आपण एका वाईट काळाकडे प्रवास करत आहोत – राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रेला बुधवारी तामिळनाडूमधून सुरूवात झाली आहे. त्यांच्या या यात्रेच्या सुरूवातीला राहुल गांधींनी भाषण केलं त्यांच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्यांचं इंग्रजीत असलेलं हे संपुर्ण भाषण मराठीमध्ये अनुवादीत केलंय श्वेता एस व्ही यांनी. जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख…;

Update: 2022-09-08 04:33 GMT

आज तामिळनाडू मधून भारत जोडो यात्रेची सुरुवात करताना राहुल गांधी यांनी इंग्रजीत केलेल्या भाषणाचा मी मराठीत केलेला स्वैर अनुवाद शेअर करत आहे. अगदी मोजक्या शब्दात सोपं आणि महत्त्वाचं बोलून भारत जोडो यात्रेचं ध्येय राहुल गांधींनी उलगडून सांगितलंय.

ईथे उपस्थित सर्वाना माझा नमस्कार. स्टेजवर उपस्थित दिग्विजय सिन्घ जी, पी चिदंबरम जी, दिनेश गुंटुराव जी ,सेलवा पेरुंतगाई जी, शेलाकुमारजी , माणिक टागोर जी, विजय वसंत जी, ज्योतिमनी जी, काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते, पक्षाचे कार्यकर्ते, माध्यमांमधील मित्र , तुम्हा सर्वाचं मी आज इथे मनापासून स्वागत करतो. तामिळनाडूला येणे हे माझ्यासाठी नेहमीच आनंदाचे आणि सन्मानाचे राहिले आहे. तुम्ही माझं तामिळनाडू सोबत असलेलं नातं जाणताच. ह्या अदभूत आणि सुंदर राज्यात, समुद्राच्या किनार्यावर भारत जोडो यात्रेची सुरुवात करताना मला प्रचंड आनंद होत आहे.

भारतातला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष उलटून गेल्यावर आपल्याला म्हणजे फक्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या लोकांनाच नाही तर देशातल्या कोट्यावधी जनतेला भारत जोडो यात्रा करावी याची गरज का वाटत आहे? ह्या देशात जे काही घडत आहे, ज्यामुळे देशातल्या कोट्यावधी लोकांना असे वाटते आहे की असं काहीतरी करावं ज्याने भारत एक होईल. भारतीय ध्वज हवेत फडफडतो आहे, आणि आपण सगळेच ह्या ध्वजाकडे बघतो आणि त्याला प्रणाम करतो. काही लोक ध्वजाकडे बघतात आणि ते त्यातले तीन रंग , अशोक चक्र आणि कापड बघतात आणि ध्वजाला प्रणाम करतात. पण हा ध्वज म्हणजे फक्त तीन रंग, एक चक्र आणि कापडाचा तुकडा नाहीये. हा ध्वज ह्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आहे. आणि हा ध्वज आपल्याला सहजरित्या मिळालेला नाहीये. आणि कुणी आपल्याला भेटही दिलेला नाहीये. हा ध्वज भारतीय लोकांनी कमावलेला आहे. हा ध्वज ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतो. हा ध्वज ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो. हा ध्वज ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भाषेचं प्रतिनिधित्व करतो. हा ध्वज ह्या देशात असलेल्या प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करतो.


हा ध्वज कुण्या एका माणसाने कमवलेला नाहीये. ह्या देशातल्या प्रत्येक भारतीयाने तो कमावलेला आहे. हा ध्वज कुण्या एका राज्याचा नाही तर देशातल्या प्रत्येक राज्याचा आहे. हा ध्वज कोणत्याही एका धर्माचा, जातीचा , भाषेचा नाही तर तो प्रत्येक धर्माचा , प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक भाषेचा आहे. ह्या ध्वजामध्ये जे काही आहे ती आपली ओळख आहे. फक्त देश म्हणूनची किंवा फक्त राज्य म्हणूनची ओळख नाही तर प्रत्येक भारतीय माणसाची ओळख म्हणजे हा ध्वज आहे. हा ध्वज प्रत्येक भारतीय माणसाला ह्या देशात राहताना त्याच्या सुरक्षेची हमी देतो. हा ध्वज प्रत्येक भारतीय माणसाला ह्या देशात स्वतंत्र आणि योग्य आयुष्याची हमी देतो. हा ध्वज प्रत्येक भारतीय माणसाला ह्या देशात त्याची इच्छा असेल त्या धर्माचं पालन करण्याची आणि त्याला इच्छा असेल ती भाषा बोलण्याची हमी देतो.

भावांनो आणि बहिणींनो, आज ह्या ध्वजावरच हल्ला केला जात आहे. कोणतीतरी एक कल्पना / विचारधारा आपल्या देशातल्या लोकांवर लादणे ही भारताची ओळख नाही. भारत म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाच्या इतिहास, संस्कृती आणि भाषेचा संयोग आहे. भारत ह्या ध्वजाला जपणाऱ्या / त्याचं संरक्षण करणाऱ्या संस्थानी मिळून बनला आहे. भारत म्हणजे ह्या ध्वजाचं सरंक्षण करणाऱ्या स्वतंत्र माध्यमसंस्था. भारत म्हणजे ह्या ध्वजाचं सरंक्षण करणारी न्यायव्यवस्था. आणि आज आपल्या देशातील ह्या ध्वजाचं रक्षण करणारी प्रत्येक संस्था , भाजपा आणि आर एस एस मुळे धोक्यात आहे. त्यांना वाटतं हा ध्वज म्हणजे त्याची वैयक्तिक संपत्ती आहे. त्यांना वाटतं ह्या देशातल्या लोकांचं, ह्या देशातील राज्याचं भविष्य ते एकहाती ठरवू शकतात. त्यांना वाटतं इडी , सी बी आय , इन्कमटॅक्स सारख्या संस्थांचा वापर करून ते विरोधकांना घाबरवू शकतात. अडचण अशी आहे कि त्यांना अजूनही भारतीय माणूस समजलाच नाहीये. भारतीय माणसे घाबरून जात नाहीत. तुम्ही कितीही तासाची चौकशी लावा ,विरोधी पक्षातील एकही नेता भाजपाला घाबरणार नाहीये. भाजपाला वाटतं ते ह्या देशात धर्माच्या , भाषेच्या नावावर फूट पाडू शकतात. पण ह्या देशात अशी फूट पाडता येणे शक्य नाही. हा देश नेहमी एकसंध राहील.

