बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन विशेष: संमिश्र, पारदर्शक बाळासाहेब...

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन, त्या निमित्ताने त्यांच्या राजकीय जीवनावर डॉ. विनय काटे यांनी टाकलेला प्रकाश...;

Update: 2020-11-17 05:46 GMT

बाळ ठाकरेंचं हिंदुत्व हा प्रकार मला कधीही आवडला नाही. दक्षिण भारतीय लोकांना त्यांनी केलेला विरोध हा फक्त राजकीय भावनेने प्रेरित होता आणि त्यात त्यांनी मराठी लोकांना उद्योगधंद्याला लावण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नव्हती.

बाबरी पतन आणि नंतर मुंबईतल्या धार्मिक दंगली या गोष्टी तर अजूनच घातक होत्या. राष्ट्रपती कलामांच्या केसांची टिंगल करण्यापासून ते "झक मारली आणि पुलंना महाराष्ट्रभूषण दिलं" वगैरे त्यांची ठाकरी वाक्ये समर्थनीय नव्हती. "घरात नाही पीठ, मग हवे कशाला विद्यापीठ?" म्हणत नामांतराला विरोध करताना ते एकदम पुराणमतवादी दिसत होते.

एका निवडणुकीपुरता मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याची वल्गना असो की आणीबाणीला समर्थन देत हुकूमशाही विचारांचा अनुनय असो.... बाळ ठाकरे हे राजकारणी म्हणून मला नेहमीच भारतासारख्या विविधतेने संपन्न लोकशाही देशात थोडे संकुचित वाटले आहेत.

एक कार्टूनिस्ट आणि मनात जे असेल ते ते बेधडक आणि खरेपणाने बोलणारा वक्ता म्हणून मात्र, बाळ ठाकरे मला नक्कीच आवडतात. इतर पक्षांच्या नेत्यांशी नरम-गरम संवाद ठेवताना मैत्री जपून ठेवणे. हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.

स्वतःच्या कुठल्याही व्यसनाला त्यांनी जगापासून लपवून ठेवलं नाही, उलट ते खुलेपणाने केलं आणि त्यात त्यांच्यातला मनस्वी कलाकार त्यांच्या राजकारणी अंगावर भारी पडलेला दिसायचा. सामनामधले त्यांचे लेख हे फक्त शिवसैनिक या एकाच वाचकवर्गाला टार्गेट करून लिहिलेले असायचे आणि ते सातत्य त्यांनी शेवटपर्यंत ठेवले. लोकशाहीवादी किंवा सेक्युलर दिसण्यासाठी त्यांनी सामनातला मजकूर कधीही मवाळ किंवा सर्वसमावेशक केला नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाचा एक गुण जो बाळ ठाकरेंचा कुठलाही राजकीय विरोधक नाकारू शकत नाही. तो हा की जात-धर्म न पाहता लोकांना निवडणूकीची तिकिटे देणारा शिवसेना हा कदाचित एकमेव पक्ष तेव्हा होता.

बाळ ठाकरेंनी दगड जरी निवडणूकीत उभा केला तरी शिवसैनिक त्याला निवडून आणायची शर्थ करत. काँग्रेस किंवा भाजपसारखे तिथे अंतर्गत गटबाजी आणि शह-काटशह हा प्रकार नव्हता. बाळ ठाकरे सांगतील तो आदेश होता आणि शेवटचं वाक्य होतं. कित्येक सामान्य घरातल्या शिवसैनिकांना बाळ ठाकरेंनी निवडणूकीतून मोठे केले... मग ते भुजबळ असोत, राणे असोत की मनोहर जोशी असोत.

बाळ ठाकरे हे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने एक संमिश्र पण पारदर्शक असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या विचार आणि कृतींबद्दल नक्कीच खूप सारे वाद होते, पण त्यांची लोकप्रियता निर्विवाद होती!

- डॉ. विनय काटे

Tags:    

Similar News