नदीम श्रवनची गाणी आणि सुनी आणि देव्याचं 'अबोल' प्रेम

ही कहाणी आहे... देव्या आणि सुनीच्या प्रेमाची... गरीब मागच्या बेंचवर बसणाऱ्या देव्याचं वर्गातील हुशार आणि देखन्या सुनीवर निख्खळ प्रेम होतं. नदीम श्रवनची गाणी गात सुनीवर लाईन मारणाऱ्या देव्याला सुनी मिळाली का? देव्याने सुनीला प्रपोज केला का? वाचा सागर पावशे यांच्याकडून एका अबोल प्रेमाची अस्सल मनाला हुरहूर लावणारी कहाणी...;

Update: 2021-09-14 04:47 GMT

आशिकीच्या दोन कोटी कॉपीज घेणारी माणसं कुठून आली? वडाप, ट्रॅक्टर्सवर राजा हिंदुस्थानीची गाणी आजही का वाजतात? युट्युबवर 'सिर्फ तुम'च्या गाण्यांचे व्हिव्ज वाढवणारी मंडळी कोण आहे? नदीम श्रवनची लोकप्रियता ही अनेक समीक्षकांसाठी आजही कुतुहलतेचा विषय आहे. पण केवळ असं अभिजाततेच्या फुटपट्ट्यावर तुम्ही या जोडीला मोजता बसला तर त्या लोकप्रियतेचं तुम्हाला कायम नवलंच वाटेल. मला ते कधीही वाटलं नाही. कारण माझ्यापुरती काही सत्य मी स्वीकारलीय.

अगदी कळायला लागल्यापासून ही जोडी मला कायम एका विशिष्ट वर्गाचीच संगीतकार वाटत आली आहे. आहेरे वर्गाकडून नाहीरे वर्गाकडे जाणारा प्रवास तुमच्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग संपवत जातो. 'साग्या बाप आहे तोवर एकदा मिठी मारून घे, नाहीतर आयुष्यभरचा गिल्ट घेऊन जगावं लागतं'.

मागं मित्राच्या बाप गेला तेव्हा तो सांगत होता. ज्या वर्गाला रक्ताची माणसं आयुष्यातून वजा होतात. पण हक्काने कधी मिठी मारायला जमत नाही. त्यांच्यासाठी एका ठराविक वयात वाटणारं विरुद्धलिंगी आकर्षण शब्दांत मांडणं केवळ अश्यक्य आहे. अशा वेळी त्यांना त्यासाठी काहीतरी अल्टरनेटीव्ह हवं होतं. नदीम-श्रवनची गाणी ही त्या बुजलेल्या वर्गाचा आवाज बनली. अशा कित्येक कहाण्या ज्यांच्यात एका शब्दाची देवाणघेवाण न होताही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवल्या गेल्या. देव्याची गोष्टी ही त्यातलीच एक.

'माणूस स्वतःची ओळख स्वतः बनवतो' ही फार उथळ संकल्पना आहे. भारतासारख्या देशात तुम्ही केवळ माणूस म्हणून जन्माला येतच नाही. नको असणाऱ्या शेकडो आयडेंटिटी जन्माबरोबरच तुमच्यावर लादल्या जातात. ज्यांचे कॉप्लेक्स मग तुम्हाला आयुष्यभर सोडत नाही. शेवटच्या बाकावर बसणारी सगळीच मुलं काही खोड्या काढण्यासाठी बसत नाही. त्यातले काही जन या कॉम्प्लेक्सचे शिकार असतात. कुठेही अधोरेखित होणार नाही. याची काळजी घेत कडेकडेने आख्ख्य आयुष्य काढणारी माणसं मी बघितली आहेत.

मैफिल जिंकण्याची स्पर्धा लागलेल्या जगात उत्तर येत असूनही हात वर न करणारा एक वर्ग असतो. देव्या त्या वर्गाचा प्रतिनिधी होता. 'सफाई कामगाराचा मुलगा' ही एवढी एक ओळख त्याला उरलेल्या जगापासून तोडून घ्यायला पुरेशी होती.

