सावरकरांच्या मुद्द्यावरून पळ का काढत आहात? प्रा. हरी नरके यांचा सवाल
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर भाजप, RSS ने मोठं अकांडतांडवं केलं. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांचा मुद्दा काढल्यानंतर भाजप पळ का काढत आहे? असा सवाल ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांनी केला आहे.;
राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्यावर केलेली टिका अनेकांना झोंबली आहे. त्याबद्दल नाराजी विविध प्रकारे समोर येतेय. वादग्रस्त वक्तव्य टाळायला हवीत, भारत जोडो उत्तम चालली होती पण यामुळे ती ढेपाळली, टिका करून भारत कसा जोडणार? असा सूर लावला गेला. उपस्थित केलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे न देता बगल दिली गेली. द्या ना उत्तरे. होऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी..भलतेच मुद्दे उकरून काढून पळ का काढताय? बुद्धिभेद आणि बगल देणे ही संघाची नेहमीची ट्रिक...पण आता ती बोथट झालीय मालक.
१) छ्त्रपती शिवराय, महात्मा फुले,सावित्रीमाई आदींवर बदनामीकारक गरळ ओकली जाते तेव्हा मौनात जाणारे मिडीया आणि मध्यम - उच्च मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी आणि बुद्धिहीन सावरकर प्रकरणात इतके का चवळतात?
२) २०१९ साली abp माझा वाहिनीने सावरकरांवर कार्यक्रम केला तेव्हा एंकर प्रसन्न जोशी आणि वाहिनी प्रमुख राजीव खांडेकर यांच्यावर तुफान आगपाखड करणारे प्रामुख्याने सावरकरवादी चित्पावन आता राहुल गांधी आणि त्यांच्या पाठीशी असलेली बुद्धिजीवी - बहुजन फळी यांच्यावरही तेच हत्त्यार वापरणार का? गोची आहे पंत.बहुजन फौज जेव्हा दिमतीला असते तेव्हाच पेशवे जिंकतात.बहुजन विरोधात एकवटतात तेव्हा पेशवाईचा अंत ठरलेला असतो.
३) स्वातंत्र्य चळवळीत आपण नव्हतो, तेव्हा ब्रिटीशांकडे इमाने इतबारे नोकरी करीत होतो, तरीही स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले, याचेही श्रेय घ्यायचे आहे, प्रेणेते म्हणूनही मिरवायचे आहे हा अपराधगंड आणि श्रेयाची लुबाडणूक यासाठी संघाची ही चढाओढ चालू आहे.
४) सावरकर ही केवळ व्यक्ती नाही. त्यांच्यारूपाने जात आणि वर्गाच्या वर्चस्वाचा हितसंबंध राखला जाणे ज्या पेशव्यांसाठी आवश्यक आहे ते सावरकरांची पाठराखण करणारच.
५) काँग्रेसच्या काळात सावरकर ही झाकली मूठ आणि तरीही देव अशी प्रतिमा जपण्यात यशस्वी झालेला वर्ग जाग्या झालेल्या बहुजन अग्या मोहोळाला कसा सामोरा जाणार आहे ते दिसेलच.
६) एरवी पॉलिटिकली करेक्ट राहणारा मीडिया आणि हिंदुत्वाचा धंदा करणारा चित्पावन आता मात्र जितके समर्थन करील तितका गाळात जाईल. तेव्हा लगे रहो, रणजित सावरकर, शरद पोंक्षे, देवेनभाऊ आणि चमू...
प्रत्येकाची झाडाझडती होतच असते. आता तुमची वेळ आहे. दिस येतील, दिस जातील, परसेपशन बदलेल, शेंदूर निघेल...