राहूल गांधी आणि हिंदुत्वाच्या मांडणीतील गोंधळ:ज्ञानेश वाकुडकर
नुकतीच राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्व यांची वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न आणि उद्देश जरी चांगला असला, तरी त्यात गफलत आहे. ती दूर व्हायला हवी, असे लोकजागर चे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी म्हटले आहे.
बऱ्याच विचारवंताकडून हिंदू - हिंदुत्ववाद या बाबतीत अलीकडे फार एकांगी मांडणी केली जाते. त्याचाच प्रभाव राहुल गांधी यांच्या मांडणीवर स्पष्टपणे जाणवतो. हिंदू धर्म असो की कोणताही धर्म असो, विकृतीचा आपण विरोध करायलाच हवा. विकृती पसरविणारे लोक प्रत्येक धर्मात आहेत. कोणताही धर्म त्याला अपवाद नाही. हिंदू धर्मातील विकृतीविरुद्ध हिंदू संतांनी वेळोवेळी विद्रोह केलेला आहे. आजवर तो सुरूच आहे. पण आजच्यापेक्षा संतांचा विद्रोह मोठा होता. तो काळही जीवघेणा होता. या बाबतीत फुले - शाहू - आंबेडकर या महापुरुषांचे जसे उपकार आहेत, तसेच हिंदू संतांचे उपकार देखील आपण विसरता कामा नये. पण अलीकडे काही लोक मुद्दाम बुद्धिभेद करत असतात. राहूल गांधी यांची मांडणी त्या बुद्धिभेदाची शिकार झाली आहे, हे इथे स्पष्टपणे सांगायलाच हवे.
काळाचा विचार केला तर संत नामदेवासह संत ज्ञानेश्वर आणि भावंडांचा विद्रोह जास्त मोठा होता. किंवा त्याच्याही आधी महात्मा चक्रधर, महात्मा बसवेश्वर यांनीही धर्म सुधारणेसाठी फार मोठी किंमत मोजली आहे. तुकाराम महाराजासह अनेकांना स्वतःचे जीव गमवावे लागले. नामदेवांनी महाराष्ट्र सोडला नसता तर त्यांचाही जीव गेला असता. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना सनातन्यांनी पाण्यात बुडवून मारलं. (जल समाधी घ्यायला लावली याचा अर्थ काय ?) त्यावेळी या चारही भावंडांचं वय काय होतं ? त्यांच्या बालमनावर केवढा आघात झाला असेल ? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई.. या कोवळ्या पोरांचा नेमका काय दोष होता ? एवढं सारं भोगुनही ज्ञानेश्वरांनी बहुजन समाजाला कळावी म्हणून मराठीमध्ये भावार्थ दीपिका (ज्ञानेश्वरी) लिहिली, ही केवढी मोठी हिम्मत आहे ? हा विद्रोह सामान्य होता का ? या पोरक्या पोरांना किती छळ सोसावा लागला ? समाजाने त्यांना गुरू मिळू दिला नाही. एकत्र राहू दिले नाही. चारही भावंडांच्या समाधी चार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, याचा अर्थ नेमका काय होतो ?
धर्म व्यवस्थेची दहशत किती मोठी असते, याचा पुरावा म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पाहायला हवे. सारी सत्त्ता हातात असूनही, गागा भटाला काशीवरून आणावं लागलं. त्यासाठी भली मोठी दक्षिणा (लाच) द्यावी लागली. राजा असूनही झुकावं लागलं ! सत्ता होती, पैसा होता, सैनिक होते, तलवारी होत्या, किल्ले होते, तरीही व्यवस्थेला शरण जावं लागलं. ज्ञानेश्वरांचा काळ तर शिवाजी महाराजांच्या शेकडो वर्ष आधीचा होता. त्यावेळी किती भयंकर परिस्थिती असेल ? केवढी दहशत असेल ? पण ही चार कोवळी पोरं धर्मांधांच्या समोर झुकली नाहीत. छळ सोसला पण मोडली नाहीत. शरण गेली नाहीत. आणि तरीही ते केवळ जातीने ब्राम्हण आहेत म्हणून आमच्यातले बोरूबहाद्दर त्यांना नाकारणार, ह्याला अर्थ आहे का ? त्यांची टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानतात, ही विकृती नाही का ? बाबा आमटे सारख्या माणसाने अख्ख्या परिवारासह आणि तीन पिढ्यांनी केलेली कुष्टसेवा आम्हाला चेष्टा वाटते ! 'पुरस्कारामुळे बाबा आमटे मोठे झालेत' अशी अक्कल पाजळणारे बाजारबुणगेही काही कमी नाहीत ! रविष कुमारसारखा पत्रकार केवळ ब्राम्हण आहे म्हणून यांना शेवटी व्हीलनच वाटणार ! ही कोणती मानसिकता आहे ? आमच्याच महापुरुषांनी स्थापन केलेल्या चारदोन संस्थाही इमानदारीने सांभाळण्याची आमची लायकी नाही. त्यात आम्ही भांडणार, भ्रष्टाचार करणार आणि इतरांच्या प्रामाणिकपणाचे मात्र आम्ही ऑडिट करणार ! 'ते आम्हाला काम करू देत नाहीत, एकत्र येवू देत नाहीत' असे गळे काढणार ? म्हणजे, समाजाला लुटण्यासाठी, आपल्याच लोकांना मूर्ख बनवण्यासाठी मात्र एकत्र येवू देतात. मात्र इमानदारीने वागण्यासाठी ते तुम्हाला अडथळे आणतात.. हे कोणते तत्वज्ञान आहे ? हे कोणते प्रबोधन आहे ? हे कोणते लॉजिक आहे ? फुल्यांच्या नावाने माती खायला, आंबेडकरांच्या नावाने माती खायला, शिवाजी महाराजांच्या नावाने माती खायला ते तुम्हाला अडवत नाहीत. मात्र सामाजिक प्रश्नावर एकत्र यायला अडवतात ? समाजाचा उद्धार करायला 'ते' तुम्हाला अडवतात ? समाजाशी एकनिष्ठ राहायला ते अडवतात..आहे की नाही गंमत ?
