लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर करून टिळक पुरस्कार समितीने देशाचा , राज्याचा आणि खास करून पुण्याचा अपमान केला आहे असे वाटते का ?
ज्या लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्कं आहे” हे ब्रिटिश साम्राजाला ठणकावून सांगितलं, तुरुंगात जाणे पसंत केलं पण माफी नाही मागितली, आपल्या केसरी या वृत्तपत्रातून सरकारला जेरीस आणले त्या टिळकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार नरेंद्र मोदींना...? हे तेच मोदी की ज्यांच्या मातृ संघटनेचा स्वातंत्र्य लढ्यात शून्यू सहभाग. उलट मातृ संघटनेतील काहींनी ब्रिटीशांना मदत केली असा आरोप.
हा पुरस्कार देशासाठी अतुल्य कामगिरी करणार्या व्यक्तिला देण्यात येतो. गेली 23 वर्षे मोदींची कामगिरी बघता नागरिकांच्या हितापेक्षा नागरिकांना अडचणीत आणणारी धोरणे मोदींनी राबवलीत.
काहीवेळा असं वाटतं की ही कॉंग्रेसची खेळी आहे. मोदींना पुरस्कार जाहीर झाला की लगेच विरोधक आणि सामाजिक संस्था मोदींच्या अपयशाची उजळणी करतील. त्यावर आंदोलने होतील. मोदी आणि भाजपचा सर्वत्र निषेध होईल. आज तसेच घडते आहे. अनेक सामाजिक संस्था याला विरोध करतात. विरोधी पक्ष सुद्धा रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवितात.
प्रश्न असा पडतो की मोदींना त्यांचे नक्की कोणते अपयश बघून हा पुरस्कार दिला गेला ?
की सर्वच बघून ?
1. मानवाला काळिमा फासणारी घटना मणीपुर दंगलीत घडलीय. जगात आपल्या देशाची नाचक्की झालीय. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. अनेकांची घरे जाळली. महिलांवर बलात्कार केले. मग मणीपुर दंगल आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले म्हणून हा पुरस्कार..?
2. गॅस सिलेंडर 450 रुपयांवरून 1150 रुपयांवर आणला. मग या मुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
3. पेट्रोल डिझेलचे भाव 70 रुपयांवरून 110 पर्यन्त वाढवले. मग या मुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
4. नफ्यात चाललेल्या सरकारी कंपन्या / शासकीय संस्था आपल्या मित्राला विकल्या. मग या मुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
5. गुजरात दंगल रोखण्यात अपयशी ठरले. हजारो लोकांना मारले, कित्येक महिलांवर बलात्कार केले गेले, गरोदर महिलांवर सुद्धा अत्याचार केले गेले, घरदार जाळले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार...?
6. गुजरात दंगलींनंतर मोदींना अमेरिकेत येण्यास बंदी घातली. अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार...?
7. परदेशात जाऊन एनआरआय समोर “भारतात 2014 पूर्वी राहण्यास लाज वाटतं होती” असा जाहीर प्रश्न करून देशाचा घोर अपमान केला. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
8. पूलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले 40 जवान मारले गेले. त्याच वेळी मोदी तिकडे शूटिंग करण्यात व्यस्त होते. आजही त्या स्फोटात वापरलेले आर.डी.एक्स. कुठून आणले हे समजलेले नाही. मग या अपयशामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
9. 2016 साली नोट बंदी केली. दोन महिन्यात जवळपास 60 च्या वर वेगवेगळे आदेश काढून लोकांना त्रास दिला. 150 च्या वर नागरिक मृत्युमुखी पडले. नोटबंदीत सांगितले की, दहशतवादी हल्ले थांबतील, खोट्या नोटा चलनातून बाहेर पडतील, भ्रष्टाचार संपेल. परंतु यातले काहीही झाले नाही. असंघटित वर्गातील कामगार, कंत्राटी कामगार, बांधकाम मजूर, भूमिहीन शेतमजुर आणि कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
10. कोरोनाच्या जागतिक महामारीत पी.एम. केयर्स मध्ये लोकांकडून अब्जावधी रुपये जमा केले. लोकांनी हिशोब मागितला तर हात वर केले. मग या मुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
11. राफेल घोटाला करून त्याच्या फाइल गायब केल्या. विदेशातील पत्रकारांनी घोटाळा झाल्याचे उघड केले. शासकीय अनुभवी कंपनीला काम न देता आपल्या मित्राला कोणताही अनुभव नसलेल्या व नुकतीच स्थापन केलेल्या कंपनीला काम दिले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार...?
12. शेतकरी विरोधी कायदे आणले गेले. 7 महीने हजारो शेतकर्यांनी आंदोलन केले. शेकडो शेतकरी मेले. यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
13. वर्षाला दोन कोटी नोकर्या देतो अशी लोणकढी थाप बेरोजगारांना मारून त्यांची चेष्टा केली. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
14. विदेशी बँकेतील काळा पैसा भारतात आणून देशातील सर्वांच्या खात्यात 15 लाख जमा होतील असा “जुमला” जाहीर सभेत सांगितला. लोकांच्या हातात कवडी सुद्धा पडली नाही. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
15. खरं तर कोणत्याही देशाचा पंतप्रधान / राष्ट्रप्रमुख इतर देशाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेत नाही. त्या देशातील निवडणुकीत एका उमेदवाराचा प्रचार करीत नाही. मोदींनी अमेरिकेच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला आणि ट्रम्प यांचा पराभव झाला. विरोधी उमेदवार जो बायडन निवडून आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
16. गेल्या नऊ वर्षात मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. ( हा आता त्यांच्या आवडत्या नटाला आंबा चोखून खातात की कापून हे मुलाखत देऊन सांगितले. भक्तांसाठी टिळकांच्या गीता रहस्यांपेक्षा मोठं रहस्य होते ते. ) मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
17. नुकताच त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. तिथे काही पत्रकारांना टेलिप्रॉम्पटरच्या सहाय्याने इंग्रजीत संबोधताना अडखळले. शब्दांची आणि वाक्यांची फेररचना केल्याने अर्थ बदलले आणि जगात हसं झाले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
18. नोट छपाई कारखान्यातून 88 हजार कोटींपेक्षा जास्त नोटा गायब झाल्यात. त्यावर मोदी मूग गिळून आहेत. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
19. देशातील मीडिया पुर्णपणे स्वत:च्या ताब्यात घेतला. विरोधकांना अडचणीत आणणार्या बातम्या सतत दाखवण्याचा खटाटोप सुरू केला. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य संपवले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
20. गेल्या नऊ वर्षात मोदींनी अनेक चुकीची धोरणे राबवली. काही क्षेत्रात तर काहीही केले नसताना डॉ. मनमोहन सिंग सरकारने केलेल्या कामाचे श्रेय घेतले. 140 कोटी जनतेच्या पैशातून हजारो कोटी खर्च करून स्वत:च्या खोट्या जाहिराती केल्या गेल्या. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
21. शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला दीड पट उत्पन्न करून देतो सांगून फसवलं. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
22. 5 वर्षात देशात 100 स्मार्ट सिटी तयार करतो असे शहरवासियांना आश्वासन दिले. प्रत्यक्षात एकाही सिटीचा थोडासा भाग ही स्मार्ट झाला नाही. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
23. काही वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मोठा समारंभ व गाजावाजा करून पायाभरणी केली. प्रत्यक्षात काहीही काम केले नाही. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
24. कोरोना संकटाच्या काळात देशातील नागरिकांना व्हेंटिलेटरची खूप मोठ्या प्रमाणात गरज होती. पी.एम. केयर्समध्ये जमा केलेल्या पैशातून देशात काही ठिकाणी व्हेंटिलेटर दिली. कशी तर नादुरूस्त, उपयोगात येऊ न शकणारी. आता सुद्धा वंदे मातरम् ट्रेन सुरू केली. त्याच्या छतातून पाणी गळतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. अशी सदोष यंत्र सामुग्री जनतेच्या पैशातून जनतेच्या माथ्यावर. मोदींच्या गुजरात सरकारने त्यांच्या आशीर्वादाने झुलत्या पूलाची डागडुजी केली. निकृष्ट दर्जाच्या कंपनीला काम दिले आणि पूल तुटला. शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले. मोदींनी काहीही कारवाई केली नाही. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
25. आपल्या चेल्या चपाट्यांकरवी एका विशिष्ट समाजावर दहशत माजवण्याचे मोदींनी तंत्र अवलंबिले. त्यासाठी त्या समाजावर टीका केली, त्यांच्यातील निरपराध लोकांना मारले, दंगली घडवल्या. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
26. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागामार्फत धाडी टाकल्या. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून जेलवारी घडवली. जे नेते या गोष्टीला घाबरून भाजपाच्या बाजूला आले त्यांच्यावरील गुन्हे काढले, त्यांना निर्दोष सोडले. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
27. कच्च्या मालाचा आणि पक्क्या मालाचा वेगवेगळा जीएसटी, धडपणे न चालणारा ऑनलाइन पोर्टल, ऑनलाइन रिटर्न दाखल करण्याची सक्ती या जाचक तरतुदी विरोधात देशभरातील व्यापारी संघटनांनी बंद पाळून विरोध दर्शवला. मोदींना जीएसटी लागू करण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अपयश आलं. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
28. मोदींचे भक्त सतत नेहरू - गांधी घराण्यावर घाणेरडे आरोप करतात. आता तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब या महामानवांवर सुद्धा घाणेरडे वक्तव्य करू लागलेत. नुकतेच महात्मा गांधी त्यांच्या तावडीत सापडलेत. तरीही मोदी तोंडातून ब्र सुद्धा काढत नाहीत. मग यामुळे तर नाही ना हा पुरस्कार...?
29. आकाशात ढग असल्यास रडारला विमान कळत नाही किंवा गटारातून गॅस तयार करून त्यावर चहा बनवता येतो असे महान शोध लावून सर्वांना मोदींनी सांगितले. मग या मुळे तर नाही ना हा पुरस्कार..?
असो.
यादी सांगायची तर एक मोठा ग्रंथ तयार होईल.
मोदींनी आणि त्यांच्या भक्तांनी देशात सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ बदलण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी खोटे पुरावे लोकांसमोर मांडले. लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मोदी काहीही म्हणत असले तरी “प्रथम मी, मग पक्ष आणि नंतर देश” हेच धोरण त्यांनी राबविले.
देशातील जनतेला “मन की बात” ऐकवली.
पण जनतेची “मन की बात” काही ऐकली नाही.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग म्हणाले होते की “इतिहास माझी नोंद घेईल”.
आता मोदींबाबतीत सुद्धा हेच म्हणावे लागेल. “इतिहास यांची नोंद घेईल.”
इतिहास कोणाला कोणत्या अर्थाने नोंद घेईल हे ज्याने त्याने ठरवायचे..!
धन्यवाद ..!
हेमंत पाटील
निवडणूक सल्लागार व रणनीतीकार.
कृष्णा कन्सल्टन्सी, पुणे.
मो. 8788114603
टीप - या लेखातील मतांशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.