ईडीचे भोंगे आणि सुपारीबाजांचे नवनिर्माण....! -अनुपम कांबळी
राज ठाकरेंच्या मुलाखतीचे औचित्य काय? राज ठाकरे फडणवीस यांच्या भेटीत काय झाले? फडणवीस शिंदे यांच्या रात्रीच्या भेटीत काय ठरले होते? सुपारी कोणी कोणाला दिली.. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले आहे, लेखक अनुपम कांबळी यांनी..;
काल संध्याकाळी सात वाजता झी २४ तास वृत्तवाहिनीवर 'कॉमेडी नाईट्स विथ राजू' हा मुलाखतीचा कार्यक्रम बघितला. मुलाखतीच्या सुरुवातीलाच मनसेप्रमुख राज ठाकरेंनीं "शिवसेनेचे आमदार फुटलेत त्याचे श्रेय भाजपचे नाही, अमित शहांचे नाही, देवेंद्र फडणवीसांचे नाही तर उद्धव ठाकरेंचेच आहे" असे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर जाऊन दीड तासाच्या भेटीत नेमकी काय स्क्रिप्ट लिहून दिलीय त्याचा मला पुरेपूर अंदाज आला. शिवसेना आमदार फुटत होते तेव्हा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगून भाजप नेते हात झटकत होते.
त्यानंतर एकनाथ शिंदेनी भर विधानसभेतच फडणवीसांसोबतच्या रात्रीच्या अंधारातील गुपचूप भेटीच्या सुरस कहाण्या सांगितल्या आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य धर्मपत्नींनी दुजोरा देखील दिला. त्यामुळे भाजपचे पितळ सर्वांसमक्ष उघडे पडले. आता गेलेली अब्रू पुन्हा मिळवण्यासाठी आणि 'मी नाही त्यातली' हे जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी कुणाकडे तरी पुन्हा सुपारी देण्याची गरज होती. त्यासाठीच महाराष्ट्राच्या राजकारणात सुपारीबाज म्हणून नावाजलेल्या राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि पुढच्या दोन-तीन दिवसात हे महाशय सुपारी फोडण्यासाठी टेलिव्हिजनवर अवतरले.
उद्धव ठाकरेंनी म्हणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला आणि त्यामुळेच शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार पक्ष सोडून गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीत छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि स्वतः राज ठाकरे शिवसेना पक्ष सोडून गेले होते. मग त्यावेळी काय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच स्वतःचा विचार सोडला होता का...? बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना शिवसेनेत चार बंड झाली आणि आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना एकनाथ शिंदेंनी बंड केले. मग या बंडोबांचा शिवसेना पक्षाच्या विचारसरणीशी काही संबंध आहे का...? राज ठाकरेंच्या मते बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे नेतेमंडळी शिवसेना सोडून गेली होती.
छगन भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ दोन वेळा आंमदार होता, गणेश नाईकांचा मुलगा संदीप नाईक आमदार आहे, नारायण राणेंचा मोठा मुलगा निलेश राणे खासदार होता व लहान मुलगा नितेश राणे आमदार आहे आणि दस्तरखुद्द राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे. फक्त अमित ठाकरेंना निवडून आणण्याची मनसे पक्षाची संघटनात्मक कुवत नसल्याने ते आमदार, खासदार किंवा नगरसेवक नाहीत. याचाच अर्थ बाळासाहेब ठाकरेंवर घराणेशाहीचे किंवा पुत्रप्रेमाचे आरोप करून शिवसेना सोडणाऱ्या प्रत्येकानेच पुढे जाऊन आपल्या मुलांना राजकरणात आणून स्थिरस्थावर करत घराणेशाहीच केली. आताचे बंडोबा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा सुद्धा खासदारच आहे. मग तुम्हा बंडोबांना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उरतो का....? याचाच अर्थ आम्ही आमच्या मुलांना राजकारणात पुढे आणणार आणि आमदार-खासदार बनवणार...! फक्त बाळासाहेबांनी आपल्या उद्धवला शिवसेनेचा पक्षप्रमुख बनवू नये आणि उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना आमदार किंवा मंत्री बनवू नये.
बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलांना राजकारणात पुढे आणले की हे तथाकथित बंडोबा पुत्रप्रेम आणि घराणेशाही बोंबलायला मोकळे झाले. राज ठाकरेंना पुत्रप्रेमावर किंवा घराणेशाहीवर बोलायची इतकीच खुमखुमी असेल तर त्यांनी अमित ठाकरेंना बाजूला करून आयुष्यभर राज ठाकरे या एकाच नेत्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावलेल्या बाळा नांदगावकर यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व सुत्रे द्यावीत. मुलाखतीच्या शेवटी पत्रकाराने प्रश्न विचारला की, "मनसेचे १३ पैकी १२ आमदार आणि मुंबई महानगरपालिकेतील ७ पैकी ६ नगरसेवक कसे पळाले...?" या प्रश्नानंतर राज ठाकरे जबरदस्त चिडले. मनसेचे आमदार आणि नगरसेवक सत्तेच्या आणि पैशाच्या आमिषापायी पळाले होते. शरद पवारांचे ५४ पैकी ५२ आमदार पळाले होते, हे उदाहरण सुद्धा त्यांनी जोडीला देऊन टाकले.
याचाच अर्थ राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी कट्टर हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून अब्दुल सत्तार आणि अनिल बाबर हे कट्टर हिंदुत्ववादी नेते शिवसेना सोडून पळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा तीन पक्षाचा प्रवास करून अलीकडेच हाडामासाचे शिवसैनिक बनलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील 'फिरता चषक' असलेल्या दीपक केसरकरांनी हिंदुत्वाच्या रक्षणाखातर सत्तेवर लाथ मारली. पूजा चव्हाण बलात्कार व आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरु असलेले संजय राठोड, बलात्काराची तक्रार दाखल असलेले राहुल शेवाळे, ईडीसम्राट प्रताप सरनाईक, ईडीसम्राज्ञी यामिनी जाधव, ईडीच्या नोटीसीनंतर फरार झालेल्या भावना गवळी हे सगळे हिंदुत्ववीर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराखातर पक्ष सोडून पळाले.
फक्त राज ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक तेवढे सत्तेच्या आणि पैशाच्या आमिषापायी पक्ष सोडून पळाले कारण त्यांना मनसे पक्षाचा नेमका विचार काय हेच मुळी माहिती नव्हते. सर्वप्रथम हिरवा, निळा, भगवा झेंडा पक्षध्वज म्हणून वापरायचा आणि त्याला कुणी विचारेना झालं की शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा पक्षध्वज मार्केटमध्ये आणायचा. एकदा पक्षाचे चिन्ह रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे धावणार आणि त्यानंतर त्यात बदल करून ते रेल्वे इंजिन उजवीकडून डावीकडे धावणार. गेल्या सोळा वर्षात ज्या पक्षाने पक्षध्वज आणि पक्षचिन्ह सुद्धा स्थिर ठेवले नाही त्या पक्षाला कसली आलीये विचारधारा....? त्यामुळेच कधी राष्ट्रवादी काँग्रेसला तर कधी भाजपाला घाऊक दरात संपूर्ण मनसे पक्ष निवडणूककाळात भाड्याने मिळतो. यापलीकडे या पक्षाला विचारधारा अशी काहीच नाही.
कालच्या मुलाखतीत राज ठाकरे असंही म्हणाले की, "मला एवढा विश्वास आहे की मी माझ्या विचारांचा पक्का आहे...!" २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी रामदास आठवलेंना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद ऑफर केले होते. तेव्हा राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते की ही ऑफर ऐकून आठवलेंच्या घरातलेही ख्या ख्या ख्या ख्या करून हसले असतील. मला वाटत राज ठाकरे आपल्या विचारांचे पक्के आहेत, हे ऐकून त्यांचा पाळण्यातला नातु देखील खी खी खी खी करून हसला असेल. राज ठाकरेंनी २०१४ साली गुजरात विकास मॉडेलची तारीफ करून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठींबा दिला होता. त्यानंतर २०१९ साली हेच मोदी त्यांना चुकीचे वाटू लागले. काय तर म्हणे माझी त्यावेळी फसवणूक झाली आणि मोदींनी पंतप्रधानपदाच्या काळात संपूर्ण देशाचे वाटोळे केले आहे.
