बहुजनांनो धोका ओळखा...
राम मंदिरासाठी 1100 कोटी जमा होऊनही वर्गणीची गरज काय? राम मंदिराच्या नावाखाली हिंदू खतरे में है म्हणत... भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे का? भारतातील बहुजन भाजपचा हा कावा कधी ओळखणार? वाचा मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांचा लेख... हिंदू खतरे में नही, भाजपा खतरें में है..;
राम मंदिरासाठी वर्गणी मागताना त्याची हत्या झाली म्हणून कांगावा करण्यात येत आहे. तो जीवानिशी गेला, त्याच्या मृत्यूपश्चात आता राजकारण सुरू आहे. पोलीसांनी आधीच सांगीतलंय की, व्यवहाराच्या वादावरून हत्या झाली. तरी भाजपाला हा मुद्दा राजकीय करायचाय. आता त्याच्या परिवारासाठी पुन्हा वर्गणी गोळा केली जातेय. ज्यांचे खिसे झाडले तरी पाच-दहा कोटी पडतील ते नेते लोकांकडून पैसे गोळा करतायत, काल पर्यंत रिंकू साठी पन्नास लाख गोळा झाले होते, येत्या २-४ दिवसांत एक कोटी च्या आसपास पैसे गोळा होतील. तिकडे राममंदिरासाठी ११०० कोटी गोळा झालेयत.
रिंकूच्या घरी भाजपचे नेते भेट देतायत, बाकी पक्ष सावध भूमिका घेतायत. मारणारे कुठल्या धर्माचे, पक्षाचे, मरणारा कुठल्या पक्षाचा? यावर या देशात #Justice मोहीमा ठरतात. या कॅटेगरीत न बसणाऱ्यांना कुत्रं विचारत नाही. ते फक्त मरतात, कुणाचं रक्त उसळत नाही. दररोज हजारो लोकं अशी मारली जातात. दररोज हजारो मागासवर्गीय मारले जातात, महिलांचा बलात्कार- खून हे कॉमन झालंय, साधी बातमी बनत नाही त्यांची. रिंकू मारला गेला. त्याच्या छोट्याश्या घरात बसायलाही जागा नाही, तो भव्य राममंदिर साठी चपला झिजवत होता. ही या देशाची परिस्थिती आहे.
या देशातील युवक अशा पद्धतीने नादाला लावला गेलाय. धर्म ही अफूपेक्षाही जास्त अंमली आहे. या देशाला अशा नशेत ठेवल्याने आज १०० रूपये किंमतीचं पेट्रोल तुम्हाला दिसेनासं होतं, आपल्या घरातील लोक तुमचं पोट भरण्यासाठी कसा संघर्ष करतायत ते तुम्हाला महत्वाचं वाटेनासं होतं, शाळेत तुमचे सर्वधर्मीय मित्र-मैत्रिणी होत्या.
त्यांच्या घरी तुमचं येणं जाणं होतं, खाणं-पिणं होतं हे तुम्ही विसरून जाता. याला सेक्युलरीज्म च्या राजकीय चष्म्यातून नको बघूया थोडा वेळ, माणूस म्हणून बघूया. आपण असंच जगत आलोय. एकमेकांमध्ये मिसळून. आज अचानक पुन्हा पाच हजार वर्षे मागे जायच्या गोष्टी कोण बोलायला लागलंय? पाच हजार वर्षे मागे जाणं म्हणजे काय? पुन्हा चातुर्वण्य, अस्पृश्यता, महिलांना दुय्यम स्थान, होम हवन, जातीच्या उतरंडी पाडून अत्याचार करणे... यातलं आपल्याला नेमकं काय करायचं आहे... आणि हा.. यात आपली जात कुठे बसतेय ते पण पाहा..
हिंदू म्हणून जगण्यात काहीच गैर नाही, पण हिंदू धर्मातलं तुमचं स्थान काय आहे. ब्राह्मण अजूनही श्रेष्ठ का? इतर धर्मातून घरवापसी नंतर मूळ जातीत का परत पाठवतात, त्यांना हवी ती जात का स्वीकारता येत नाही? जातबदल शक्य आहे का? जातीअंत शक्य आहे का? अनेक प्रश्नांची उत्तरं बहुजन समाजाला शोधावी लागणार आहेत. स्वतःशी लढावं लागणार आहे. जातींच्या उतरंडींच्या गर्दीत तुमचं अस्तित्व तुम्हाला सापडलं की मग आणखी एक प्रश्न विचारा स्वतःला.. तुमचा खरा शत्रू कोण आहे? मुस्लीम? ख्रिश्चन, बौद्ध, जैन..? कोण आहे तुमचा शत्रू?
मुस्लीम शत्रू होते. मग मुघलांच्या दरबारात हिंदू राजे काय करत होते? बौद्ध आणि जैन याच देशातले आहेत, शांततेचा प्रसार करणारे आहेत, मग त्यांच्यावर इथले हिंदू का आक्रमण करत होते. लेणी, बौद्धकालीन शिल्पे कोणी बिघडवली.. मला वाटतं या सर्व वर्चस्वाच्या लढाया होत्या आणि त्यात देव-धर्म मंदिरं, प्रतिमा यांचा वापर अस्मिता छेडणं, प्रभाव निर्माण करणं, दहशत निर्माण करणं यासाठी प्रतिकात्मक पद्धतीने करण्यात येत होता. आज या सगळ्या मुद्दयांची चर्चा यासाठी करायची आहे की, राम मंदिरासाठी तरूणांना गल्लोगल्ली फिरायला लावणं हा राजकीय कार्यक्रम आहे. हे पैसे कोण गोळा करतंय?
तर हे पैसे भाजपा आणि संघ परिवार गोळा करतंय. जर संघ-आणि भाजपाला मी पैसे दिले नाहीत तर मग मी हिंदू विरोधी कसा काय बनतो? या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम आहे, आणि त्याला एका धर्माची ढाल घेणं पूर्णतः चुकीचं आहे. दिल्लीत एक युवक मारला जातो, त्याचं नाव वापरून देशभर माहौल गरम करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून आलेल्या अपयशापासून वाचवण्याची ही मोठी ढाल आहे. मी मागे ही म्हटलं होतं, हिंदू खतरे में नही, भाजपा खतरें में है.. देशातील सर्व बहुजनांनी हा कावा ओळखला पाहिजे.