अन्यथा काँग्रेसचे थडगे पाहावे लागेल!

Update: 2017-03-13 06:45 GMT

बारा मार्च 1993 रोजी मुंबईत बाँबस्फोट झाले होते. पण, 2017 मध्ये अकरा मार्चलाच उत्तराखंड व विशेषतः उत्तर प्रदेशात जो राजकीय बाँबस्फोट झाला, त्यामुळे काँग्रेस, आप आणि अन्य विरोधी पक्ष अक्षरशः सुन्न झालेत. त्यांना काय बोलावे, काय करावे, तेच सुधरेना. ‘सत्यकथा’च्या राम पटवर्धनांनी ‘कानठळ्या बसवणारी शांतता’ असा शब्दप्रयोग केला होता. काहीसे तसेच झाले. जेएनयू, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी असे विषय हाती घेऊन झाले. पण कशाचा काहीच उपयोग होत नाही, म्हटल्यावर आता संन्यास घेऊन हिमालयात जावे का? असा विचार काही राजकारण्यांच्या मनात आला असणार. पक्षाचा विजय झाल्यावर राजीव प्रताप रूडींसारखे मूलतः रूड असलेले भाजपचे नेते व मंत्रीही संयतपणे बोलत होते. वरून सक्त सूचना दिल्याप्रमाणे विनम्रतेची शाल त्यांनी पांघरली होती.

नवी दिल्लीच्या मुख्यालयात पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला, तेव्हा ते म्हणाले की, गोरगरिबांसाठी संधी मिळवून देणारा नवा भारत मला घडवायचा आहे. मी फक्त निवडणुकांचा विचार करत नाही. सत्ता ही पदासाठी नसते, ती गरिबांच्या आशाअपेक्षा पूर्ण करण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी असते. सव्वासौ करोड लोकांची स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत. तरुणांच्या व महिलांच्या आकांक्षांची पूर्ती करायची आहे. बंधुभगिनींनो, (मित्रों, हे संबोधन वापरण्याचे ते अलीकडे टाळत आहेत) आपण नवा भारत घडवूया. हा भाजपच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे, वगैरे... 2014 पेक्षा हा विजय मोठा आहे, असे अमित शाह सांगतात.

मोदी-शाह यांच्या भाषणात कुठेही राम मंदिर, समान नागरी कायदा, 370वे कलम हे उल्लेख नव्हते. स्वातंत्र्योत्तर काळातील मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे शाह यांनी सांगून टाकले आहे. पं. नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी यांची लोकप्रियता शाह यांना आठवली नाही, महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गर्व वाटेल असा भारत घडवायला हवा, असे आवाहन करताना मोदींनी पं. नेहरूंचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. आम्ही चुका करतो, पण आमचा उद्देश कधीही वाईट नसतो, असे मोदी म्हणाले. त्याच दिवशी त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजप नेते दयाशंकर सिंग यांची दया येऊन, पक्षाने त्यांच्यावरचे निलंबन उठवले. बसप नेत्या मायावतींबद्दल दयाशंकर सिंग यांनी अभद्र वक्तव्य केले होते.

भाजपने उत्तर प्रदेशात एकाही मुसलमानास तिकीट दिले नव्हते. परंतु अल्पसंख्य म्हणजे मुस्लिमांची संख्या 33 टक्के आहे, अशा 42 मतदारसंघांपैकी 39 ठिकाणी भाजपला विजय मिळाला. 2012 साली भाजपला फक्त पाच ठिकाणी विजय मिळाला होता. समाजवादी पक्षाला फक्त 10 व बसपला (ज्याने 100 मुस्लिम उमेदवार उभे केले होते) अशा जागांवर फक्त एका ठिकाणी विजय मिळाला. दार-उल-उलूम या इस्लामी धर्मशिक्षण देणाऱ्या संस्थेचे जागतील सर्वात मोठे केंद्र ज्या देवबंद येथे आहे, तेथेच भाजपचा उमेदवार जिंकला. संपूर्ण राज्यात 2012 मध्ये 67 मुस्लिम निवडून आले होते. 42 मुस्लिमकेंद्रित मतदारसंघांत सपा-काँग्रेस व बसपपेक्षा भाजपला मिळालेल्या मतांचा टक्का जास्त आहे. म्हणजे एकीकडे मुस्लिम उमेदवार न देऊन हिंदू मतांचे ध्रुवीकरण करणे व त्याचवेळी तिहेरी तलाक प्रथेला विरोध करून व अन्य उपायांद्वारे मुस्लिमांच्या पट्ट्यात शिरायचे, ही भाजपची खेळी यशस्वी ठरली. मुस्लिमबहुल भागांत सोशल इंजिनियरिंग आणि ध्रुवीकऱणाचे तंत्र वापरण्यात आले.

