आर के तलवार, संजय गांधी यांना भेट नाकारणारा जिगरबाज अधिकारी...
कोण आहेत आर के तलवार ज्यांनी संजय गांधींना भेट नाकारली होती? देशांतील सार्वजनिक बॅंकांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनवण्यासाठी ‘तलवार’ यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे असं अर्थतज्ञ संजीव चांदोरकर का म्हणतायेत जाणून घ्या…;
दिवंगत आर के तलवार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, (१९६९-७८) भारतीय बँकिंग उद्योगाचे उत्तुंग दीपस्तंभ! अलीकडच्या काळात केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या जवळपास सर्व घटनादत्त अधिकार असणाऱ्या संस्था... सध्याच्या नेत्यांनी कमकुवत केलेल्या असताना एक व्यक्ती काय करणार? अशी वाक्य सर्रास तोंडावर फेकली जातात; त्यावेळी या सत्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते की, सर्वच संस्था व्यक्तीच जन्माला घालतात, वाढवतात, संपवतात.
या संस्था म्हणजे काही सूर्यमाला नव्हे. ज्यात आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही; दिवंगत तलवार यांनी तो हस्तक्षेप केला, जीवाची बाजी लावून केला. झाले असे की आणिबाणीमध्ये संजय गांधी एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र म्हणून सत्ता गाजवू लागले होते.
स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी एका सिमेंट कंपनीच्या संबंधात त्या सिमेंट कम्पनीच्या मालकाला न रुचणारा निर्णय दिला होता; तो मालक संजय गांधींकडे गेला आणि मध्यस्थी करण्यासासाठी काही डील केले.
सी सुब्रमण्यम वित्तमंत्री होते. संजय गांधी यांनी वित्तमंत्र्यांमार्फत स्टेट बँकेंच्या अध्यक्षांना तलवार यांना तो निर्णय बदलण्यासाठी निरोप पाठवला; तलवार यांनी नकार दिला. संजय गांधी यांनी तलवार यांना भेटण्यासाठी फर्मान काढले; संजय गांधी कोणत्याच शासकीय पदावर नसल्यामुळे तलवार यांनी भेटण्यास नकार दिला.
संजय गांधी यांनी वित्तमंत्र्यांना तलवार यांना एसबीआय च्या अध्यक्षपदावरून काढण्याची आज्ञा दिली. पण स्टेट बँक कायद्यात तशी तरतूद नव्हती. वटहुकूम काढून स्टेट बँक कायद्यात बदल करण्यात आला आणि तलवार यांना काढण्यात आले.
सार्वजनिक बँकांतील मध्यमवर्गातून आलेल्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांनी असा ताठ कणा ठेवला असता तर आज भारतीय बँकिंग उद्योग कितीतरी उंच जागी असता, त्याला सामान्य नागरिकांच्या मनात आदराचे स्थान असते आणि तो उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनला असता.
राजकीय नेत्यांना भ्रष्टाचारासाठी शिव्या देणे ही मध्यमवर्गाची चालूगिरी आहे. कारण कोणीही राजकीय व्यक्ती मध्यमवर्गीय प्रोफेशनल्सच्या सक्रिय वा निष्क्रिय मदतीशिवाय एका रुपयाचा भ्रष्टाचार करू शकत नाही.
नोकरशाही, न्याययंत्रणा, बँकिंग, पोलीस अशा अनेक संस्थांमधील उच्च शिक्षित, प्रोफेशनल्सनी कोणत्याच गोष्टीत तात्विक, घटनेनुसार, कायद्यानुसार ताठ भूमिका न घेतल्यामुळे देशाला रसातळाला नेले आहे. त्याबद्दल त्यांच्यापैकी एकजण बोलत नाही.
सह्या करतांना , शेरे / रिमार्क्स मारतांना पेनाची "तलवार" हातात ठेवून काम करणारे नोकरशहा, बँकर्स, न्यायाधीश हवे आहेत!
संजीव चांदोरकर (६ जुलै २०२१)