मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा खरेच जास्त होईल काय?

देशात मुस्लिमांची संख्या वाढली तर हिंदु अल्पसंख्य होतील अशी भीती हिंदुत्ववादी वारंवार दाखवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनीही असाच दावा केला होता. पण भागवत यांचा हा दावा कसा खोटा आहे, याचे विश्लेषण करणारा लेखक जगदीश काबरे यांचा लेख...

Update: 2021-10-19 12:14 GMT

लोकसंख्यावाढीच्या दराबद्दल आणि कथित असमतोलाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवतांनी केलेली मांडणी कशी भंपक आहे, हे भारतीय जनगणना आणि तिचे रिपोर्ट पाहून डोके शाबूत असलेल्या माणसाला सहज कळते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार देशात हिंदू खतरेमे असल्याचा कुठलाही पुरावा नाही. म्हणजे खरं तर 'हिंदू खतरे मे नाहीच', पण हिंदूत्ववाद्यांची राजकीय दुकानदारी धोक्यात यायला लागलीय म्हणून भागवतांचे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचे मुस्लिमांच्या विषयी भयगंड निर्माण करून हिंदू लोकांमध्ये भीती पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत.

लोकसंख्या वाढीचा नेमका दर आणि तपशील खालीलप्रमाणे

भारतीय जनगणनेनुसार वेगवेगळ्या धर्मीयांची लोकसंख्या नेमकी कशी बदलते आहे याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण माहितीच्या आधारे केलेलं हे विश्लेषण. हे विश्लेषण अमेरिकन संस्था 'प्यू रिसर्च सेंटर' या संस्थेने केलेलं आहे.

१९९२ मध्ये असणारा जन्मदर आणि २०१५ साली असणारा जन्मदर हा लोकसंख्यावाढ कशी होतेय ते दर्शवतो.

मुस्लिम जन्मदर ४.४ वरून २.६ वर आलेला आहे, म्हणजे घट १.८

हिंदूचा जन्मदर ३.३ वरून २.१ वर आलेला आहे, म्हणजे घट १.२

ख्रिश्चन जन्मदर २.९ वरून २ वर आलेला आहे, म्हणजे घट ०.९

बौद्ध धर्मीय जन्मदर २.९ वरून १.७ झालेला आहे, म्हणजे घट १.२

शिखांचा जन्मदर २.४ वरून १.६ झालेला आहे, म्हणजे घट ०.८

जैनांचा जन्मदर २.४ वरून १.२ झालेला आहे, म्हणजे घट १.२

याचा सोपा अर्थ असा आहे की, १९९२च्या तुलनेत २०१५ मध्ये लोकसंख्या वाढीचा वेग सगळ्यात कमी मुस्लिमांचा आहे आणि सगळ्यात जास्त शिखांचा आहे. यावरून सगळा देश इस्लामिक होऊ घातलेला आहे, हिंदू धर्म खतरेमे आहे, या हाकाट्या किती भंपक आहे आणि या पिपाण्या कश्या पिचक्या आहेत हेच या आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

तरीही भविष्यकाळात मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होऊ शकेल, असा भयगंड भागवत आपल्या प्रचारकी भाषणातून निर्माण करत आहेत. हा प्रचार व ही भूमिका सर्वस्वी खोटी आणि एकांगी आहे.

भागवतांच्या कथित आक्षेपाची समीक्षा केली असता, जे सत्य नजरेसमोर येते, ते पुढीलप्रमाणे :

१. फाळणीपूर्वी १९४१ साली जनगणनेनुसार भारतात एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंचे प्रमाण ६९.५% होते, तर मुसलमानांचे प्रमाण २४.३% होते.

२. फाळणीनंतर १९५२ मध्ये हिंदूंचे प्रमाण ८५%, तर मुसलमानांचे ९.९% झाले. ३. १९८१ साली (म्हणजे ३० वर्षाच्या अवधीत) हिंदूंचे प्रमाण ८२.६% झाले, तर मुसलमानांचे प्रमाण ९.९ टक्क्यांवरून ११.४ टक्क्यांवर गेले. म्हणजे ते दीड टक्क्याने वाढले.

मुसलमानांचे हे प्रमाण वाढले त्याची कारणे कोणती होती? मुसलमानांच्यातील बहुपत्नीत्व हे त्याचे कारण आहे, या समजुतीला काही आधार आहे काय?

मुसलमानांमधील १९५१ ते १९६१ या दशकातील एकूण विवाहांपैकी ४.३१ टक्के लग्नांत एकाहून अधिक बायका होत्या, तर हिंदूंमधील लग्नांपैकी ५.०६ टक्के लग्नांत एकाहून अधिक बायका होत्या. याच दशकात आदिवासींच्या लग्नांपैकी १७.९८ टक्के लग्नांत, तर बौद्धांपैकी ८.१३ टक्के लग्नांत एकाहून अधिक बायका होत्या. 'रिपोर्ट ऑफ द कमिटी ऑन द स्टेटस् ऑफ विमेन इन इंडिया' (प्रकाशक भारत सरकार, १९७५) या अहवालात नोंदवण्यात आलेल्या वरील माहितीवरून असे आढळते की, मुसलमानांपेक्षा हिंदूंमध्येच १९४१ ते १९५१ आणि १९५१ ते १९६१ या दोन्ही दशकांत बहुपत्नीत्वाचे प्रमाण अधिक आहे. म्हणून बहुपत्नीत्वाचे प्रमाण मुसलमानांच्यात अधिक आहे. या समजुतीला काही आधार नाही. हा फक्त हिंदुत्ववाद्यांनी सामान्य हिंदू लोकांना घाबरवण्यासाठी केलेला कावा आहे.