आज भारत वाईट आर्थिक संकटाला तोंड देत आहे. आपण आजपर्यंत कधीच बघितली एवढी बेरोजगारी आज वाढली आहे. देश एका आपत्तीकजनक स्थितीकडे जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमधील आपले मित्र पूर्णपणे दबावाखाली आहेत. प्रत्येकाला हे समजतंय.पण टीव्ही वर आपल्याला बेरोजगारीबद्दल काहीच दिसत नाही. किंवा भाववाढीबद्दलही तिथे कुणी बोलत नाही. आपल्याला टीव्हीवर दिसत राहतो फक्त आपल्या पंतप्रधानांचा चेहरा! भाजपा सरकारने पद्धतशीरपणे ह्या देशातल्या शेतकऱयांवर , कामगार वर्गावर आणि लघु आणि मध्यम उद्योगांवर हल्ला केला आहे. आज देशातील काही मोठे उद्योग ह्या देशाला नियंत्रित करत आहेत. बंदरे, विमानतळे, कोळसा , वीज , टेलिकॉमसारख्या सगळे मोठे उद्योगधंदे काही मोजक्या लोकांनी नियंत्रित केलेले आहे. ह्या लोकांच्या सहयोगाशिवाय पंतप्रधान एक दिवसही सत्ता राखू शकत नाहीत. माध्यमसंस्था त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि ते काळजी घेतात कि पंतप्रधान टीव्हीच्या पडद्यावर चोवीस तास दिसत राहतील. ह्याबद्ल्यात पंतप्रधान त्यांना हवी ती / त्यांना फायदेशीर ठरतील अशी धोरणे बणवतात आणि राबवतात . नोटबंदी , सदोष जी एस टी आणि तीन शेतकरीविरोधक कायदे, हे सगळेच त्या मोजक्या उद्योपतींना लाभ व्हावा म्हणून घेतले गेलेले आणि राबवलेले निर्णय आहेत.


भारतात ब्रिटीशां नी केले त्याचप्रकारे हा सगळा खेळ चालला आहे- भारतात फूट पाडा, भारतीय लोकांना एकमकांच्या विरोधात लढायला भाग पाडा आणि मग त्यांचं शोषण करा. त्याकाळी एकच मोठी कंपनी होती, जिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी, जी अख्खा देश नियंत्रित करायची, आज तीन चार मोठ्या कंपन्या आहेत ज्या भारताला नियंत्रित करीत आहेत. नोटबंदी , सदोष जी एस टी आणि तीन शेतकरीविरोधक कायद्यांसारख्या गोष्टी भारतीय लोकांचं भविष्य हिरावून घेण्यासाठी, भारतातल्या गरीब जनतेला लुबाडण्यासाठीच आकाराला आल्या आहेत. भारतातल्या लघु आणि मध्यम उद्योगांमधून आणि शेतीमधून रोजगार निर्मिती होते. पण आज लघु आणि मध्यम उद्योग भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतकरी मोठ्या कष्टात जीवन व्यतीत करत आहेत. याचा परिणाम असा झालाय की भारतात युवांसाठी रोजगार निर्मिती करणे अशक्य झाले आहे. आणि जर युवा कमवू शकत नसतील तर आर्थिक संकट वाढतच जाणार आहे. आपण एका वाइट काळाकडे प्रवास करत आहोत. आणि म्हणून भारताच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांची एकी टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तरच भारत मजबूत राहू शकेल. आणि हेच भारत जोडो यात्रेचं ध्येय आहे. भारत जोडो यात्रा भारताच्या लोकांचा आवाज ऐकण्यासाठी आकारास आलेली आहे. आर एस एस आणि भाजप ज्यापद्धतीने भारतीय लोकांचा आवाज दाबत आहे , ते आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आम्हाला भारतीय लोकांचा आतला आवाज ऐकायचा आहे.

पुन्हा एकदा सांगावस वाटतं , इथे येणं आणि तुम्हा सर्वांशी संवाद साधणं हा मी माझा सन्मान समजतो. ह्या सुंदर आणि अद्भुत राज्यात येणं माझ्यासाठी नेहमीच आनंददायी राहिलं आहे. आणि शेवट करताना मी माझे बंधू, तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिनजी यांचे इथे येण्याबद्दल आणि मला भेटण्याबद्दल आभार मानतो. तुमच्यापैकी अनेकांना मी यात्रेच्या निमित्ताने भेटलेच अशी आशा मला आहे. आणि कृपया लक्षात ठेवा फक्त ध्वजाला प्रणाम करणे पुरेसे नाही तर , ह्या ध्वजामागील मूल्ये आणि कल्पना यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

धन्यवाद

मूळ भाषण - राहुल गांधी ( इंग्रजी)

अनुवाद - श्वेता एस व्ही

Tags:    

Similar News