त्यानंतर दोन वर्षांनी २०२२ साली पुन्हा त्यांना साक्षात्कार झाला की नरेंद्र मोदी हेच विकासपुरुष आहेत. २०१७ साली देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख त्यांनी भाजपकुमार थापाडे असा केला होता. आता २०२२ साली त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे पत्र लिहीत आहेत. एकदा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा आणि त्यानंतर रिफायनरी कंपनीची सुपारी घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना रिफायनरीच्या समर्थनार्थ पत्र लिहायचे. एकीकडे अमित ठाकरे आरे कारशेडला पर्यावरणाच्या मुद्द्यावर विरोध करणार आणि दुसरीकडे मनसेचा एकमेव आमदार बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देऊन सत्तेत सहभागी होणार.
एकीकडे राज ठाकरे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करणार आणि दुसरीकडे हा प्रकल्प रेटणाऱ्या भाजपच्या सत्तेत सहभागी होणार. राजकारण हे क्षेत्रच असे आहे की इकडे कालपरत्वे अनेकजण आपापल्या भूमिका बदलतात पण या धरसोडपणात राज ठाकरेंचा हात कुणीच धरू शकत नाही इतक्या भूमिका त्यांनी आजवर बदललेल्या आहेत. उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत असे विधान करणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांचीच 'लाव रे तो व्हिडीओ' या सिरीजमधील भाषणे ऐकली तर ती भाषणे करणारा वक्ता राज ठाकरेच आहे यावर त्यांचा स्वतःचाच विश्वास बसणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात 'पलटीसम्राट' ही उपाधी खास त्यांच्यासाठीच राखीव ठेवावी लागेल.
मुलाखतकाराने मनसेचा एकच आमदार निवडून कसा येतो हा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी सगळ्या मोठ्या पक्षांचा इतिहासाचं समोर ठेवला. काँग्रेस पक्षाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आली. भाजपची सत्ता २०१४ साली आली असली तरी जनसंघाची स्थापना १९५२ साली झाली. शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली आणि सत्ता १९९५ साली आली. राज ठाकरेंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या हितासाठी झाली होती. त्यावेळी निवडणूक लढवणे हा शिवसेनेचा अजेंडाच नव्हता. १९८४ सालच्या सुमारास शिवसेनेने निवडणूक लढवून नगरसेवक निवडून आणत मुंबई महानगरपालिकेत शिरकाव केला आणि त्यानंतर शिवसेना खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या राजकारणात उतरली. १९८९ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली आणि १९९५ साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर सर्वप्रथम शिवसेनेचा भगवा फडकला. याचाच अर्थ १९८४ ते १९९५ या अकरा वर्षांच्या काळात शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता मिळवली. १९५२ साली जनसंघ सुद्धा निवडणुकीच्या राजकारणासाठी स्थापन झाला नव्हता. १९८० च्या सुमारास भाजप निवडणुकीच्या राजकारणात उतरली आणि वीस वर्षांनंतर १९९९ साली केंद्रात सत्तेत आली.
२००९ साली माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेसने नकार दिला. त्यांच्या मुलाने दिनांक १२ मार्च २०११ रोजी वायएसआर काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला १७५ पैकी ७० जागांवर विजय मिळाला. जगनमोहन रेड्डीची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना साधारण दीड वर्षे तुरुंगात डांबले गेले. तरीही या मुलाने हार मानली नाही. त्यांनी सलग चौदा महिने पदयात्रा काढली आणि २०१९ साली १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले. अशा प्रकारे २०११ ते २०१९ या अवघ्या आठ वर्षाच्या कालावधीत जगनमोहन रेडडीनी स्वतःचा पक्ष स्थापन करून सत्ता सुद्धा मिळवली. अरविंद केजरीवाल यांनी दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आम आदमी पक्षाची स्थापना केली. २०१३ साली पहिल्याच निवडणुकीत ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. अरविंद केजरीवालांना पहिल्याच प्रयत्नात सत्ता मिळाली आणि त्याच वेळी त्यांनी काही अक्षम्य चुका देखील केल्या परंतु त्यांनी मोठ्या मनाने आपल्या चुका मान्य केल्या. २०१५ साली ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून आपने भाजपचा अश्वमेध रोखला आणि त्यानंतर पुन्हा २०२० साली ७० पैकी ६२ जागा मिळवून आप पुन्हा सत्तेवर आली.
