…पाकची गर्लफ्रेंड चालते
पाकची बिऱ्याणी चालते, पाकची गर्लफ्रेंड चालते, ....तरीही पाकची भीती वाटते! पंजाबसह भारतीय राजकारण्यांचा महारुद्र मंगनाळे यांनी घेतलेला समाचार;
मला आठवतयं,पंजाब विधानसभा निवडणुकीची कँपेन प्रशांत किशोर यांची टीम करीत होती. Media, campaign and social change ही uk ची मास्टर डिग्री घेऊन नुकताच भारतात परतलेला आमचा मुलगा आनंद या टीमचा एक सदस्य होता. त्याकाळात आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी आमचं राजकारणावर सविस्तर बोलणं व्हायचं. तेव्हा आनंद बोलला होता, बाबा, कँप्टन अमरिंदरसिंह हा बेकार माणूस आहे. अतिशय आळसी, ऐशोआराम आणि खोटी प्रतिष्ठा यात अडकलेला, आत्मकेंद्री माणूस आहे.
सामान्य माणसाशी याची कुठंच नाळ नाही. याला पंजाबच्या विकासाशी काहीच देणंघेणं नाही... पण मतदार कॉंग्रेससोबत आहेत आणि कॉंग्रेससमोर कँपेनिंग करण्यासाठी कँप्टन शिवाय दुसरा माणूसच नाही...
आनंद सुरूवातीपासूनच खात्रीने सांगत होता की, कॉंग्रेस नक्की विजयी होणार पण पंजाबच्या परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. त्या चर्चेतच आनंदने कँप्टनच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडबद्दल माहिती दिली होती आणि यात तो किती अडकलाय. त्याचे मजेशीर किस्सेही सांगितले होते. तो म्हणाला होता बाबा, भारतीय राजकारणात कोण कमीत कमी वाईट आहे, कोण कमीत कमी भ्रष्ट आहे, कोण कमी हुकुमशाहीवादी आहे. यातून आपल्याला निवड करायचीय. समोर चांगला चॉईसच नाही!... अर्थात याला भारतीय मतदारही तेवढेच कारणीभूत आहेत...
पंजाबमधील युवा पिढी ड्रग्ज मध्ये किती भयानकरित्या अडकलीय ते त्यानं पाहिलं, अनुभवलं. तो सांगायचा, ड्रग्स तिथं प्रस्थापित गोष्ट आहे, राजकारण्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत अनेकजण त्यात गुंतलेत. करोडोची नाही तर अब्जोंची उलाढाल आहे. तरूणांची पिढीच्या पिढी बरबाद होतेय, पण याची कुणालाच चिंता नाही.
प्रशांत किशोरच्या IPAC ला किंवा कॅप्टनलाही हा प्रश्न सोडवायचा नव्हता. मात्र, हे सगळं बघून आनंद खूप अस्वस्थ होता. त्याने IAPC ला ड्रग्सविरोधातील एक प्रभावी कँपेन बनवून दिली होती. ती बघून मी त्याचं कौतूकही केलं होतं .पण IPAC ने ती कँपेन राबवली नाही. तेव्हाच आनंदचं प्रशांत किशोरबद्दल चांगलं मत राहिलं नाही.
पंजाबचे निवृत्त पोलिस महासंचालक शशिकांत यांना सोबत घेऊन आनंद ने 'The Drugged State of Punjab' हे पुस्तक लिहीलं. निवडणुका दीड-दोन महिन्यांवर आल्या होत्या. हे पुस्तक कॉंग्रेससाठी उपयुक्त ठरणार होतं. त्यामुळं निवडणुकीआधी ते प्रकाशित होणं गरजेचं होतं. पण एवढ्या तातडीने दिल्लीतील कोणी प्रकाशक ते छापायला तयार नव्हता. त्यांना ते गैरसोयीचं वाटतं असावं. परिस्थिती बघून मी युध्दपातळीवर मुक्तरंग प्रकाशनतर्फे ते पुस्तक छापलं. पुस्तकं दिल्लीला पाठवलं. प्रकाशनाचा मोठा इव्हेंट करायचा असं आनंदने ठरवलं. पण कँप्टनचा ड्रग्सविरोधी मोहिमेबद्दलचा थंड प्रतिसाद बघून, निवडणुकाआधीच त्यानं पंजाब सोडलं आणि इरोम शर्मिला ला मदत करायची म्हणून मणिपूर ला गेला. ती मोहीम त्याने एकट्याने राबवली.
आजच्या आनंदच्या एका पोष्टमुळे हे सगळं आठवलं.
पंतप्रधान मोदी गुपचुप पाकिस्तानला जाऊन बिऱ्याणी खाऊन येतात, जमेल तेव्हा पाक पंतप्रधानांच्या गळ्यात पडतात आणि इकडे भारतात मात्र, सतत पाकच्या नावाने बोटं मोडतात. त्याची भीती लोकांना घालतात. आणि भक्त रात्रदिवस पाकचा द्वेष करीत जगतात. पाकिस्तानी गर्लफ्रेंड असणारे कँप्टन अमरिंदरसिंह, सिध्दूची पाकीस्तानच्या सैन्यप्रमुखाशी मैत्री आहे म्हणून त्याला मुख्यमंत्री बनवू नका, असे सांगतात...
सैन्यप्रमुखाच्या मैत्रीपेक्षा गर्लफ्रेंडची मैत्री जास्त धोकादायक ठरू शकते. तेव्हा लक्षात येतं. राजकारणी ही हलकट जमात आहे. सत्तेसाठी ते काहीही बोलतात आणि त्यांच्यावर आंधळेपणाने प्रेम करणारे, भक्ती करणारे हे महामुर्ख असतात...
ज्या देशात दिवसेंदिवस विविध राजकीय नेत्यांच्या भक्तांची संख्या वाढत चाललीय,तिथे लोकशाहीला चांगले दिवस येणं कठीण आहे. या देशात पाकिस्तान नावाचं हे बुजगावणं कायम चलनी नाणं राहणार आहे. आजकाल आम्ही राजकारणावर फारशी चर्चा करीत नाही.