दुसरा मुद्दा लक्षात घ्यावयास पाहिजे तो हा की, भारतातील सर्वधर्मीयांमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा सतत कमी आहे. मुसलमानांमध्ये १९८१ सालात दर एक हजार पुरुषांमागे ९३७ स्त्रिया होत्या. सर्व मुसलमान पुरुषांनी फक्त एकेका स्त्रीशी लग्न करावयाचे ठरवले, तरी तेवढ्या स्त्रिया मुसलमान समाजात नाहीत. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे, ते चार-चार बायकांशी लग्ने कशी करू शकतील? किंवा असे म्हणावे लागेल की, एकेका पुरुषाने चार-चार बायका केल्या आणि जरी एक हजार पुरुषांमागे एक हजार बायका असल्या, तरी फक्त २५० पुरुषांना १००० बायका मिळतील आणि उरलेल्या ७५० पुरुषांना अविवाहित राहावे लागेल. कडवी धर्मनिष्ठा असली, तरी जगातील कोणते पुरुष धर्मरक्षणाकरिता असा त्याग करण्यास तयार होतील?

तिसरा मुद्दा लक्षात घ्यावयास पाहिजे तो हा की, चार स्त्रियांची लग्ने चार वेगवेगळ्या पुरुषांशी झालेली असोत किंवा एकाच पुरुषाशी झालेली असोत, त्यामुळे मुलांच्या संख्येत वाढ होणार नाही. एवढेच काय पण मुस्लिमांची लोकसंख्या सध्याच्याच गतीने वाढत राहिली तरी हिंदूपेक्षा अधिक होण्यास सुमारे अडीचशे वर्षे लागतील आणि या प्रदीर्घ कालावधीत मुस्लीम समाजात काहीच सुधारणा होणार नाहीत असे मानणे म्हणजे कोणत्याही समाजप्रक्रियेबद्दल अज्ञान प्रगट करणे होईल. यावरून बहुपत्नीकत्वाचा लोकसंख्यावाढीशी काडीचाही संबंध नाही, हे विचार करणाऱ्या सर्वांच्याच लक्षात येईल.

शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे या संबंधातील आणखी एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व परिवाराचे (युतीचे सरकार सत्तारूढ असताना, द्विभार्या प्रतिबंधक कायदा सर्वांना (केवळ हिंदूंना नव्हे) लागू करणारे विधेयक मंजूर करण्यात आले होते. 'केंद्र सरकारवर हिंदुत्व परिवाराचा प्रभाव असल्यामुळे या विधेयकास राष्ट्रपतींकडून संमती मिळवणे कोणत्याही दृष्टीने दुरापास्त नव्हते. मात्र काँग्रेसवर व पुरोगाम्यांवर मुस्लिम अनुनयाचा सतत आरोप करणाऱ्या या 'राष्ट्रप्रेमी' परिवाराने, हे विधेयक गुंडाळून ठेवले आहे. ते का? (संदर्भ: धर्म आणि राजकारण, संपादक: प्रकाश बाळ/किशोर बेडकिहाळ)

हिंदू लोकांना मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय अशी भीती दाखवून भारतीय समाजात द्वेषाची आणि दुहीची बीजे रुजविण्याचे काम शिस्तबद्ध (?) संघ आजवर करत आला आहे. त्यासाठी इतिहासाचा अपलाप करतांनाही ते मागेपुढे पाहात नाहीत. ' खोटे बोला पण रेटून बोला,' हीच त्यांची राजकीय नीती राहिली आहे. वरील आकडेवारी त्यांची भीती अनाठायी आहे हेच सिद्ध करते. मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त वाढते म्हणून हिंदूंनीही एकापेक्षा जास्त लग्नं करावीत, असा फतवा काढून सरसंघचालक सरकारला तसा कायदा करायला लावणार आहेत काय? हिंदूंनीही पोरांचं लटांबर वाढवायचं हा विचार देशहिताचा आहे, असं संघशिस्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करतील काय?

या सर्व विवेचनावरून मोहन भागवत महाशय कसे आणि किती खोटे रेटून बोलत आहेत हे स्पष्ट होतेय. तेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा वाढतेय या संघोट्या हिंदुत्ववाद्यांच्या कांगाव्याला कुणीही बळी पडता कामा नये. कारण रा.स्व.संघाच्या सरसंघचालकांचे विधान अत्यंत चुकीचे आणि तथ्यहीन आहे. संघाला बहुसंख्य हिंदूंच्या मनात मुस्लीमद्वेष भरून राजकारण करायचे आहे, यापासून हिंदू व मुस्लीम दोघांनीही सावध राहायला हवे.

लेखकांचा परिचय – जगदीश काबरे हे विज्ञान विषयावर लिहिणारे ज्येष्ठ लेखक असून त्यांची विज्ञान विषयावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ, लोक विज्ञान संघटना, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ, खगोल मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अशा विविध पुरोगामी चळवळींमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

Tags:    

Similar News