'कुठलंही काम छोटं नसतं' यासारखी युटोपीयन सुभाषितं केवळ शाळेच्या भिंतींवरच शोभून दिसतात. व्यावहारिक जगाचा त्याच्याशी घंटा संबंध नसतो. हे देव्याने खूप कमी वयात ओळखलं होतं. देव्याचा बाप ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून काम करायचा. रोज सकाळी गल्लोगल्ली जाऊन कचरा गोळा करणारी घंटागाडी गावानं सुरू केली होती. गाव आधुनिकतेची कास धरत होतं. पण ही सफाईची कामं पिढ्यानपिढया देव्याच्याच घरात का? हे प्रश्न पडण्याइतपत ना देव्या मोठा होता ना मी.

एक मात्र होतं. बापाबरोबर रोज सकाळी घंटागाडित फिरताना खंडोबा मंदिरामागच्या गल्लीला गाडी लागली की तो काहीतरी कारण काढून टांग मारायचा. कधीकधी आपल्या अस्तित्वाचीही खबर नसलेल्या माणसांसमोर आपण उगाच आपल स्टेटस जपत असतो.

देव्याच्या आयुष्यात ती व्यक्ती सुनी होती. खंडोबा मंदिराच्या मागच्या गल्लीत तिसरं घर तिचं. सुनी वर्गाची टॉपर आणि सौंदर्याचे सगळे स्टेरिओटाइप पूर्ण करणारी पोरगी. त्यामुळं ती कायम हिंदी सिनेमातल्या हिरोईन सारखी अप्राप्य वाटायची. पण अप्राप्य गोष्टींविषयी माणसाला बाय डिफॉल्ट आकर्षण असतं. कदाचित म्हणूनच तिच्यावर मरणारा देव्या एकटा नव्हता. फरक हा होता की देव्याला ती कधी अप्राप्य वाटली नाही. कारण तिला मिळवण्याचा विचारही त्याला कधी शिवला नाही.

काही गोष्टींना केवळ बघून सुख घ्यावं, त्यावर मालकी दाखवायच्या भानगडीत पडू नये. देव्यानं स्वतःची रेषा आखून घेतली होती. इतकं टोकाचं प्रेम करूनही त्यानं सुनीपासून एक सुरक्षित अंतर नेहमी ठेवलं होतं.

बॅक टू नदीम श्रवण. वडिलांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान असल्यानं गाव छोटं असलं तरी माझ्या घरी इलेक्ट्रॉनिक्सची सगळी साधनं असायची. ऑडिओ टेप त्यातलंच एक. मी नदीम श्रवण कळत नसल्यापासून ऐकत आलोय. देव्याशी मैत्री झाली ती अकरावीत. पौगंडावस्थेतील तो काळ जेव्हा नदीम श्रवण सर्वात जास्त अपील होतात. देव्याच्या बाकावर बसण्याचं मुख्य कारणही तेच. देव्या नदीम श्रवनचा भक्त होता. खरंतर नदीम श्रवनचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या गाण्यांचा म्हणणं अधिक योग्य राहील. कारण जिथं ऍक्टर आणि गायक हे वेगळे असतात हेही आम्हाला कळत नव्हतं. तिथं नदीम-श्रवण माहीत असण्याची शक्यताच नव्हती. पण देव्यापुढं शंभर गाणी वाजवली असती तरी त्यातलं नदीम श्रवनचं एक गाणं त्यानं ओळखलं असतं. यावर आज मी पैज लावू शकतो. म्हंटलो ना नदीम श्रवण एका विशिष्ट वर्गाचे संगीतकार होते. ते अपील होण्यासाठी तुम्हाला कुठलं संगीततज्ज्ञ असायची आवश्यकता नाहीये. ते बासरी, शेहनाई आणि सतारचं कॉम्बिनेशन देव्या झोपेतही ओळखू शकत होता.

तसा देव्या वर्गात असून नसल्यासारखा. ना अभ्यासात हुशार ना खोडी काढण्यात पटाईत. शारीरिक कामं करून त्यानं कमावलेलं पिळदार शरीर. पण वर्गातली बारकी पोरं टपली मारून जायची इतका घुम्या. बाकी वर्गापासून आपलं अस्तित्व लपवणारा देव्या जेव्हा सुनीनं नोटीस करावं म्हणून धडपडायचा. तेव्हा लई केविलवाणा दिसायचा.

