तुलसीच्या 12 आंब्याची किंमत 1 लाख 20 हजार

या बातमीचं हेडलाईन मुद्दामहून असं दिलं आहे. मात्र, बातमी वाचल्यानंतर तिच्या आंब्याची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे. याची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीसमोर हार न मानता कसं लढावं? हे शिकवणाऱ्या तुलसीच्या संघर्षमय जीवनाची कहाणी नक्की वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख;

Update: 2021-07-02 07:58 GMT

झारखंड मधील ११ वर्षाची तुलसी कुमारी, तिला शाळेत जायचंय, पण शाळा तर ऑनलाईन आहे. त्यासाठी स्मार्टफोन हवा. तो तिच्याकडे नाही. कारण आईवडील गरीब आहेत. लक्षात घ्या हा आजच्या घडीला लाखो/ कोट्यeवधी मुलामुलींचा जीवघेणा प्रश्न आहे. ते सर्व दीडवर्ष तळमळत आहेत. पण मेनस्ट्रीम मीडियाने यावर रान उठवलं आहे का?

आता बघा तुलसीचे काय झाले?

कोणत्यातरी समाज माध्यमाने तिची एक छोटी क्लिप टाकली. ज्यात ती म्हणतंय की स्मार्टफोन घेण्यासाठी ती रस्त्याच्या कडेला आंबे विकत आहे; त्यातून ती बचत करणार आणि स्मार्टफोन घेणार. ऐकणारा / पाहणारा कोणीही इमोशनल होईल; कशासाठी तुलसीसाठी; देशातील कोट्यावधी लहान मुलांचा विचार तो ऐकणारा करणार नाही. कारण तसे राजकीय शिक्षण झालेले नाही. मुंबईतील श्री अमेय हेटे तुलसीची स्टोरी ऐकतात...

तिला संपर्क करतात आणि सांगतात की मी तुझ्याकडून एक डझन आंबे प्रत्येकी १०,००० रुपये दराने विकत घेतो; त्याप्रमाणे श्री अमेय १,२०,००० रुपये तुलसीच्या बँक अकाउंट मध्ये जमा करता

श्री अमेय हेटे यांची ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. हा योगायोग समजावा

श्री अमेय हेटे सांगतात "तुलसी नशिबाला दोष देत नाही. भीक मागत नाही, स्वतः कष्ट करून आपले प्रश्न सोडवण्यावर विश्वास ठेवते, आशा सोडत नाही, इतर तुलसींनी देखील तिचा आदर्श ठेवावा.

हे खूप पॉलिटिकली लोडेड आहे. तुलसी बद्दल कोणाला कणव नसेल; श्री अमेय यांच्या मदतीमुळे तुलसीला आता शाळा जॉईन करता येईल हे कोण नाकारेल?

विशिष्ट अर्थव्यवस्थेतमुळे पिढ्यान पिढ्या पिडलेल्या लोकांनी व्यवस्थात्मक/ सिस्टीम केंद्री विचार करू नये; त्यांच्या कोणत्याच प्रश्नासाठी शासनाला जाबदायी धरू नये, आपल्या प्रश्नांसाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे, आपण सतत संघर्ष केला पाहिजे, आशा सोडली नाही पाहिजे...

हे ही व्यवस्था सतत इतक्या सूक्ष्मपणे कोट्यावधी लोकांच्या मनावर सतत बिंबवत असते; एक ही छोटी संधी सोडत नाही. तुलसी ची बातमी कितीतरी टीव्ही चॅनेल्स वर / वर्तमानपत्रात सारखी फिरवली जात आहे; कोण घेतात हे निर्णय?

मी अर्थव्यवस्थेबद्दल बरंच काही लिहीत / बोलत असतो. मला झोपेतून उठवून जरी कोणी विचारले की अर्थव्यस्वस्थेसमोरील सर्वात जटील प्रश्न कोणता?

मरेपर्यंत माझे एकच उत्तर असेल "बॉटम ऑफ द पिरॅमिड" मधील कोट्यावधी नागरिकांना व्यवस्थात्मक विचार करायला शिकवणे, त्यांच्या जवळपास सर्व प्रश्नांची मुळे अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट ढाच्यात आहेत हे शिकवणे आणि त्यात बदल फक्त राजकीय सत्तेतून येऊ शकतो. हे शिकवणे.

संजीव चांदोरकर (१ जुलै २०२१)

Similar News