मोदी आणि भारताचं नवं नॅरेटीव्ह..

Update: 2019-05-23 18:31 GMT

अब की बार 300 पार चा आकडा सेट करून नरेंद्र मोदींनी सगळ्यांना अचंबित करून ठेवलं होतं, भाजपाचे कार्यकर्तेही ही घोषणा मध्ये मध्ये, दबकत दबकत घ्यायचे. ज्या पद्धतीचं वातावरण देशभर होतं, ते पाहता यंदा 2014 चा आकडाही मोदींना पार करता येणार नाही असंच दिसत होतं. गेल्यावेळेपेक्षा यंदा विरोधी पक्षही जास्त आक्रामक होता आणि त्यांची तयारी ही.. असं असूनही निवडणुकांचे निकाल येताच सगळ्यांचे अंदाज फोल ठरले आणि नरेंद्र मोदी एका नवीन भारताच्या नॅरेटीव्ह सह अवतरले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने 300 चा टप्पा पार केला तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350 चा टप्पा गाठला. हे अभूतपूर्व यश आहे. या आधी असं यश फक्त नेहरू आणि इंदिरा गांधी यांना मिळालं होतं. पण या विजयाच्या मागे एक मोठी दहशत आहे. या आधीच्या कुठल्याच पंतप्रधानांनी सेक्युलरिजम म्हणजे धर्मनिरपेक्षता, या घटनेच्या मुलभूत तत्वांच्या बाबतीत लढणाऱ्यांवर हल्ला केला नव्हता. सेक्युलरीजम शब्द ही उच्चारायला आता लोकांना भीती वाटते अशा शब्दांत संभावना केली नव्हती.

नरेंद्र मोदी स्वतंत्र भारतातलं नवं नॅरेटीव्ह लिहितायत, हे नॅरेटीव्ह इतर पक्षांना समजत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मोदींच्या नवीन भारतातील मतदारांना जे पसंत आहे ते मोदी करतायत. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व विकासकामांना सरसकट नाकारून आपणच ग्रेट आहोत हे लोकांच्या मनावर ते बिंबवतायत. आजारी पेशंटना चार-पाच वर्षे ट्रीटमेंट मिळत नव्हती असं ते म्हणतायत, मोदी समर्थक त्यावर विश्वास ठेऊन मोदी-मोदी चा नारा ही देतात. मोदी जे बोलतील ते ब्रह्मवाक्य झालंय. हे नॅरेटीव्ह नाकारणाऱ्यांना देशद्रोही असल्याच्या आरोपांना तोंड द्यावं लागतंय. मोदींच्या नव्या भारतात धर्माचं स्थान वरचं आहे.

गांधी 150 आणि भारत 75 हा अभूतपूर्व योग आहे. असं सांगताना या योगावर गांधी हत्येचं समर्थन करणाऱ्या प्रज्ञा सिंह ला त्यांनी संसदेत प्रवेश दिला आहे. एकीकडे गांधी आणि गांधींचे मारेकरी सोबत घेऊन जाणारा हा खोटा माणूस देशातील जनतेला विकासाची खोटी चित्रं दाखवून भुलवत आलाय. सामान्य जनतेला त्यांनी आपणच मसीहा असल्याचं भासवत त्यांच्या सर्व दुःखांवर आपणच जालीम उपाय आहोत हे त्यांनी ठसवून टाकलंय. देशातल्या जनतेला मोदींनी नव्या भारताचं नवं नॅरेटीव्ह दिलंय. काँग्रेस सारख्या पक्षांना अजून हे नॅरेटीव्ह समजलेलं नाही. मोदींनी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर, लाभार्थींच्या अकाऊंट मध्ये थेट योजना-पैसे ट्रान्सफर करण्याच्या योजनेतून प्रचंड लोकप्रियता मिळवलीय. कमी का असेना पण थेट अकाऊंट मध्ये पैसे येण्याच्या क्रीयेमुळे राजकीय दलालांपासून मोठी सुटका झाल्याने सामान्य माणूस सुखावलाय. त्यामुळे मोदींच्या जात-धर्म-लोकशाही-भांडवलशाही यासारख्या बाबींकडे त्याला दुर्लक्ष करणे सोयीचं वाटतं.

मोदी कुठल्याही गोष्टीला एक ट्वीस्ट देतात आणि लोकांपर्यंत ते अशा रितीने पोहोचवतात की लोकांना त्यांच्या नॅरेटीव्ह पेक्षा वेगळी कहाणी स्वीकारावीशी वाटत नाही. जसं, बहुमत मिळाल्यानंतर पक्ष कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गरीबी हटाव च्या नाऱ्याला वेगळाच ट्वीस्ट दिला. त्यांनी सांगीतलं की देशात आता दोनच जाती आहेत, एक गरीब आणि गरीबी हटवण्यासाठी मदत करणारे. या दोन्हींना आपल्याला सशक्त करायचं आहे. साध्या सरळ भाषेत गरीबी दूर करण्यासाठी मदत करणाऱ्यांना ‘श्रीमंत’ असं म्हणता आलं असतं. पण काँग्रेसच्या गरीबी हटाव पेक्षा आपण काहीतरी वेगळं पॅकेज देत आहोत, आपण श्रीमंताचं लांगुलचालन करत नाही हे ठसवत श्रीमंतांना गरीबी हटवणारे अशी व्यापक उपाधी देतात आणि याच नॅरेटीव्ह खाली ते आपल्या श्रीमंत मित्रांचं उदात्तीकरण करतात.

मोदींच्या सगळ्या स्टोरीज् अशाच आहेत. त्यांची सर्व भाषणे ही नेहरू-इंदिरा-राजीव गांधींसारखीच आहेत, पण मोदींचं रॅपर वेगळंच आहे.

सबका साथ सबका विकास चा नारा मोदी देतात, पण इथल्या अल्पसंख्यांक समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व देण्यासाठी ते तयार नसतात. ते आंबेडकरांचा वापर काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी करतात, आंबेडकरांच्या हिंदू धर्माच्या बाबतीतली मतं माहित असूनही स्वतः मात्र हिंदूराष्ट्राची भलामण करताना दिसतात. सगळंच फसवं.

मोदी ब्रँड आहेत आणि ते प्रत्येक घोषणेला ब्रँड करतात. हे फसवं नॅरेटीव्ह आहे. हे समजायला 2024 किंवा त्यानंतरची पाच वर्षे उजाडतील. हरकत नाही, मोदींच्या म्हणण्याप्रमाणे 2014 पासून सेक्युलर बुरख्यात तोंड लपवत फिरत असतील, पण भविष्यात बाकीच्यांना तोंड लपवावं लागेल हे नक्की.

बाकी, आज मोदींसाठी मोठा दिवस आहे. मिळालेल्या जनादेशामुळे विनम्रता सोडू नका असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. विसंगत वाटतंय, पण हीच वस्तुस्थिती आहे. या विसंगतीतून बाहेर पडण्याचं बळ त्यांना मिळो, हीच कामना.

Similar News