पंजाबमध्ये २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वासामुळे आपला ११७ पैकी २० जागांवरच समाधान मानावे लागले पण केजरीवाल कुठेही खचले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा जोमाने तयारी केली आणि २०२२ साली ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवून पंजाबमध्ये एकहाती सत्ता खेचून आणली. आता गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यात अरविंद केजरीवालांनी भाजपासमोर आव्हान निर्माण केलेले आहे. दिल्लीत दोन वेळा आणि पंजाबमध्ये एकदा सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पक्षाचे वय अवघे दहा वर्षे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी दिनांक १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यांना २००१ व २००६ सालच्या विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी अनुक्रमे ६० व ३० जागा मिळाल्या. त्यांनी अजिबात हार मानली नाही.
पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या डाव्यांसोबत टोकाचा संघर्ष केला आणि २०११ सालच्या विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी १८४ जागा जिंकून पश्चिम बंगालची सत्ता मिळवली. राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचे तर पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी अवघ्या तेरा वर्षात सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१६ विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी २११ आणि २०२१ विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी २१५ जागा जिंकून ममता दीदी आजही दिमाखात सत्तेत आहेत. राज ठाकरेंचा दावा खोडून काढण्यासाठी जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी अशी अनेक उदाहरणे देता येतील. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे...! राज ठाकरेंचा दिवस दुपारी अकरा वाजता उजाडतो. त्यांना ही सर्व उदाहरणे देणे म्हणजे 'गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता' यातलाच प्रकार आहे.
२०१४ व २०१९ साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती त्यामुळे मनसेचे आमदार निवडून येऊ शकले नाहीत, असा साक्षात्कार राज ठाकरेंना दरम्यानच्या काळात झालेला दिसतोय. 'नाचता येईना अंगण वाकडे' याचे यापेक्षा आदर्श उदाहरण शोधून सुद्धा सापडणार नाही. नरेंद्र मोदींची लाट दिल्ली, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये नव्हती का....? इतकेच कशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट इकडे महाराष्ट्रात सुद्धा होती. त्याच लाटेच्या जोरावर भाजपने दिनांक २५ सप्टेंबर २०१४ रोजी शिवसेनेशी असलेली पंचवीस वर्षांची युती तोडली. हो, हो तीच युती जिचा उल्लेख काल राज ठाकरेंनी आपल्या मुलाखतीमध्ये केला होता. त्यात शिवसेना आणि भाजपमध्ये 'ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता' हा फॉर्म्युला ठरला होता. राज ठाकरेंना तो फॉर्म्युला आठवतोय पण 'केंद्रात तुम्ही मोठे भाऊ आणि राज्यात आम्ही मोठे भाऊ' हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेनी कमळाबाईला दिलेला फॉर्म्युला आठवत नाहीये. त्यात त्यांचा काहीच दोष नाही. कपटी आणि पाताळयंत्री भाजप नेत्यांनी घरी येऊन दीड-दीड तास स्क्रिप्ट पढवून सुपारी दिल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या असतील त्याच गोष्टी एखाद्या बोलक्या पोपटाप्रमाणे कॅमेऱ्यासमोर विठू विठू बोलाव्या लागतात.