नुसते आकडे किंवा इतिहास सांगून स्वातंत्र्य आणि सन्मान मिळत नसतो, त्यासाठी जगण्यात, वागण्यात मर्दपणा असावा लागतो. त्यागाची तयारी असावी लागते. मुलगी, बायको यांना येणाऱ्या बलात्काराच्या धमक्या सहन करण्याची ताकद असावी लागते, तेव्हा रविषकुमार होता येते. स्वतःच्या हाताने महारोग्यांच्या जखमा धुवाव्या लागतात, साफ कराव्या लागतात, तेव्हा एखादा बाबा आमटे पैदा होत असतो. आपला नेता, आपली जात गोंजारत बसल्याने किंवा दोन चार फोटो भिंतीवर लावल्याने इतिहास घडत नसतो. त्यासाठी मुळात करुणा असावी लागते. त्याग असावा लागतो. समर्पण असावे लागते. शील, चारित्र्य असावे लागते.
राहुल गांधी यांची हिंदू आणि हिंदुत्व या बाबतीतली मांडणी या पार्श्वभूमीवर तपासून पहावी लागेल. पाताळयंत्री, अंधभक्त साऱ्याच जातीधर्मात आहेत. कोणताही धर्म - धम्म - रीलिजन - मजहब त्याला अपवाद नाही. त्यामुळे जसे मुस्लिम आतंकवाद किंवा मुस्लिम आतंकवादी हा शब्द चुकीचा आहे, अन्यायकारक आहे, तसाच हिंदुत्ववाद म्हणजे विकृती ही मांडणीही चुकीची आहे. म्यानमारमध्ये ९७ टक्के बौद्ध धर्मीय लोक आहेत. पण रोहींग्या मुस्लिम समुदायाबद्दल काय घडले ? त्यासाठी धर्म जबाबदार आहे का ? काही लोक जबाबदार आहेत. विशिष्ट कंपू जबाबदार आहे. मार्क्सचे नाव घेऊन हिसंक कारवाया करणाऱ्या काही संघटना असतील, तर त्यासाठी सारेच मार्क्सवादी कसे काय दोषी ठरू शकतात ? गांधी - नेहरूंची काँग्रेस वेगळी होती. आता काँग्रेसच्या नावावर भ्रष्टाचार करणारे अनेक आहेत, म्हणून काँग्रेसवादी किंवा काँग्रेसी असलेला सामान्य कार्यकर्ता देखील भ्रष्टाचारी आहे, असे म्हणता येईल का ? विशिष्ट लोकांचे पाप सामान्य कार्यकर्त्याच्या माथी मारणे योग्य होईल का ? राहुल गांधी यांनी हिंदू - हिंदुत्ववादी अशी विभागणी करण्याचा जो प्रयत्न केला, त्यामागील हेतू स्वच्छ असला तरी, मांडणीत गफलत आहे. पालक - पालकत्व, नागरिक - नागरिकत्व, राष्ट्र - राष्ट्रीयत्व तसेच हिंदू - हिंदुत्व ! जसे लोकशाही पासून लोकशाहीवादी तसेच हिंदू पासून हिंदुत्ववादी ! लोकशाही चांगली पण लोकशाहीवादी वाईट असे कसे ?
वर्णवाद वाईट आहे, म्हणून वर्णवादीही वाईटच ! जातीयवाद वाईट आहे, म्हणून जातीयवादीही वाईटच ! आतंकवाद वाईट आहे, म्हणून आतंकवादीही वाईटच ! मात्र त्याचवेळी हिंदू चांगले पण हिंदुत्व वाईट, हिंदुत्ववादी वाईट, हे कसे काय ? त्याऐवजी समतावादी हिंदू विरुद्ध वर्णवादी हिंदू ही मांडणी जास्त स्पष्ट आणि वास्तववादी आहे. त्याचा राहुल गांधींनी विचार करावा, असे सुचवावेसे वाटते. किंवा जर संघ - भाजपाबद्दल अधिक नेमकेपणाने बोलायचे असेल तर संघी हिंदू - (संघी हिंदुत्व) संघवादी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदू असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. स्वामी विवेकानंदांना जो हिंदू धर्म किंवा हिंदुत्व अपेक्षित होते, त्याला चुकीचे म्हणायचे का ? हिंदू संतांचा समतावाद मानतो म्हणून आम्ही समतावादी हिंदू, अशी स्पष्ट आणि निःसंदिग्ध मांडणी राहुल गांधींनी स्वीकारायला हवी.
तात्पर्य.. राहुल गांधीसह कुणीही चुकीची मांडणी करू नये. हिंदुत्वाच्या नावावर गोडसे आणि संघाने केलेले पाप इतर हिंदूंच्या माथी मारू नये, एवढीच विनंती.
तूर्तास एवढेच...