Pimpri Chinchwad : शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन येतील का?
पिंपरी चिंचवडमध्ये गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर येणार का? शरद पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला महानगरपालिकेच्या निवडणुकात नवसंजीवनी मिळणार का? तसेच पवारांच्या दौऱ्यामुळे नेमका कुणाचा फायदा झाला? पक्ष, नेते की नागरीक? शरद पवार यांच्या दौऱ्यातून नेमकं काय साध्य झालं? जाणून घ्या गोविंद वाकडे यांच्याकडून;
(पिंपरी चिंचवडमध्ये आज निवडणुका झाल्या तर निर्विवाद भाजपचीच सत्ता येईल.. अर्थात सहा महिन्यानंतर कोण-कोण बेडूक उड्या मारून स्वगृही परततील यावर आणि राज्यातील सरकार टिकलं तर राष्ट्रवादीला कदाचित इथे अच्छे दिन येतीलही..) ते आले, त्यांनी ऐकलं आणि फार काही न सांगता ते निघूनही गेले...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्वतः म्हटल्या प्रमाणे ते तब्बल 38 वर्षानंतर एखादा स्वच्छ हेतू ठेऊन किंवा पिंपरी चिंचवडकरांना काहीतरी मागण्यांसाठी म्हणून दोन दिवसांपूर्वी शहरात आले आणि संपूर्ण शहराचं वातावरण निवडणूकमय झालं, त्यांचं आगत-स्वागत करण्यासाठी नेते सजले, महागड्या वाहनांची धावपळ सुरू झाली, राजकारणाचा 'र' न कळणारी किंवा वडिलोपार्जित आंदण मिळालेल्या राजकीय वारश्याची झुल पांघरून स्थानिक नेत्यांची पुढची पिढी बॅनरवर आणि सभास्थळी झळकू लागली आणि ह्या सगळ्या गोतावळ्यात शरद पवार आपल्या जुन्या सहकार्यांकडून शहरातील परिस्थिती समजून घेऊ लागले.
मात्र हे सगळं वरवरचं होतं. कारण पक्षांतर्गत गटबाजीला आलेलं उधाण पवारांच्या पायांवर आधीपासूनच धडका मारत होतं, सत्ता तर अशीही गेलीच होती. राहिलेले इन-मिन-तीन नेते, एक आमदार आणि एक दूरर्रर्रर्रचा "कलाकार" खासदार, या पलीकडे पक्ष म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ओळख उरली नव्हती.
नेमकी हीच वेळ पक्षाला दुय्यम स्थान देणा-यांनी हेरली आणि जुन्या जाणत्यांचा एक गट पवारांना निमंत्रित करण्यासाठी गेला, आता जी लोकं निमंत्रण देण्यासाठी आले होते ते चेहरे बघून साहेबांना गटबाजी कळली नसती तरच नवल, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि "फाटलेले शिवण्यासाठी" म्हणून ते शहरात दाखल झाले.
पहिला दिवस
10 बेडच उदघाटन, नंतर एका हॉटेलचं उदघाटन, मग दिल्ली, मुबंई, (पिंपरी चिंचवड टाळून) दीड तास पत्रकार परिषद आणि त्यापुढचे सलग 4 तास हा महामेरू आपल्या शिलेदारांना फक्त ऐकत होता आणि बोलत होता.
त्या 4 तासात त्यांनी आपल्या चेहऱ्यावर ना आजारपण दिसू दिलं ना पक्षाचं झालेलं बकालपण. ते ऐकत होते तसा बोलणाऱ्यांचा जोर वाढत गेला. बोलण्याचा ओघात प्रत्येकजण आपल्याला पक्षामुळे आणि पवार साहेबांमुळे पद, प्रतिष्ठा, आणि पैसा मिळाला हे विसरून बोलत होते.
जेव्हढी मंडळी तक्रार करायला आली होती तेवढी संख्या ना कुठल्या प्रचाराला होती, ना कुठल्या जनांदोलनासाठी जमली होती, हे कळून देखील प्रत्येकजण वाचत असलेल्या तक्रारीचा पाढा ऐकण्याची हतबलता स्वीकारण्या पलीकडे साहेबांकडे पर्याय नव्हता.
