लॉकडाऊन काळात पोस्टमनची सेवा बंद होती का?
डाकीया डाक लाया... हे गीत अनेकांना माहितही नसेल... कारण पूर्वी लेखकांच्या लिखाणात असलेला पोस्टमन आता हळूहळू गायब होत चालला आहे. इंटरनेटच्या काळात तुम्ही म्हणाल डाकीयाचं काय काम? मात्र, इंटरनेटचे युग असूनही लॉकडाऊन काळात आपल्या जिवाची परवा न करता पोस्टमनची सेवा करणाऱ्या सय्यद भाई यांची कहाणी.. सानिया भालेराव यांनी शेअर केलेला अनुभव...;
कोरोना लसीकरण आता सुरु झालं आहे आणि येत्या वर्षभरात टप्याटप्याने आपल्या सर्वांपर्यंत ही लस पोहोचणार आहे. कोरोना काळ आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या पातळीवर अवघड होता आणि विज्ञानाची आणि माणुसकीची कास धरून एक समाज म्हणून आपण सर्वांनी केलेली ही वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे.
कोरोना काळात जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये होतो, कोरोनापासून बचाव करण्याकरिता आपापल्या घरांमध्ये सेफ बसून होतो. तेव्हा पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स, वैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक हे सर्व जण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून त्यांचं कर्तव्य पार पाडत होते.
यंत्रणेने काय केलं नाही यावर आपण बोट ठेवत असतोच. मात्र, यंत्रणेने कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या यांच्याकडे कधी कधी कळत नकळत आपल्याकडून दुर्लक्ष होत असतं. केंद्र सरकारने कोरोना काळात स्वतःच काम निष्ठेने पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अत्यंत उत्तम उपक्रम हाती घेतला आहे आणि त्यामुळे या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक होतं आहे.
आपल्याला खूपदा वाटतं की हे असे उपक्रम फक्त कागदावर राहतात. पण हा आपला गैरसमज असू शकतो. चांगल्या उपक्रमाचं कौतुक व्हायला पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा आणि म्हणून हे लिखाण!
तर आमच्या भागात एक पोस्टमन आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते नियमित आमच्या सोसायटीमध्ये येतात. आता इमेल, व्हॉट्सऍपवाल्या माझ्या पिढीला पोस्टमन या नावाशी फार ऋणानुबंध नसला तरीही माझ्याकडे आजही पत्रं, मासिकं येत असल्याने माझ्यादारी पोस्टमनचे पाय लागत असतात. तर आमचे पोस्टमन म्हणजे सय्यद भाई!
ते पत्रं द्यायला येतात तेव्हा नेहमी प्रसन्न चेहेऱ्याने. मी त्यांना पाण्याचं विचारते, पण पाणी ते घराच्या बाहेर उभं राहून पाणी पितात. त्यांना आत येऊन बसून पाणी प्या असं सांगितलं तरीही ते नको म्हणतात. तर लॉकडाऊन असतांना दारावर बेल वाजणं हा प्रकार साफ बंद झाला होता. जून महिन्यात बेल वाजली आणि कोण आलं? असा प्रश्न पडला. दार उघडून पाहिलं तर सय्यद भाई. चेहऱ्यावर मास्क, आणि हातात टपाल. मला जाम आश्चर्य वाटलं.
"तुम्हाला लॉकडाऊनमध्ये सुट्टी नाही?'
मी त्यांना विचारलं.. नाही मिळालं टपाल तर काय फरक पडणार एव्हढा, असा स्वार्थी आणि अट्टल मिडिऑकर प्रश्न माझ्या पांढरपेशा मनाला पडला होता. ते हसून म्हणाले,
" फक्त दोन तीन दिवस सुट्टी होती, बाकी काम चालू आहे."
खिशात सॅनिटायझरचा छोटा स्प्रे त्यांनी दाखवला.
"पाणी नको, मी बाहेर फिरतोय उगाच तुम्हाला त्रास नको"
असं म्हणून गेले ते.
