आधुनिक अनाथपिंडक

विहार , ध्यान कक्ष ,ग्रंथालय व अभ्यासिका निर्मितीसाठी स्वतःचे घर व शेती जमीन समाजासाठी अर्पण करणारे कंधार जिल्हा नांदेडचे संभाजी कदम....;

Update: 2021-09-16 07:45 GMT

बुद्धकालीन अनाथपिंडका नें सोन्याच्या मोहरा अंथरूण जेतवण विहाराची निर्मिती केली होती , तोच आदर्श समोर ठेवून आधुनिक काळात संभाजी केरबाजी कदम फुलेनगर कंधारकर यांनी आपली वडिलोपार्जित सर्व संपत्ती, शेती, स्वतःचे घर समाजासाठी विहार निर्मिती ,ध्यान कक्ष ,ग्रंथालय व अभ्यासिका निर्मितीसाठी दान देण्याचे जाहीर केले, त्यांच्या८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वरील संकल्प जाहीर केला. करोनाच्या काळात सत्ता ,संपत्ती, प्राण हे क्षणभंगुर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे आपली सर्व मालमत्ता शेती संपत्ती घर हे समाज उपयोगी आले पाहिजे या उद्देशाने संभाजी केरबाजी कदम यांनी वरील घोषणा केली.

पत्नी सावित्रीमाई, चार मुली व एक मुलगा यांच्या उपस्थितीमध्ये व उपस्थित समाजबांधवांच्या समोर आंबेडकरवादी मिशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या शेतजमिनीवर आगामी काळामध्ये नागा विहार ची निर्मिती करण्यात येणार आहे त्यामध्ये विपश्यना कक्ष ग्रंथालय व अभ्यासिका ची प्रामुख्याने उभारणी केली जाईल व या सर्व सुविधा विद्यार्थी व समाज बांधवांना निशुल्क पणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विहार उभारणीचा खर्च सिडको नांदेड येथे त्यांच्या स्वकष्टाने उभारलेल्या दोन घराच्य विक्रीतून आलेल्या पैशातून केले जाणार आहे, त्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील मुली जावई नातवंडे हे सर्व मिळून जे अकरा अधिकारी डॉक्टर इंजिनियर आहेत त्यांच्या वेतनातून दिल्या जाणाऱ्या दानातून हे विहार फक्त कदम कुटुंबियांच्या निधीवर उभारले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कुष्ठतंत्रज्ञ म्हणून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षा पूर्वी सेवानिवृत्त झाले.. सिडको परिसरामध्ये संत कबीर नगर या परिसरात वास्तव्य करत असताना चंद्रमुनी बुद्धविहाराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन वीस वर्षापूर्वी अल्प काळामध्ये विहाराची निर्मिती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला होता.. आत्यंतिक शांत शीतल स्वभावाचे शील व करुणा यांचा अद्वितीय संगम असलेले हे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व परिचित आहेत.

बाप से बेटा सवाई अशी एक म्हण आहे पण मुलापेक्षा आपण त्याग व समर्पण मध्ये एक पाऊल सुद्धा कमी नाही हे त्यांनी या निर्णयातून जाहीर केले. आंबेडकरवादी मिशनच्या निर्मितीसाठी व समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अधिकारी करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या माननीय दीपक कदम यांचे ते वडील आहेत. दीपक कदम यांनी आजीवन अविवाहित राहून तहसीलदार पदाचा त्याग करून समाजासमोर समर्पणाचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.वडिलांनी सुद्धा आपली सर्व शेती संपत्ती घर समाजाला अर्पण करून समाजासमोर आधुनिक अनाथपिंडिकाच्या ची भूमिका बजावत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

संभाजी कदम व दीपक कदम यांनी आपल्या नावावर वैयक्तिक शेती जमीन संपत्ती बँक बॅलेंस न ठेवता संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करण्याचा हा आदर्श समाजातील धम्म चळवळ शैक्षणिक चळवळ राजकीय चळवळ राबवणाऱ्या समोर एक दीपस्तंभ आहे तर विद्यार्थी व तरुणांसमोर हे एक ज्वलंत त्यागाच व समर्पणाचे उदाहरण आहे त्याचे अनुकरण केल्यास नक्कीच सामाजिक राजकीय व धम्माची चळवळ गतिमान होण्यास हातभार लागेल.

आंबेडकरवादी मिशन च्या निर्मितीसाठी दीपक कदम यांच्या मोठ्या भगिनी आयु . करुणा रामदास तारु यांनी जमीन दान दिली होती त्यावरच आज ५00 विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था असलेले आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्र उभारण्यात आले आहे. त्याग व समर्पण साठी कदम कुटुंबीयांचे उदाहरण हे समाजासमोर एक आदर्श म्हणून पाहिल्या जाते. समाजासाठी स्वतःची संपत्ती व एकुलता एक मुलगा दान देण्याचे हे एक अद्वितीय असे आदर्श उदाहरण होय.

Tags:    

Similar News