क्रांतिसिह नाना पाटलांचा नवरा…

शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरे आहे. हि व्यक्ती खरच क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नवरा झाली होती काय आहे हा किस्सा वाचा वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांच्या या लेखामध्ये….

Update: 2022-11-27 09:04 GMT

सर्वांना शिर्षक वाचून धक्का बसला असेल किंवा हे काय नवीन ? अशी भावना मनात आली असेल. पण प्रसंगच तसा मजेशीर आहे. या फोटोतील व्यक्ती काही काळ क्रांतिसिहांचा नवरा झाली म्हणून ते पोलिसांच्या तडाख्यातून वाचले. क्रांतिसिह नाना पाटील हे भूमिगत अवस्थेत अनेक ठिकाणी थांबायचे. सांगली जिल्ह्यातील पारे हे गाव तेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीचे केंद्र च झाले होते. या गावात नाना पाटील अनेक दिवस मुक्कामी असायचे. पारेतील अनेक घरांशी आणि लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. प्रती सरकारच्या कामात पारे येथील अनेकांनी योगदान दिले. नाना पाटील पोलिसांना गुंगारा देवून पारे येथे दिवसभर लपून बसायचे व रात्र झाली की त्यांची सरकारविरोधी चळवळ चालायची. पारे येथील त्यांचे सहकारी क्रांतिसिंहाना जीवापाड जपायचे. काळीज जपल्यासारखे त्यांची काळजी घ्यायचे. त्यामुळेच ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.

एकदा क्रांतिसिहांना पारे येथून जतला जायचे होते. त्यांना जतला घेवून जाण्यासाठी विठोबा कृष्णा वाघमोडे यांनी स्वत:ची बैलगाडी जुंपली. आणि घेवून निघाले. नाना पाटलांना घेवून जायच आहे म्हंटल्यावर त्यांनी गाडीला छत बांधला, सावली केली. सावलीसोबत नाना पाटील कुणाच्या नजरेस पडू नयेत हा ही हेतू होताच. बैलगाडीने ते जतला निघाले होते. जाताना गाडी भिवघाटावर आली. भिवघाटावर पोलिस थांबले होते. नाना पाटील नेहमी तयारीत असायचे. ते साडी नेसून, कुंकू लावून व बांगड्या घालून गाडीत बसले होते. पोलिसांनी गाडी अडवली आणि विठोबा वाघमोडेंना दरडावून विचारले, कुठे चाललाय ? त्यावर त्यांनी सांगितले की, सासुरवाडीला चाललूय. गाडीत कोण आहे ? असा दुसरा सवाल पोलिसांनी आवाज चढवत विचारला. त्यावर, कोण न्हाय सायब माझ बि-हाड हाय.

समोर पोलिस आहेत हे क्रांतिसिहांच्या लक्षात आले होते. पोलिसांनी गाडीत डोकाऊन पाहिले. नाना पाटलांनी गाडीत हालचाल करत हातातल्या बांगड्या वाजवल्या. बांगड्याचा आवाज ऐकल्यावर पोलिस मागे सरले. त्यावेळी विठोबा वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत माझं बि-हाड असल्याचे सांगितले. ते थोड्या वेळासाठी क्रांतिसिहांचा नवरा झाले. अन्यथा पोलिसांनी क्रांतिसिहांना पकडले असते. विठोबा वाघमोडे हे पारे गावात खुप सज्जन माणूस म्हणून ओळखले जायचे. गावात पारायण बसले की हा माणूस सात दिवस एकटाच विणा घ्यायचा. वारकरी सांप्रदायाचा सच्चा साधक असलेले विठोबा वाघमोडे अतिशय शांत, नम्र व सत्शील व्यक्तीमत्व म्हणून परिचीत होते. त्यांचे स्वांतत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. भले त्याची नोंद कुठे केली नसेल. विठोबा वाघमोडे आज हयात नाहीत पण त्यांना काही क्षणासाठी क्रांतिसिहांचा नवरा होण्याचे भाग्य लाभले.

अशा अनेक लोकांनी आयुष्यभर नाना पाटलांना जपले, सांभाळले. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घातला पण त्यांना पोलिसांच्या हाती लागू दिले नाही. नाना पाटलांच्या चळवळीचे असे एक ना अनेक किस्से आहेत. अनेकांनी आपलं योगदान दिलय. त्यातल्या अनेकांची सरकार दरबारी स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंदही झालेली नाही.पण त्यांनी जे योगदान दिलय ते खुप मौल्यवान आहे.

Tags:    

Similar News