त्यानंतर सय्यद भाई येत राहिले. चेहेऱ्यावर कायम समाधान, हसतमुख मुद्रा मास्कच्या मधून सुद्धा दिसत असायची. परवा असेच ते टपाल द्यायला आले असताना मी त्यांना आत या म्हणून विनंती केली. बाहेर फार ऊन होतं, म्हटलं आत येऊन बसा, पाणी घ्या. संक्रांत म्हणून वाटीत वड्या दिल्या आणि त्यांना कोरोना काळातल्या त्यांच्या अनुभवांबद्दल सहज विचारलं. पोस्टमन म्हणजे टपाल देणं इतकंच मला माहित होतं. कित्येक जेष्ठ नागरिक या पोस्टमन पायी तगून राहिले हे त्यांच्याशी बोलल्यावर मला समजलं.
AEPS सर्व्हिस मार्फत पैसे पोहोचवणे, लाईफ सर्टिफिकेट प्रोसेसमध्ये काम करणे. अशी कित्येक कामं हे लोक करतात. सय्यद भाई तर लॉकडाऊनच्या काळात अशा कित्येक वस्त्यांमध्ये कामासाठी गेले होते. जिथे ना मास्क चा पत्ता होता ना कोणत्याही सोशल हाईजीनचा. एटीममध्ये पैसे नव्हते, कित्येक अडचणींमुळे बाहेर पडता येत नव्हते. अशा खूप साऱ्या लोकांना त्यांनी मदत केली. अजून खूप काही केलं असेल त्यांनी पण स्वतःबद्दल बोलत नाही बसले. फक्त म्हणाले मला कोरोना योद्धा हा पुरस्कार दिला आहे. मी म्हटलं मला पाठवाल का फोटो आत्ता? आणि त्यांनी फोटो पाठवले. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलं आहे. मी म्हटलं त्यांना,
"तुमचं काम पोहोचायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यत. मी लिहीन तुमच्यावर."
त्यांच्या परवानगीने त्यांचा फोटो काढला. ( मास्क फक्त फोटोकरिता त्यांनी काढला आहे.)
मग ते घराबाहेर पडले. पण वळून पुन्हा आत आले. खिशातून सॅनिटायझर स्प्रेची बाटली काढली. ते ज्या सोफ्यावर बसले होते तिथे स्प्रे केला. मी बघत होते त्यांना. मी म्हटलं सुद्धा याची गरज नाहीये.. तर म्हणाले,
"मॅडम मी सतत बाहेर फिरत असतो. कामासाठी कुठे कुठे जात असतो. सगळे स्वच्छतेचे नियम पाळत राहिलो म्हणून ज्यांच्याकडे गेलो ते आणि मी सुद्धा आज धडधाकट आहे."
मला फार म्हणजे फार भावली त्यांची ही सजगता. माणसाला काही मोठं बनवत असेल तर ते तो कोणतं काम करतो हे नाही, तर तो किती प्रामाणिकपणे,संवेदनशीलतेने आणि माणुसकी जोपासून स्वतःचं काम करतो ते! आणि किती सोपं आहे? खरं तर, स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं.. इतके दिवस मी ज्या सोशल हायजीन बद्दल बोलत होते, लिहीत होते.. त्याचं सार सय्यद भाईंनी किती सोप्या शब्दात सांगितलं.
माणूस म्हणून असं काय वेगळं असतं आपल्यात? मला वाटतं... जाण आणि माणुसकी. अशफाक सय्यद भाईंसारखे कित्येक लोक आहेत. ज्यांनी आपलं काम केवळ काम न समजता त्याला जाणिवांची आणि माणुसकीची किनार लावून कौतुकाच्या कोणत्याही अपेक्षेशिवाय आपापली कर्तव्य पार पाडली आहेत. या निमित्ताने सर्व कोरोना योद्ध्यांचे माझ्यासारख्या सर्व सामान्य नागरिकांतर्फे मनापासून आभार मानते आहे. या सर्व लोकांच्या कामाची, निष्ठेची दखल सरकारने घेतल्याबद्दल सुद्धा धन्यवाद.
आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्यामध्ये आपल्याला जमेल ते, होईल तेवढं माणुसकीला धरून आपण वागलं पाहिजे, "मी" पणाचा परीघ जरा विस्तारत नेला पाहिजे. याची पुन्हा आज जाणीव झाली. कोणता किताब, पुरस्कार मिळो न मिळो, या काळात ज्यांनी ज्यांनी स्वतःतल्या माणसाला जिवंत ठेवून दुसऱ्यासाठी काही केलं, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद.. माणुसकी जिवंत ठेवल्याबद्दल!