धड वर्गात उत्तर देऊन तिला इम्प्रेस करावं एव्हढा ना तो हुशार होता, ना टपोरीगिरी करण्याइतप हिम्मत त्याच्यात होती. त्याच्याकडं होती फक्त नदीम श्रवणची गाणी. तीही वर्गात कुणी नसल्यावर मधल्या सुट्टीत आम्ही म्हणायचो. आम्ही म्हणजे म्हणायचा देव्याच. मी फक्त बेंचवर हाताने वाजवून उगाच त्यात सामील व्हायचो.

एक दिवस आमचा हा धंदा चालू असताना पाटील मास्तर अचानक वर्गाच्या दारात येऊन थांबले. मी लांबूनच बघिल्यामुळं वाजवायचं बंद केलं. देव्याची मात्र तंद्री लागलेली. त्यानं सरांना बघितलं तोवर खूप उशीर झालता...

सुट्टी संपल्यावर पहिला तास पाटील सरांचाच. त्यांनी वर्गात आल्या-आल्या देव्याला पुढं बोलवलं. देव्यानं आजवर अनेकदा चूक नसतानाही विनातक्रार मार खाल्लेला. त्यामुळं आज त्यानं स्पष्टीकरण देणं शक्यच नव्हतं. तो मान खाली घालून पुढं गेला. पण पाटील सरांचा मूड त्या दिवशी वेगळाच होता. त्यांनी त्याला मारायचं सोडून गाणं म्हणायला लावलं. तो बराच वेळ तसाच घुम्यासारखा उभा राहिला. पोरं हसायला लागली. देव्या रडकुंडीला आला. मग पाटील मास्तर त्याला धीर देत म्हंटले 'असं समज वर्गात कुणीच नाहीये. आणि मगाशी म्हणत होता तसं बिनधास्त म्हण'.

आता काही गाणं म्हंटल्याशिवाय आपली सुटका नाही हे ओळखून देव्यानं काहीतरी गायचं म्हणून सुरूवात केली.

'मुझसे मोहब्बत का इजहार करती,

काश कोई लडकी मुझे प्यार करती.'

खरंतर घाबरल्यामुळ हे पहिलं कडवं म्हणताना त्याचा आवाज फाटत होता. पण ते फक्त मला कळालं. बाकी पोरांना तेव्हढ्यावरही तो सराईत गायक वाटून गेला. त्यानंतर मात्र देव्या परत तंद्रीत गेला.

वो बैचेन होती मै बेताब होता,

निगाहो मे उसकी मेरा ख्वाब होता.

शर्मा के वो लगती गले,

रखता उसे पलको तले.

चोरी-चोरी वो मेरा दीदार करती, काश कोई लडकी......

आता दांड्या उडायची वेळ पोरांची होती. xxx काय गायला देव्या त्या दिवशी.

सरांनी दहाची नोट काढून त्याला बक्षीस दिली. पण त्याला त्यापेक्षा जास्त आनंद पोरांनी आणि विशेषतः सुनीनं गाणं संपल्यावर ज्या टाळ्या वाजवल्या त्यामुळं झाला होता. टाळ्या घेण्यासारखं आपल्याकडेही काहीतरी आहे. याची जाणीव करून देणारा एक प्रसंग तुमच्यातले सगळे गंड संपवतो. पाटील मास्तर मला त्या दिवशी जगात भारी माणूस वाटला.

आता वर्गात देव्याचा भाव वधारला होता. ऑफ तासाला पोरं त्याला गाणी म्हणायला लावायची. तोही कुठले आढे वेढे घेत नव्हता. ते अटेंशन तो एन्जॉय करायला लागला होता.

सुनिकडं बघून त्यानं 'तुम्हे देखे मेरी आंखे, इसमे क्या मेरी खता है' गायला सुरवात केली की वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स व्हायचा. सुनीनं वळून बघितलं की तो खाली मान घालायचा. तिच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत त्याची कधीच आली नाही. सुट्टीत तिच्या समोरून जाताना तिला ऐकू जाईल अशा आवाजात 'हम लाख छुपाये प्यार मगर' हे मुद्दामहून ठरलेलं असायचं. दिवस भरभर निघून गेले.

बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या. सुट्ट्याच्या काळात देव्या सुनीच्या गल्लीतून सायकलवर रोज एकदोन चक्कर मारायचा. त्याला तिचे भांडे घासण्याचे, कपडे धुण्याचे टायमिंग पाठ होते. शेवटी निकाल लागले. देव्या अपेक्षेप्रमाणे दोन विषय गेला. सुनी टॉपर होती. ऍडमिशनची लगबग चाललेली. त्याच दरम्यान गावात एक सर्कस आली होती. रोज सायंकाळी आठ ते दहा असा हप्ताभर खेळ होता.