सांगायची गोष्ट एवढीच की राज ठाकरेंनी काल उल्लेख केलेली ही आदर्शवत युती कमळाबाईंनी २०१४ सालीच तोडली होती. त्यामुळे 'ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री' हा फॉर्म्युला सुद्धा त्याच दिवशी संपुष्टात आला होता. त्यावेळी ऐनवेळी युती तोडून शिवसेना संपवण्याचा भाजपने आखलेला कुटील डाव उद्धव ठाकरे या एकट्या माणसाने एकहाती हाणून पाडला. भाजपाची दिल्लीची फौज आणि शिवसेना यांच्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एखाद्या पहाडाप्रमाणे आपले दोन्ही पाय जमिनीत घट्ट रोवून उभे राहिले. "महाराष्ट्रात मोदी लाट आहे मग मी एकटाच कसा लढणार...?" अशी कारणे देत उद्धव ठाकरे शस्त्रे खाली ठेवून घरात बसले नाहीत. शिवसेनेने स्वबळावर ६३ जागा जिंकून भाजपचे महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्याचे नापाक मनसुबे उधळून लावले. त्यानंतर आवाजी मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठींबा घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रकरण भाजपच्या अंगाशी आल्यानंतर त्यांनाच पुन्हा युती करण्यासाठी मातोश्रीची पायरी चढावी लागली. त्यानंतरही शिवसेना संपवण्याची खुमखुमी काही कमी झाली नव्हती. २०१७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती तोडून दिल्लीच्या पाशवी बळावर मुंबई ताब्यात घेण्याचे षडयंत्र पुन्हा एकदा एकट्या उद्धव ठाकरेंनीच परतवून लावले. त्यानंतर अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन 'पटक देंगे' अशी धमकी देत शिवसेनेला आव्हान दिले. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांचे आव्हान स्वीकारत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
त्याबरोबर हातभर फाटलेले दिल्लीश्वर नाक मुठीत धरून लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा युती करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात मातोश्रीवर आले. उद्धव ठाकरे पुन्हा युती करूया असा प्रस्ताव घेऊन भाजपाकडे गेले नव्हते, याची राज ठाकरेंनी नोंद घ्यावी. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जास्तीतजास्त जागा मिळवण्यासाठी शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची गरज होती, शिवसेनेची नव्हे....! त्यानंतर सत्तेच्या पदांचे समसमान वाटप हा फॉर्म्युला ठरला. मुख्यमंत्रीपद हे सुद्धा सत्तेतीलच एक पद असल्यामुळे त्याचे अडीच-अडीच वर्षे वाटप करणे अपरिहार्य होते. मुळात शिवसेना व भाजपमध्ये युतीच्या चर्चेत काय ठरले यात मनसे प्रमुखाला नाक खुपसण्याचे काहीच कारण नाही. सांगायची गोष्ट एवढीच की मोदी लाटेतही उद्धव ठाकरे भाजपशी एकटेच लढले. राज ठाकरेंसारखी कारणे देत नाही बसले. महाराष्ट्रात मनसेने सत्ता मिळवणे खूपच दूर राहिले. थोड्या वेळासाठी विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागांवर विजयी झाली हा मुद्दा सुद्धा बाजूलाच ठेवूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर २००९ साली पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला संपूर्ण महाराष्ट्रात २५ लाख ८५ हजार म्हणजे जवळपास ५.७१% मते मिळाली होती.
२०१४ साली दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेला संपूर्ण महाराष्ट्रात १६ लाख ६५ हजार म्हणजेच ३.१५% मते मिळाली. २०१९ साली तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेला संपूर्ण महाराष्ट्रात १२ लाख ४२ हजार म्हणजेच २.२५% मते मिळाली. हा चढता नव्हे तर उतरता आलेख आहे. मनसेला लोकसभा निवडणूक लढवणे बंदच करावे लागले आहे. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे २ आमदार, अबू आझमींच्या समाजवादी पक्षाचे २ आमदार आणि एमआयएम पक्षाचे २ आमदार निवडून आले. मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत नव्यानेच स्थापन झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला २५ लाख २३ हजार मते मिळाली आणि तेरा वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्ष म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्या निम्मेसुद्धा मते मिळत नाहीत. पक्षाची ही उतरती कळा नेमके काय दर्शवते...? राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी शिवसेना संपली या आसुरी आनंदात टेलिव्हिजनवर मुलाखती देत बसायचे, ही गोष्ट खरोखरच हास्यास्पद आहे.