तरीही साहेब बोलले... आणि त्यांनी आपले परखड मतं सर्वांसमोर ठेवली, गावकी-भावकी आणि गावचा- बाहेरचा हे राजकारण करू नका, सासू -सासऱ्याच्या भूमिकेत जाऊन आपल्या अनुभवाची शिदोरी नवख्याना देत, या निवडणुकीला 50 टक्के सुशिक्षित आणि गरीब असला तरी चालेल मात्र सामाजिक जाणिव ठेवणाऱ्या तरुणांना उमेदवारी द्या असा आदेश त्यांनी दिला. (त्यांचा असा आदेश एकूण उपस्थित असलेल्या नेत्यांनी लगेच आपला वारस महापालिका सभागृहात गेल्याची स्वप्ने रंगवली, पण साहेबांना असलं काही अभिप्रेत नसावं)
असो.....
दुसरा दिवस
तसे वेळेचे बंधन पाळणारे साहेब कधी नव्हे ते नियोजित वेळेपेक्षा तब्बल दीड दोन तास उशिरा आले, आणि उपस्थितांची भाषणं ( ना शपथ, ना प्रण) आटोपली की साहेबही जुन्या आठवणींना उजाळा देत, आणि विरोधकांवर एखाद दुसरी टीका करून तोंडसुख घेऊन निघून गेले, मेळावा संपला तशा नेत्या- कार्यकर्त्यांनी पाठी फिरवल्या, फार-फरतर काहींनी घरा पर्यंत जाईस्तोर साहेबांच्या ऊर्जेची चर्चा केली असेल पण साहेबांच्या भाषणाने कुणी फार प्रभावित झालं असं दिसतं नव्हतं आणि जे प्रभावित झाले त्यांच्यावरील प्रभाव पुढचे सहा महिने टिकेल अशी सुतराम शक्यता नाही.
मग साहेब येण्याचा नक्की पक्षाला फायदा झाला? नेत्यांना झाला? की नागरिकांना झाला? तर याचं उत्तर कुणालाही नाही, एव्हढंच आहे.
कारण राज्यातील सत्तेच्या चाव्या साहेबांच्या हातात असून देखील त्यांनी कधी इथे पक्षाला बळ देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
बारामती लोकसभा मतदार संघातील नेत्यांना मिळालेली ताकद आणि दिल्या गेलेल्या पदांच्या तुलनेत, बाजूच्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची दैनिय अवस्था बघता पक्षावाढ का खुंटली हे अधोरेखित करणारं आहे.
खेड-राजगुरूनगरने तर स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीची बुज राखली, मात्र आजतागायत या विधानसभा मतदार संघाच्या झोळीत मंत्रिपद तर सोडाच साधं महामंडळही पडलं नाही, आणि पुढे पडेल अशी शक्यताही नाही. मावळतलं चित्रही वेगळं नाहीय.
आणि याचा परिपाक (वचपा) काय तर साहेब 38 वर्षा नंतर येऊनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकही स्थानिक नेता पक्षवाढीसाठी म्हणून का होईना त्यांच्या उपस्थितीत इतर पक्षातील एकही पदाधिकारी किंवा साधा कार्यकर्ताही पक्षात आणू शकला नाही, किंबहुना गटबाजीमुळे ते होऊ शकलं नाही. मात्र त्यामुळे महापालिकेवर सत्ता आणन तर दूरच, आधी एखादा कार्यकर्ता तर नेऊन दाखवा हे विरोधकांच्यात चाललेल्या दबक्या आवाजातील चर्चेचं आवाहन इथल्या नेत्यांना स्वीकारावं लागणार आहे.
मात्र, हे सहजासहजी शक्य होईल का तर मुळीच नाही. कारण साहेब म्हणतात, त्या प्रमाणे "भाकरी करपण्या आधी फिरवावी लागते" मात्र, भ्रष्टाचाराच्या पिठात मळलेली इथली भाकरी पुरती करपलीय, कदाचित ती फिरवता येईल, पण आता फिरवणाऱ्यांच्या हाताला चटके सोसावे लागतील. अर्थात राज्याच्या मंत्रीमंडळातील भाक-या फिरवंतांनाही हात पोळणार आहेतच म्हणा, त्यामुळे हा प्रयोग आधी इथे होणं गरजेचं आहे. पण भाकरी फिरवणार कोण हा खरा प्रश्न आहे..?
-गोविंद अ.वाकडे