कपड्यांवरच्या खर्चावरती बोलू काही ! – डॉ. विनय काटे
भारत जोडो यात्रेत असलेल्या राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. पण राहुल गांधी यांचा काही हजारांचा शर्ट ते पंतप्रधान मोदी यांचा १० लाखांचा सूट या चर्चेवर परखड मत व्यक्त करणारा डॉ. विनय काटे यांचा लेख...
भारत जोडो यात्रेत असलेल्या राहुल गांधी यांच्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. पण राहुल गांधी यांचा काही हजारांचा शर्ट ते पंतप्रधान मोदी यांचा १० लाखांचा सूट या चर्चेवर परखड मत व्यक्त करणारा डॉ. विनय काटे यांचा लेख...
उपलब्ध खात्रीशीर माहिती:
अ) राहुलचा Burberry चा पोलो टीशर्ट 350 पौंड स्टर्लिंगचा (जवळपास 32 हजार भारतीय रुपयांचा) आहे. राहुलकडे हा एकमेव महागडा टीशर्ट नक्कीच नसेल.
ब) 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार राहुल गांधींची मालमत्ता 15.8 कोटी रुपयांची आहे, ज्यात 5.8 कोटी रुपयांची चल मालमत्ता (सेव्हींग, शेअर्स, बॉण्ड्स इत्यादी) आणि 10 कोटी रुपयांची अचल मालमत्ता (शेतजमीन, ऑफिस) आहे.
क) 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली मालमत्ता 2.5 कोटी रुपयाची आहे, ज्यात 1.4 कोटी रुपयांची चल संपत्ती आणि 1.1 कोटी रुपयांची अचल संपत्ती (घर) आहे.
ड) 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली मालमत्ता फक्त 1.5 कोटी रुपयाची आहे, ज्यात 51 लाख रुपयांची चल संपत्ती आणि 1 कोटी रुपयांची अचल संपत्ती (घर) आहे.
-------
तुलनात्मक विश्लेषण-
1) राहुल गांधीच्या टीशर्टची गोष्ट:
5.8 कोटी रुपयांच्या संपत्तीवर वर्षाला 10% रिटर्न गृहीत धरला तरी राहुल गांधी वर्षाला 60 लाख रुपये संपत्तीमध्ये जोडतात. त्यांना संसार नाही, घरभाडे नाही, मुलबाळ नाही... त्यामुळे महिन्याला 5 लाख जोडणारा एकटा माणूस 30 हजाराचा टीशर्ट नक्कीच घालू शकतो. त्यांची पिढीजात संपत्ती आहे त्यातूनही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना काही कपडे भेट दिलेले असूही शकतात. बहुतांश वेळी राहुल गांधी साध्या सुती कपड्यात असतात. त्यामुळे कधीकधी त्यांनी Burberry चा टीशर्ट घालणे त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने काहीच विशेष नाही.
2) मोदींच्या कपड्यांची गोष्ट:
2014 मध्ये 51 लाखांची चल संपत्ती असणाऱ्या मोदीजीना 10% रिटर्न गृहीत धरले तर ते वर्षाला 5 लाख कमावत होते. सोबत त्यांना मानधन म्हणून वर्षाला 20 लाख मिळतात. थोडक्यात 2014 ते 2019 या काळात मोदीजी वर्षाला 25 ते 30 लाखाच्या आसपास कमावत होते. 2019 नंतर कदाचित ते वार्षिक 30-35 लाखांच्या आसपास उत्पन्न ठेवून असतील.
2018 साली रोहित सबरवाल यांच्या RTI ला दिलेल्या उत्तरात PMO तर्फे सांगण्यात आले की सर्वच पंतप्रधानाच्या कपड्यांचा खर्च वैयक्तिक खिशातून येतो आणि सरकार त्यावर खर्च करत नाही. गेल्याच आठवड्यात अजुन एका RTI ला PMO तर्फे सांगण्यात आले की मोदीजी स्वतःच्या जेवणाचा खर्च स्वतः करतात.
2015 मध्ये ओबामांना भेटताना मोदींनी घातलेल्या सुटची किंमत किमान 10 लाख रुपये होती. त्यांच्या दिवसातून 3-4 वेळा बदलल्या जाणाऱ्या डिझायनर शाली, उपरणी, कुर्ते, सुट, गॉगल्स यांची किंमत नक्कीच काही लाखात असेल. वर्षाला फक्त 25-30 लाख उत्पन्नात दररोज एवढे भारी कपडे आणि मेजवान्या मोदींना कशा परवडतात हा जास्त मोठा प्रश्न आहे!
आणि हो... भारतभ्रमण करताना इथले गरीब लोक पाहून गांधीजींनी महागडे विलायती कपडे कायमचे टाकून दिले याची राहुल गांधींना कुणी आठवण करून द्यावी. इम्पोर्टेड कपडे घालून भारत जोडता येत नाही!
मी साधे कपडे घालायचा सल्ला फक्त राहुलना देतोय... कारण तिथे बदलाची थोडी शक्यता आहे. मोदींकडे ती शक्यता अजिबात नाहीये. त्यांचं आहे तसे चालू द्या!
- डॉ. विनय काटे