समाजवादी पार्टी जेव्हा झगडा पार्टी बनली, तेव्हा, म्हणजे गेल्या ऑगस्टपासूनच बसपने आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. गुजरात व उत्तर प्रदेशातील दलित अत्याचारांविरुद्ध मायावतींनी रणशिंग फुंकले. गोरक्षा व लव्ह जिहाद ब्रिगेडविरुद्ध आवाज उठवला. मुस्लिमांनी आपली मते सपाला देऊन ती वाया गालवू नये, असे आवाहन केले. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. बसपचे विधिमंडळातील विरोधी पक्षनेते स्वामी प्रसाद मौर्य हे लोकप्रिय मागास समाजातील नेते आणि माजी खासदार व पक्षाचा ब्राह्मण चेहरा व्रजेश पाठक यांनी भाजपप्रवेश करून बसपला खिंडारच पाडले. 2014 पासूनच बसपची बिगर यादव दलित मते व बिगर यादव ओबीसी मते पक्षाजवळ रहिली नाहीत.

उत्तर प्रदेशातील 140 विधानसभा मतदारसंघांत दलितांची लोकसंख्या 23 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 2012 साली दलितांनी सपा-बसप व काही प्रमाणात काँग्रेसला मते दिली. परंतु यावेळी दलितांनी भाजपला भरभरून मते दिली. याचा अर्थ त्यांची सामाजिक ओळख पुसून, त्यांना केवळ आर्थिक विकासाचा भूलभुलैया दाखवून आकर्षित करून घेण्यात भाजपला यश मिळाले.

काँग्रेसचा भर कल्याणकारी धोरणांवर राहिला. त्यामुळे करोडोंना लाभ मिळाला असला, तरी योजनांमध्ये तुफान भ्रष्टाचारही झाला. भाजपच्या मदतीला तंत्रज्ञान धावून आले. तसेच लोकांना उपकृत करण्याऐवजी आम्ही त्यांना सक्षम करू, हा भाजपचा निर्धार आहे. म्हणजे काँग्रेसला लोकांना लुळेपांगळेच ठेवायचे आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा मेसेज खालपर्यंत पोहोचवण्यास भाजपला यश मिळाले आहे. जनधन योजना, सर्वांना वीज, मुद्रा बँकेतर्फे लघुउद्योजकांना कर्जे, करोडो लोकांना अनुदानित गॅस, स्त्रियांच्या नावावर गॅस कनेक्शन्स देणे, पीक विमा योजना या गोष्टी राबवण्यात व त्यांचा पद्धतशीर प्रचार करण्यात भाजपला यश मिळाले आहे. आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाचा प्रचार केला. पण नंतर तो त्यांच्यावर बूमरँग झाला होता.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशात भाजपने घोटाळे केल आहेत. परंतु त्याचे पद्धतशीर पुरावे गोळा करून प्रकरणे तडीस नेण्यात विरोधी पक्षांना यश मिळालेले नाही. काँग्रेसने, खास करून चिदंबरम यांनी करांची मूलगामी पुनर्रचना, प्राप्तिकर खात्याचे संगणकीकरण, अॅक्सिलरेटेड जलसिंचन योजना, नेहरू शहर पुनरुत्थान योजना अशी कैक उत्तम कामे केली. पण त्याचे मार्केटिंग ना यूपीए सरकारने केले ना काँग्रेसने. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना इतके बदनाम करायचे, की त्यांची चांगली कामेही विसरली जावीत, या तंत्रावर भाजपची हुकूमत आहे. हे तंत्र काँग्रेसला माहीतच नाही.

इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाव’, तर राजीव गांधींनी ‘एकविसाव्या शतकाचे’ स्वप्न दिले. सोनिया गांधी-राहुल गांधींकडे, नेतृत्वाकडे जी कल्पकता लागते, तिचाच अभाव आहे. निम्म्याहून अधिक भारत पस्तिशीच्या आतला आहे. राहुल गांधी वयाने तरुण असले, तरी ते लायसन्स परमिट राजच्या वेळची घिसीपिटी भाषा करतात. उलट मोदी 67 वर्षांचे असले, तरी तरुणांना अपिलिंग वाटतात. शिवाय प्रचंड संख्येतील तरुणांना व्यक्तिगत आर्थिक विकासाची ओढ आहे. शहरीकरण विस्तारत असून, गावांमध्ये शहरांच्या हाका ऐकू येत आहेत. खेडी बदलत आहेत, साक्षरता वाढत आहे. खाप पंचायत, उच्च-नीच भेद हे अजूनही असले, तरी विकासाच्या प्रक्रियेत पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात दलितांना सामावून घेतले जात आहे. तेव्हा ‘दलित’ हा शब्द उच्चारला की फक्त अन्याय-अत्याचारच नजरेसमोर ठेवून राजकारण न करता, त्याच्या शिष्यवृत्त्या, यूपीएससी-एमपीएससीसाठी त्यांना तयार करणे, त्यांच्या नोकऱ्या, त्यांना उद्योग उभारण्यास मदत हा सुद्धा अॅप्रोच ठेवावा लागेल.

उ. प्रदेशातील काँग्रेसविरोधी व भाजपविरोधी राजकारण जाटव, यादव व मुस्लिमांच्या मतपेढ्यांवर आधारलेले आहे. भाजपचे उ. प्रदेशचे सरचिटणीस सुनील बन्सल यांनी सांगितले की, आज 83 टक्के उच्च जाती, 17 टक्के यादव, 73 टक्के बिगर यादव ओबीसी, 25 टक्के जाटव व 50 टक्के बिगर-जाटव आम्हाला मते देत आहेत. म्हणजे सप-बसपने जातींचे ध्रुवीकरण केले, त्यामुळे बाकी जाती-घटक भाजपकडे वळाले. ती संख्या जास्त होऊन भाजपला विजय मिळाला. भाजपने जातीपातीचा विचारच केला नाही, असे म्हणणे हा खुळचटपणा आहे.

भाजपने स्वतःचे असे सामाजिक आधार शोधले आहेत. अडवाणींच्या रथयात्रेनंतर व्ही. पी. सिंग यांनी मंडलवाद रुजवला. त्यातून मुलायमसिंग यादव व लालू प्रसाद यादव या शक्ती म्हणून उदयास आल्या. आज भाजपने अपना दल व सुहेल देव भारतीय समाज पार्टीशी सूत जमवून, ओबीसी व्होट बँक भक्कम केली. कारण सध्या त्यांच्याकडे कल्याणसिंगांसारखा तगडा नेता नाही. या सर्व सामाजिक समूहांचे हिंदुत्वकरण करण्यासाठी साक्षीमहाराज, आदित्यनाथ, उमा भारती आहेतच. मात्र हिंदुत्व आणि सोशल इंजिनियरिंगवरचे आइसिंग आहे ते विकासाचे.

इंदिराजींनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. तेव्हा गोरगरिबांना ही बाई आपली वाटली. राजीव गांधी तरुण व महिला वर्गाच्या गळ्यातले ताईत बनले. इंदिरा गांधींना मोठे करण्यास त्यांच्या विरुद्धचे सिंडिकेट/इबडी आघाडी, समाजवादी, जनसंघी सर्व जबाबदार ठरले. त्यांचा त्यांनी द्वेष केला, तितके त्यांचे नेतृत्व उंचावत गेले. मोदीविरोधक आणि पुरोगामी हीच चूक करत आहेत. केवळ मोदींचा द्वेष करणे उपयोगाचे नाही. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचारविरोधी अभियान छेडताना सम्यकक्रांतीचा कार्यक्रमही ठेवला होता. त्यानंतरचा जनता प्रयोग फसला, जयप्रकाशजींच्या प्रेरणेने राजकारणात आलेल्यांनी नंतर राजकारण सोडले, पण असंख्य सामाजिक कामे उभी केली.

काँग्रेसचे घर जळत असले, तरी फक्त मोदींच्या नावे शिमगा केला जात आहे. मोदींना जे करायचे, ते करतील, पण तुम्ही काय करायचे, तेही लोकांना समजले पाहिजे. देशाची बदलती स्पंदनेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना ऐकू येईनाशी झाली आहेत. अनेकांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांना नवे काही सुचत नाही आणि आकलनही होत नाही. शिवाय लोकांना नुसते उच्च विचार नको आहेत. त्यांना साध्या साध्या दैनंदिन प्रश्नांवरचे तोडगे हवे आहेत. दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनलमध्ये बसून इंटलेक्च्युअल राजकारण करणाऱ्यांनी, आधी लोकांत मिसळून प्रथम देश समजून घेतला पाहिजे. अन्यथा काँग्रेसचे थडगे पाहावे लागेल...

हेमंत देसाई

Hemant.desai001@gmail.com

Similar News