#Post-truth आणि समर अभी शेष है : वैभव छाया...
``आपल्या मनाला आवडेल, आपला इगो सुखावेल अशा गोष्टींनाच सत्य मानलं जाईल अशी सुरूवात झाली आहे. दशकभरात हे इतकं शिखरावर जाईल की भारताचा हिटलरच्या काळातला जर्मनी झालेला असेल.हाच कालखंड पोस्ट ट्रूथ `PostTruth`चा असेल. त्या कालखंडात जगणं महाकठिण असं सांगताहेत अभ्यासक वैभव छाया...
``आपल्या मनाला आवडेल, आपला इगो सुखावेल अशा गोष्टींनाच सत्य मानलं जाईल अशी सुरूवात झाली आहे. दशकभरात हे इतकं शिखरावर जाईल की भारताचा हिटलरच्या काळातला जर्मनी झालेला असेल.हाच कालखंड पोस्ट ट्रूथ `PostTruth`चा असेल. त्या कालखंडात जगणं महाकठिण असं सांगताहेत अभ्यासक वैभव छाया...
समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध
जो तटस्थ हैं, समय लिखेगा उनके भी अपराध
एडवर्टायजिंगच्या मास्टर्सच्या वर्गात असताना या दोन ओळींवर सुरू झालेली चर्चा खुप खास होती. एक तर केसी कॉलेज. तिथं शिकणाऱ्या ९० टक्के मुलांना सायनच्या पुढे ग्रामीण भाग सुरू होतो हीच समज. वर्ष २०१० सालचं होतं. हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार विनोद कुमार यांनी लिहीलेल्या समर शेष है या कादंबरीवरून उठलेल्या वादाचं निमित्त होतं. सदर कादंबरी शिबू सोरेन यांच्या आयुष्यावर बेतलेली होती. त्यात रामधारी सिंह दिनकर यांची समर शेष है ही कविता पूर्ण छापलेली होती. पुस्तक बॅन केलं गेलं होतं. शिबू सोरेन यांची प्रतिमा आधी खूनी बाहुबली नंतर आदिवासी, नक्षली, छुपा माओवादी बनवली जाण्याचा काळ होता. जाहीरातीतून अजेंडा सेटिंग कसा होतो यावर लेक्चर सुरू होतं. शिकवणारा प्राध्यापक तरूण होता. जाहीरातींचं तंत्र आणि क्राफ्ट शिकवता शिकवता त्याचे सामाजिक परिणाम कसे होतात यावरही त्याचे सखोल विवेचन होते. सध्या तो तरूण इंग्लंड मध्ये स्थायिक आहे. तिथे जाहीराती बनवतोय. तर त्यानं अतिउच्चभ्रू वर्गातील विद्यार्थ्यांसमोर वर लिहीलेल्या दोन ओळी लिहील्या होत्या. त्यावर ज्या उलट सुलट प्रतिक्रिया आल्या त्या कमालीच्या आश्चर्यजनक होत्या.
त्यांच्या मते शिबू हा कुणीतरी राक्षस आहे. आदिवासी असतातच सैतान राक्षसासारखे. ते कॅनीबल्स असतात. ते जीवंत माणसे खातात. गिरीडोह येथील कोळसा खाणीत जे मजूर मेले ते कदाचित याच लोकांनी खाल्ले असावेत. नक्षलवादी हे आदीवासी लोक म्हणजे चीन ने पाठवलेले लोक आहेत. त्यांना भारताची प्रगती नको आहे. वगैरे वगैरे...
आम्ही काही विद्यार्थी गप्प होतो. बोलायचं होतं. पण सर्वात पहिला प्रॉब्लेम होता तो भाषेचा. तेव्हा इंग्रजी बोलणं यथातथाच होतं. त नंतर सुधारलं. पण अजूनही म्हणावं तितकं चांगलं नाहीच. प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बोलावं तर कसं हा मुद्दा होताच. चर्चा संपली त्यानंतर सरांनी सांगितलं. ज्यांना माहीत होतं की ते मुद्दे खोडू शकत होते. पण त्यांनी मुद्दे खोडले नाहीत. ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून गप्प राहीले. ते लोक सुद्धा खोटा प्रचार खरा मानून चालणाऱ्यांइतकेच अपराधी आहेत. गुन्हेगार आहेत.