देव्या मला सर्कस बघायला ओढत घेऊन गेला. त्यामागं दोन कारणं होती जी मला तिथं गेल्यावर समजली. पहिलं त्या सर्कसमध्ये लागणारी नदीम श्रवणची गाणी आणि दुसरं सर्कस बघायला येणारी सुनी. सुनीचं नाशिकला इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन झालेलं. हप्ताभरात ती जाणार होती. दिवस जसे सरत चालले तसा देव्या अस्वस्थ व्हायला लागला. पण ही अस्वस्थता केवळ सुनी त्याच्यापासून दूर जाईल याची नव्हती. त्याला ती जाण्याअगोदर तिच्याकडून काहीतरी हवं होतं. ज्याची वाट त्यानं मागची कित्येक वर्ष बघितली होती. सर्कसचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी सुनी जाणार होती. विखुरण्याची वेळ झाली होती. सर्कसमध्ये गाणं लागलं होतं.

कल कॉलेज बंद हो जायेगा तुम अपने घरको जाओगे.

फिर एक लाडका, एक लडकी से जुदा हो जायेगा.

समोर उभी असलेली सुनीचीही आता चलबिचल सुरू होती. ती एकटक देव्याकडं बघत होती. त्याक्षणी देव्यानं फक्त तिला विचारण्याचा उशीर होता. तिचा होकार त्या अस्वस्थतेतून स्पष्ट दिसत होता. पण देव्या विचारणार नव्हता. देव्यासारख्या माणसांना स्वप्नांतही वास्तव विसरता येत नाही हे केवढं क्रूर. पुढचं कडवं चालू झालं

मै तुमसे जुदा हो जाउंगा

बोलो कैसे रह पाओगी.

फिर एक लडका, एक लडकी से जुदा हो जायेगा....

त्यानंतर मात्र, सुनीला ते सगळं असहाय्य झालं, ती रडत-रडत घराकडं पळत गेली. सुन्या मात्र निर्विकार होता. त्याची तपश्चर्या सफल झाली. त्याला फक्त सुनीची कबुली हवी होती, जी त्यानं घेतली. तेवढ्या भांडवलावर आयुष्य काढायला त्याच्याकडं नदीम श्रवनच्या विरह गीतांची कमी नव्हती.

दुसऱ्या दिवशी सुनी नाशिकला गेली. त्याच हप्त्यात देव्याचा बाप वारला. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. शिक्षण सुटलं. आज या गोष्टीला दहा वर्ष झाली. आपापल्या आयुष्यात दोघेही खूप पुढं गेलेय. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो. दोंघांच्या मोबाईल मधील प्लेलिस्ट चेक केली तर आजही ती नदीम श्रवनच्या गाण्यांनी भरलेली असेल.

ह्या एप्रिलमध्ये श्रवण गेला. नदीमनही काम करणं कधीचं बंद केलंय. गुगल केलं तर दोघांच्या नावापुढं 1973 ते 2005 असं ऍक्टिव्ह इअर म्हणून दाखवतं. पण असं काळाच्या चिमटीत केवळ कलाकार पकडला जाऊ शकतो, त्यानं मांडलेला पसारा नाही.

'कोको' या ऍनिमेशनपटात एक भन्नाट संकल्पना मांडलीय. त्यात मेलेल्या पात्रांचं स्वर्गासारखं एक समांतर विश्व असतं. पण त्यात ती लोकं तोपर्यंतच जिवंत असतात. जोपर्यंत पृथ्वीवरील लोक त्यांची आठवण काढतात. पृथ्वीवरील लोकांच्या विस्मृतीत जाताच ते त्यांच्या समांतर विश्वातही मरू लागतात. देव्यासारख्या माणसांसाठी नदीम श्रवणची गाणी हे भूतकाळात घेऊन जाणारी टाईममशिन्स आहे. त्यामुळे अशी लोकं आहे. तोवर कोकोतल्या पात्रांप्रमाणे नदीम श्रवनही अमर आहे.

सागर पावशे

(लेखक- सोशल मीडियावर सिनेमाविषयक लिखाण करतात.)

Similar News