मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा...

Update: 2019-09-09 15:39 GMT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या नावाखाली पोलीसांनी सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना कशाप्रकारे त्रास दिला याच्या बातम्या आम्ही वारंवार मॅक्समहाराष्ट्र वर प्रसारित केल्या आहेत. मात्र, या यात्रेचा फटका सामान्य माणसांनाही बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूकीचे नियम मोडल्याच्या बातम्या ही आल्या आहेत. या ही पेक्षा गंभीर गुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या जुलमी पोलीसांनी केला आहे. पोलीसांच्या या जुलुमांसाठी गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण त्यांच्या आदेशाशिवाय असा जुलुम होणं शक्य नाही. राज्याच्या मानवाधिकार आयोगाने पण या जुलुमांची स्वतःहून दखल घेऊन कारवाई करायला हवी.

देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेच्या सर्व व्हिडीयो फुटेजचं बारिक आकलन मॅक्समहाराष्ट्रच्या टीम ने केलं आहे. एकेक फ्रेम तपासल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी सामान्य माणसांवर केलेल्या अत्याचाराची मालिकाच समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना सदैव पोलिसांच्या गराड्यात वावरावं लागतं. मात्र, सामान्य माणसांना या पोलिसांपासूनच धोका निर्माण झाला आहे. महाजनादेश यात्रेच्या सुरक्षेसाठी असलेला ताफा रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांना अक्षरशः छेडण्याचं काम करत असताना अनेक फुटेज मध्ये पाहायला मिळतंय.

रस्त्याने चालणाऱ्या बायकांना अक्षरशः पोलिसांची गाडी रस्त्यावरून खाली उतरवायला भाग पाडताना मुख्यमंत्रांच्या क्रू ने शूट केलेल्या व्हिडीयो मध्ये स्पष्टपणे दिसून येतंय. रस्त्याच्या कडेला यात्रा बघायला उभे असणाऱ्यांना गाडीत बसलेले पोलीस चालू गाडीतून अक्षरशः फायबर च्या काठीने मारताना दिसतायत. हा कसला जुलूम आहे. हे पोलीस आहेत की गुंड.. चालू गाडीतून लोकांना काठीने मारणारे, चालणाऱ्या लोकांना रस्त्याच्या खाली उतरवायला लावणारे, लोकांच्या अंगावर गाडी घालणारे पोलीस कोणाच्या आदेशाने हे सगळं करत आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे.

हे काय सुरू आहे, असा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे. तुमची यात्रा पक्षाच्या प्रचारासाठी आहे, त्यासाठी पोलीसांना अशा पद्धतीने गुंडगिरी करण्याची सूट देणं निषेघार्ह आहे. या गुन्ह्यासाठी पोलिसांच्या टोळीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मानवाधिकार आयोगाला जर यात मानवाधिकारांचं उल्लंघन दिसत असेल तर त्यांनी ही आपला कणा शाबूत ठेऊन याची दखल घेतली पाहिजे. सत्ता कितीही मोठी असू दे, रस्त्यावर चालणारे लोक हे लोकशाहीचा पाया आहेत, हे विसरू नका.

Similar News