राज ठाकरे तुम्ही ज्या शिवसेनेला संपली म्हणून हिणवत आहात त्या शिवसेनेचे विधानसभेत आजही मनसेच्या पंधरा पट म्हणजेच १५ आमदार आहेत. लोकसभा निवडणूक लढवायची म्हटली की मनसेची हातभर फाटते, त्या लोकसभेत शिवसेनेचे आजही ७ खासदार आहेत. महाराष्ट्राबाहेर जाऊन दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणायची किमया उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेचे राज्यसभेत ३ खासदार आणि विधान परिषदेत ११ आमदार आहेत. भविष्यात अमित ठाकरेंना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान द्यायचे म्हटले तरी त्यांना विधानपरिषदेत आमदार करण्यासाठी तुम्हाला भिकेचा कटोरा घेऊन भाजपच्याच दारात उभे राहावे लागेल. ही तुमच्या पक्षाची खरी औकात आहे आणि तुम्ही शिवसेना संपल्याचे आनंदोत्सव कसले साजरे करताय...? शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होऊन एखादा दिवस रिलायन्सचे शेअर घसरले की रस्त्यावरचा पाणीपुरीवाला भैय्या मुकेश अंबानी रिलायन्सचे सर्वेसर्वा म्हणून कसे योग्य नाहीत, आता रिलायन्स कंपनी कशी नामशेष होणार आणि धीरूभाई अंबानी हे कसे ग्रेट होते यावर लेक्चर देतो तेव्हा त्यावर हसावे की रडावे तेच कळत नाही. अरे बाबा, रिलायन्सचे शेअर आज घसरले आहेत ते उद्या पुन्हा वर जाणार आहेत.
रिलायन्सची काळजी तू कशापायी करतोय...? त्यापेक्षा तू तुझी पाणीपुरीची गाडी सांभाळ...! उद्या ती टुकटुक सुरु असलेली पाणीपुरीची गाडी कायमची बंद झाली तर तुझे पोटापाण्याचे वांधे व्हायचे....! उद्धव ठाकरेंनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या १९६६ ते २०१२ या कार्यकाळात शिवसेना १९९५ ते २००० अशी पाच वर्षेच सत्तेत राहिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दहा वर्षाच्या कार्यकाळात २०१४ ते २०२२ अशी सलग आठ वर्षे शिवसेना सत्तेत राहिली आणि त्यात उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतः मुख्यमंत्री राहिले, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचे नाव सुवार्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांना शॅडो कॅबिनेट स्थापन करून मुख्यमंत्रीपद भूषवायाची वेळ आली नाही. अशा उद्धव ठाकरेंना आयुष्यभर अपयशी ठरलेल्या राज ठाकरेंनी फुकाचे सल्ले कशापायी द्यावेत....?
शिवसेना संपली की पुन्हा उफाळून वर आली हे पाहायचे असेल तर त्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका होईपर्यंत वाट पाहावी लागेल. शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार गद्दारी करून पळून गेल्यानंतर आणि वडील उद्धव ठाकरे घरात आजारी असताना वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आदित्य ठाकरे हा तरुण मुलगा दिल्लीच्या महाशक्ती विरोधात लढा देण्यासाठी एकटाच उभा राहतो. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालतो आणि या तरुणाच्या मागे महाराष्ट्रातील जनता ठामपणे उभी राहते. त्याच्या रॅलीना हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात कारण तो पोरगा आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दंड थोपटतोय. दुसरीकडे राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे सुद्धा महाराष्ट्रभर दौरे करतोय पण त्यांच्या दौऱ्याला जनतेचा प्रतिसाद मिळत नाहीये कारण त्यात कसलाच संघर्ष नाहीये. आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलंय की त्याच्याही अंगात जे रक्त वाहतंय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचेच आहे. ठाकरे कधीही परिस्थितीसमोर झुकत नसतात तर नेहमीच संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहतात आणि शेवटपर्यंत संघर्ष करतात. दुर्दैवाने काही ठाकरे ईडीची एक नोटीस आल्यानंतर शेपूट आत घालून 'लाव रे तो व्हिडीओ'चा शो बंद करून हनुमान चालीसाचे भोंगे वाजवण्यात समाधान मानतात.
