ल्ड कप WILLS नावाच्या सिगारेट कंपनीने प्रायोजित केलेला होता. त्या वर्ल्ड कप मध्ये सचिन तेंडुलकर त्याच्या जर्सीवर WILLS या जगविख्यात सिगारेट कंपनीचा लोगो तो मिरवत होता. जिज्ञासूंच्या माहिती साठी त्यावेळचे सचिन तेंडुलकरचे फोटो मुद्दाम देत आहे.
यातून सचिन तेंडुलकरचा दांभिकपणाच उघड होतो आहे. बॅटवर स्टिकर लावले नाही याचे कौतुक सांगायचे आणि अंगावर, छातीवर मात्र WILLS चे लेबल लावून खेळायचे हा कसला दुतोंडीपणा म्हणायचा? जर्सीवर WILLS चा लोगो लावल्याने सिगारेटची-तंबाकूची जाहिरात होत नाही का? हे म्हणजे "मी न्हाई त्यातली अन कडी लावा आतली" असा प्रकार झाला.
1996 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरसह सर्व भारतीय क्रिकेटर जर्सीवर WILLS या सिगारेट कंपनी चा लोगो लावून खेळले पण त्याचा नेमका काय परिणाम झाला याचा सर्व्हे समोर आलेला आहे. Indian Medical Association ने हा सर्व्हे केलेला असून या सर्व्हे च्या निष्कर्षानुसार "1996 च्या WILLS वर्ल्ड कपच्या दरम्यान 13 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांनी सिगारेट ओढायला सुरूवात केली." ही प्रेरणा त्यांना खेळाडूंच्या जर्सीवर लिहिलेल्या WILLS या लोगोने दिली ही वस्तुस्थिती आहे. हा सर्व्हे स्पष्ट शब्दांत सांगतो की,
"The results show there was nearly a four-fold increase in the number of children who took up smoking during the tournament."
याची जबाबदारी ICC व BCCI ची तर आहेच पण तेवढीच सचिन तेंडुलकरसह तत्कालीन भारतीय क्रिकेट टीमच्या सदस्यांची सुद्धा आहे.
टीमचाच करार WILLS सोबत असल्याने सचिनला जर्सीवरचा लोगो हटवता आला नसेल असं म्हणायचं; तर जगात असे अनेक क्रिकेटर आहेत ज्यांनी टीमचा करार असतानाही जर्सीवरून लोगो हटवले आणि त्याबदल्यात प्रत्येक मॅच साठी आर्थिक दंड ही भरला. उदाहरणार्थ, दारूची जाहिरात करणार नाही अशी भूमिका घेणारा दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला असो किंवा इंग्लंडचा मोईन अली असो यांनी त्यांच्या टीमला स्पॉन्सर करणाऱ्या दारू कँपन्यांचे लोगो अंगावर कधीच लावले नाहीत. त्याबदल्यात आर्थिक दंड भरणे त्यांनी मान्य केले. आर्थिक नुकसान सोसले. पण आपल्या भूमिकेवर ते अढळ राहिले. मोईन अलीने IPL मध्येही चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना दारू कंपनीचा लोगो जर्सीवर न लावण्याची परवानगी मागितली होती आणि CSK ने ही ती दिली होती. जिज्ञासूंसाठी मोईन अली आणि हाशिम आमला यांचेही फोटो देत आहे.
सर्वात लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे WILLS या सिगारेट कंपनीचा आणि BCCI चा करार हा केवळ 1996 च्या वर्ल्ड कपपुरता मर्यादित नव्हता तर अनेक वर्ष भारतीय क्रिकेटर त्यांच्या जर्सीवर WILLS चा लोगो वागवत होते. त्यावेळी कधीही सचिन तेंडुलकरने त्याला विरोध केलेला नाही. उलट त्या लोगोला छातीवर, दंडावर मिरवत त्याने त्याचे प्रमोशन व प्रदर्शन केलेले आहे. त्यामुळे त्याने वडिलांना दिलेले प्रॉमिस पाळलेले नाही हे मात्र सप्रमाण सिद्ध होते.
एकेकाळी सचिन तेंडुलकरचा मी सुद्धा डाय हार्ट फॅन होतो. नुकताच तेंडल्या हा उत्तम मराठी सिनेमा येऊन गेला. खेड्यातील पोरं सचिनवर कसे निरागस प्रेम करायचे ते सर्वांनी पाहिलं आहे त्यातील एक पात्र मी ही होतो...
म्हणूनच शेवटी एवढंच म्हणायचं आहे, 'तेंडल्या लका आता तरी खोटं बोलू नकोस!'
शाहीर सचिन माळी
नवयान महाजलसा