'ऑनलाइन फ्रॉड' चे फंडे
ऑनलाईन व्यवहार वाढले असताना ऑनलाईन गंडा घालण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. कोणत्या प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत लेखक आनंद शितोळे यांचा लेख...;
1) तुमच्याकडे नवीन क्रेडीट कार्ड आलेल असेल तर तुम्हाला फोन येतो. तुमच्या कार्ड मध्ये असणाऱ्या सवलती आणि स्कीम चुकून वेगळ्याच आलेल्या आहेत. त्याचे खर्च आणि चार्जेस खूप जादा आहेत, म्हणून बदलायला प्रोसेस करायला लागणार आहे. मग त्यातून काही एसएमएस आणि पासवर्ड, ओटीपी आणि शेवटी तुमच्या कार्डवरून खरेदी किंवा मर्चंट पेमेंट होत. वरवर पाहता एसेमेस आलेला नंबर आणि वेबसाईट सगळं बँकेचं असल्याचा भास होतो,पण हे फिशिंग आहे.
२. जुने फर्निचर किंवा वस्तू विकायला तुम्ही वेबसाईटवर फोटो टाकता, माहिती देता.वस्तू पसंत असल्याचा फोन येतो. खरेदीची जुजबी बोलाचाली होते.समोरचा तुम्हाला पाच रुपये पाठवतो.तुम्हाला पेमेंट करायला क्युआर कोड लागेल म्हणून सांगतो या गडबडीत तुम्हाला दुसराच क्यूआर कोड येतो आणि पासवर्ड किंवा ओटीपी टाकला कि पैसे गायब.
३.कुठल्यातरी भलत्याच लांबच्या शहरात तुमच्याविरोधात खटला दाखल झालेला आहे. अजामीनपात्र वॉरंट निघालेलं आहे, असे सांगणार, केस मिटवून जामीन मिळवायला वकील देण्याची व्यवस्था करतो असं सांगितल जातं. वकिलाची फी ठरवली जाते, ते पैसे घेतले जातात आणि कोर्टाची साईट असल्यागत पासवर्ड, ओटीपी मागितला जातो. पैसे गायब.
बक्षीस, लॉटरी लागली वगैरे इमेल पूर्वी यायचे हे जुन झाल. लोकांना गंडवायला वेगवेगळे फंडे वापरले जाताहेत.
लाजिरवाणी बाब म्हणजे बँकांना विचारल कि आमचा फोन नंबर आणि डेटा विकला कसा जातो तर त्याच बँकाकडे काहीही उत्तर नाहीये.
विशेष सूचना
- हे अस कस होऊ शकत, आपण काय मूर्ख आहोत का हे प्रश्न ज्यांना बँकिंग नीट ठाऊक आहे त्यांना पडतील. सावज तेच होत ज्यांना या गोष्टी ठाऊक नाहीयेत. फिशिंगला बळी पडणारी माणस नवखे,ज्येष्ठ नागरिक ,महिला असतात खूपदा.
- आपल्या जवळच्या माणसांना अर्थसाक्षर करणे हाच शाश्वत उपाय.
- कुठल्याही स्थितीत आपण दुसऱ्या कुणाला पासवर्ड ओटीपी सांगू नये , कुणी आग्रह धरला तर काठेवाडी घोडे सोबत इरसाल शिव्या वापराव्यात.
- थोडा त्रास झाला तरी चालेल पण अस काही घडू पाहतय अस वाटल तर तातडीने फोन कट करून आपल्या बँकेला फोन करावा, टोल फ्री नंबरला माहिती द्यावी किंवा थेट बँक गाठावी.
- फिशिंग,ऑनलाइन फ्रॉड यामध्ये पैसे गेल्यावर आपण मूर्ख ठरू किंवा लोक हसतील या भीतीने अनेकजण गप्प बसतात, मात्र गप्प बसू नका, तक्रार दाखल करा.
- तुमच्या अनुभवाने निदान दुसरे शहाणे होतील.