महाराष्ट्रातील जनता अशा पळपुट्या आणि रणछोडदास नेत्यांना कधीच स्वीकारत नाही. संघर्षातून साम्राज्य निर्माण करणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो. त्यामुळेच दिल्लीवर भगवा फडकावणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजीराव पेशव्याची इतिहासात 'पळपुटा बाजीराव' म्हणून नोंद केली जाते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ईडीच्या नोटीसीमुळे युद्ध सोडून पळालेल्या नेत्यांची नावे घेतली जातील त्यात राज ठाकरेंचे नाव सर्वात अग्रभागी असेल. २०१९ साली विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ आणि काँग्रेसचे ४१ आमदार होते. भाजपने मेगाभरती या गोंडस नावाखाली यातील सुमारे ५० आमदार आपल्या पक्षात सामील करून घेतले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून नामशेष होतील की काय अशीच शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी वर्तवली होती. त्यावेळी शरद पवार हे एकटेच संघर्षाच्या पावित्र्यात होते. राज ठाकरेंवर केलेला ईडी नोटिसीचा प्रयोग शरद पवारांवर करावा आणि त्यांनासुद्धा घरी शांत बसवावे यासाठी भाजपने त्यांना सुद्धा ईडीची नोटीस पाठवली. शरद पवारांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन "दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही" हे छातीठोकपणे सांगितले. ईडीच्या कार्यालयात चौकशीकरिता मी स्वतःच उपस्थित राहतो, अशी घोषणा करताच सगळा महाराष्ट्र या ऐशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्यांना ईडी नोटीस पाठवणाऱ्या यंत्रणांची पळापळ झाली आणि त्यांनी चौकशीसाठी येऊ नये म्हणून पोलिसांना विनंती करायची वेळ आली. पुढच्या एका महिन्यात शरद पवारांनी एकट्याने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण फिरले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९८ आमदार निवडून आले. आज भाजपने ४० आमदार फोडल्यानंतर अजिबात न डगमगता आदित्य ठाकरेंनी संघर्षाची भुमिका स्वीकारली आहे. त्यामुळे संघर्ष करणाऱ्या शिवसेनेचे आणि आदित्य ठाकरेंचे भवितव्य महाराष्ट्रातील जनता ठरवेल. राज ठाकरेंनी त्याची अजिबात काळजी करू नये. त्यांनी स्वतःची गमावलेली विश्वासाहार्ता पुन्हा कशी मिळवता येईल याचा गांभीर्याने विचार केला तर पक्ष दुसऱ्यांना
भाड्याने द्यायची केविलवाणी परिस्थिती त्यांच्यावर ओढवणार नाही. राज ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, "एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशीबालाच स्वतःच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो." राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील सदस्य असल्यामुळे आजपर्यंत त्यांच्यावर कधीच टिका केली नव्हती. 'वाट आणि दिशा चुकलेले ठाकरे' म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच सहानुभूती होती. अगदी २०१४ सालच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शेवटच्या दिवसात दिलेले वडे व सूप भरसभेत काढले, तेव्हा सुद्धा ते वारंवार मिळणाऱ्या अपयशामुळे सैरभैर झाले आहेत अशी मनाची समजूत घालून मी त्यांच्या भाषणाकडे कानाडोळा केला. मात्र काल त्यांनी कपटकारस्थानी पाताळयंत्री भाजप नेत्यांची सुपारी घेऊन पुन्हा एकदा आपल्या मोठ्या भावाविरोधात गरळ ओकली.
त्यांच्या बोलण्याचा रोख रश्मी वहिनींकडे सुद्धा होता. ज्या मातोश्रीच्या वास्तूत ते लहानाचे मोठे झाले ती मातोश्री आणि शिवसेना आज चारीबाजूंनी संकटात असताना त्यावर वार करण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून केला. कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही असे म्हटले जाते. मोठा भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला या जळफळाटात द्वेषयुक्त भावनेने राज ठाकरे हा माणूस इतका आंधळा बनलाय की त्यांनी कालच्या मुलाखतीत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लेखाच्या शेवटी त्यांना त्यांच्याच भाषेत एक वाक्य सांगेन- "एखादा माणूस ज्या दिवशी ईडीच्या नोटीशीला घाबरून सुपाऱ्या घेत स्वतःचे कर्तृत्वच दुसऱ्याच्या दावणीला बांधतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो."