पवारांचं बंड आणि पुलोदचा प्रयोग

शरद पवार यांनी बंड केले ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी जी केलं ती गद्दारी? असं कसं चालेल, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्याला पवारांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र, पवारांचं ते बंड तेव्हा देशाच्या राजकारणात प्रचंड गाजलं होतं. कारण तेव्हा देशभरात काँग्रेसची एकहाती सत्ता होती आणि त्या सत्तेविरोधात पवारांचं बंड होतं. याशिवाय पवारांचं वयही तेव्हा अवघं ३८ वर्षांचं होतं. त्यामुळं ते बंड आजही राजकीय वर्तुळात संदर्भासाठी वापरले जाते. त्या बंडाला पुलोद चा प्रयोगही म्हटलं जातं. पण नेमका काय होता पुलोदचा प्रयोग? जाणून घेण्यासाठी वाचा....;

Update: 2023-07-01 07:40 GMT

१९७८ च्या पुलोद सरकारचा संदर्भ देत पवारांनी त्यावेळी केली ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केलं ते बंड असं कसं चालेल, म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या बंडाचं समर्थन केलं होतं. त्यावर पवारांनीही प्रत्युत्तर दिले. पवार म्हणाले, फडणवीस त्यावेळी लहान होते. त्यांना कळलं नसेल, त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल, असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं. मात्र, पवारांचं हे बंड नेमकं कशासाठी होतं, पुलोद च्या सरकारमध्ये कुठले मित्रपक्ष होते, ते सरकार किती वर्ष चाललं, याचे संदर्भ आजही राजकारणात दिले जातात.

देशात आणीबाणी लागल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. ही आणीबाणी उठविल्यानंतर इंदिरा गांधींचं नेतृत्व स्विकारण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, १८ डिसेंबर १९७७ रोजी इंदिरा गांधींनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाच राजीनामा दिला होता. पुढे ३ जानेवारी १९७८ रोजी इंदिरा काँग्रेसची स्थापना करण्यात आली. त्यामुळं ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्व असलेल्या काँग्रेसचा गट हा रेड्डी काँग्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. यशवंतराव यांचे समर्थक असल्यानं शरद पवार, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक हे रेड्डी काँग्रेस गटातच राहिले. तर नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक हे मात्र इंदिरा काँग्रेस सोबतच राहिले.

आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा केंद्रात पराभव होऊन मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. त्यानंतर १९७८ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे ९९, इंदिरा काँग्रेसचे ६२ आणि रेड्डी काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यामुळं जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. त्यामुळं वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पहिल्यांदाच आघाडीचं सरकार स्थापन केलं. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले.

वसंतदादा पाटील आणि तिरपुडे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच दोन्ही गटांमध्ये विविध कारणांमुळं वाद होऊ लागले. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी नासिकराव तिरपुडे यांच्या मनात द्वेष होता. सरकारमध्ये इंदिरा काँग्रेस व्यतिरिक्त इतर कुणाचंही वर्चस्व असू नये, अशी भूमिका तिरपुडेंची होती, असा उल्लेख शरद पवारा यांनी त्यांच्या राजकीय आत्मकथा असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात केलाय.

वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे जाणारी प्रत्येक फाईल आपल्याकडे आलीच पाहिजे, अशी भूमिका तिरपुडेंनी घेत. त्यामुळे सरकारमध्ये कलहाचं पसरायला सुरूवात केली होती. तिरपुडेंच्या या भुमिकेमुळं वसंतदादा वैतागले होते. शिवाय यशवंतराव चव्हाण साहेबही निराश झाले होते, असा उल्लेखच शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे. दोन पक्षांना, त्यातील आमदार, मंत्री आणि नेत्यांना सांभाळून घेत वसंतदादा सरकार चालवत होते. तर दुसऱ्या बाजूला नासिकराव तिरपुडे यांच्या भूमिकेमुळे शरद पवार आणि रेड्डी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये नाराजी वाढत चालली होती. या नाराजीतूनच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला.

सरकारमधून बाहेर पडल्यानंतर कोणासोबत सरकार स्थापन करायचा याची चाचपणी पवारांनी सुरू केली. जनता पक्षाचे चंद्रशेखऱ यांनी पवारांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दर्शविला. त्यावेळी शरद पवार हे रामटेक या शासकीय निवासात राहायचे. जनता पक्षानं अधिकृत पाठिंबा दिल्यानंतर पवारांसोबत सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे, सुंदरराव सोळंके यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले. राजीनाम्यानंतर पवारांनी ३८ आमदारांना एकत्र करून बंड केलं. त्यामुळं वसंतदादांचं सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं पर्यायी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला.

आपल्यासोबतच्या ३८ आमदारांना घेऊन पवार हे विधिमंडळात जनता पक्षासोबतच्या संयुक्त बैठकीत सहभागी झाले. त्यावेळी जनता पक्षाचे चंद्रशेखर, एस.एम.जोशी यांनी शरद पवारांकडे सरकारचं नेतृत्व सोपवल्यानं विधिमंडळ नेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सरकारची स्थापना झाली. पुलोद सरकारचं वैशिष्ट्य म्हणजे यात काँग्रेस, जनता पक्ष, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विविध विचाराधारांचे पक्ष सरकारमध्ये होते. पुढे केंद्रात सत्तेचं वारं बदललं आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं काँग्रेसची सत्ता आली. त्यामुळं इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून पुलोदचं सरकार बरखास्त केलं. १९८० मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि त्यात इंदिरा काँग्रेसचे बॅरिस्टर ए.आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पवारांच्या या बंडासंदर्भात अजूनही काही प्रश्न उपस्थित केले जातात. ते म्हणजे शरद पवारांच्या त्या बंडाला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का? कारण पवार हे यशवंतरांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं संयुक्त सरकार पडावं ही यशवंतराव यांची सुप्त इच्छा होती. याचे संकेत आम्हाला मिळाले होते. त्यांनी कधी सरकार पाडण्याविषयी थेट कधी सांगितलं नाही. मात्र, सरकारबरोबर फरफट कऱण्याची गरज नसल्याचं त्यांनी सूचित केलं होतं. यशवंतराव चव्हाण यांची स्पष्ट भूमिका कळाल्यावर सरकार स्थापनेच्या तयारीला लागलो. सुरूवातीच्या घडामोडींमध्ये वसंतदादाही पवारांसोबत होते. मात्र, नंतर त्यांनी अंतर राखल्याचा उल्लेख पवारांनी या राजकीय आत्मचरित्रात केलाय.

Full View


हे हि पहा...

Full View

Tags:    

Similar News