शिबू सोरेनची प्रतिमा, त्यायोगे तमाम आदिवासींची प्रतिमा, त्यांचं चारित्र्यहनन, त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या आणि संघर्षाच्या हक्काला, लढ्याला असं बदनाम होताना पाहणं तुम्हाला सुसह्य होतं. पण त्यावर अवाक्षर काढण्याची हिम्मत नव्हती. हे चूप राहणं, खोट्या प्रचारापेक्षा जास्त धोकादायक आहे.
आज ही वृत्ती वाढत आहे. आयपीएल गेट प्रकरण तेव्हा ताजं होतं. अशी भ्रष्टाचाराची अनेक खोटी प्रकरण आता वाढीस लागतील. त्याचा प्रचार होईल. तोच प्रचार खरा समजून सगळे जगू लागतील. त्याविरोधात बोलणाऱ्यास बहिष्कृत केले जाईल. सत्य गोष्टींपेक्षा आपल्या मनाला आवडेल, आपला इगो सुखावेल अशा गोष्टींनाच सत्य मानलं जाईल. ही ती सुरूवात आहे. पुढच्या दशकभरात हे इतकं शिखरावर जाईल की भारताचा हिटलरच्या काळातला जर्मनी झालेला असेल.
हाच कालखंड पोस्ट ट्रूथचा कालखंड असेल. त्या कालखंडात जगणं महाकठिण काम असेल. वेळीच पावलं ओळखा.
ही गोष्ट आजपासून १२ वर्षांपूर्वीची. तेव्हा समज फारशी प्रगल्भ नव्हती. ती हळूहळू वाढत गेली. तेव्हा पोस्ट ट्रूथ ही संकल्पना फेक वाटायची. पोस्ट मॉडर्निझमचीच अनाठायी भीती वाटायची. तेव्हा पोस्ट ट्रूथ खुप लांब वाटायचं. पण ते आलं. भाजप-संघाने आणलं म्हणण्यापेक्षा ...
सिक्रेट सोसायटीसारखं काम करणाऱ्या संघाने ते आणलं आहे.
संघासारख्या संघटना प्रत्येक देशात कमी अधिक प्रमाणात कार्यरत आहेतच. पण भारतात त्यांना अधिकचं यश मिळालं आहे. आज जो जो संघाला सरेंडर होईल तोच यशस्वी होईल. तो किंवा ती कितीही सुमार असला तरी संघाच्या एकुण मेकॅनिझमला हातभार लावणाऱ्या यंत्रणेला जो जो सपोर्ट करील त्याला इथला मिडीया, इथली प्रशासकीय व्यवस्था, इथली औद्योगिक व्यवस्था, इथली भांडवल पुरवणारी व्यवस्था आपलेसे करील. लाड करील. तुम्हाला हवे नको ते सर्व रिसोर्सेस पुरवील. विश्वास नसेल तर अगदी आपल्या आजूबाजूला चेक करून पहा.
सुमारांची सद्दी शिखरावर असण्याचा काळ आहे. हाफकिन च्या किस्स्यासारखा.
हे पोस्ट ट्रूथ प्रचंड भयंकर प्रकरण आहे. वेळीच लक्षात घेतलं तर अनेक गोष्टी पुन्हा स्थिर करता येतील. पोस्ट ट्रूथ नेमकं काय आहे, कसं असतं... यावर नंतर कधीतरी सविस्तर लिहीनच.
तूर्तास इतकेच...
वेळ आपलेही अपराध लिहीतोच आहे... आपण गप्प जे बसलेलो आहोत.
फार ग्रेट, महान तत्वचिंतक कवी माणूस होता... रामधारी सिंह दिनकर..
समर अभी शेष है
- वैभव छाया..