मराठा क्रांती मोर्चाला नेतृत्व मिळालंय का?

महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आजवर ५८ मोर्चे काढण्यात आले. त्या ५८ मोर्चात जे नव्हतं ते कोल्हापूर मोर्चात होतं. ते म्हणजे 'नेतृत्व' !;

Update: 2021-06-19 05:26 GMT

५८ मोर्चे हे ठोस नेतृत्वाशिवाय सर्वसमावेशक निघाले. अनेकवेळा समाजातील तरुणींनी या मोर्चाचं नेतृत्व केल्याचं निदर्शनास आलं. लाखो लोक एका मागणीसाठी रस्त्यावर येतात, असे ५८ मोर्चे होतात, खरंतर या इतक्या मोठ्या सामाजीक संक्रमानातून एक तरी खंबीर नवं मराठा नेतृत्व जन्माला येणं मराठा समाजाच्या अधिक हिताचं झालं असतं. पण तसं झालं नाही, की कोणी होऊ दिलं नाही.? हा ही एक सवाल आहे.

मी २०१८ मध्ये ही लिहिलं होतं 'ज्या समूहाला योग्य नेतृत्व नसतं, तो समूह म्हणजे फक्त गर्दी असते, तो समूह नावाड्याविना दिशाहीन झालेल्या गलबतासारखा असतो.' त्यामुळे कोणत्याही आंदोलनाला नेतृत्वाची गरज असते. आंदोलनात किती गर्दी होती.? आंदोलन किती मोठं झालं? या बरोबरच तुलनेत अधिक महत्त्वाचं हेही असतं की आंदोलनाचं नेतृत्व कुणी केलं.? ती गरज व पोकळी आज खासदार संभाजीराजे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला.

आजवर झालेल्या मराठा मोर्चात 'नेतृत्व' ही बाब टाळली गेली, हे लक्षात येतं. मग आता खा.संभाजीराजे जर या मोर्चाचं आणि ते म्हणतात त्या 'लॉंगमार्च'च नेतृत्व करणार असतील तर, दुसरीकडे शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी 'मराठा क्रांती संघर्ष मोर्चा' या बॅनर खाली संभाजीराजे यांच्या आधी बीड मधून थेट मोर्चे सुरू करून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला आहे. आणि पुढे ही असेच स्वतः नेतृत्व करत मराठा मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे. हे असं सगळं असताना 'भाजपचे खासदार' हे बिरुद नाकारणारे संभाजीराजे यांना आता सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थकांकडून मैदानात पाठबळ मिळेल का.? ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेने आंबेडकरी समाज ही ताकतीने संभाजीराजेंच्या मागे उभा राहणार का.? हे येणाऱ्या काळात दिसेलच!

पण आता या लढाईत पुढच्या काळात खा.संभाजीराजे आपली 'राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका' यांचा नेमका कसा मेळ घालतात.? समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या पूर्तीसाठी नेमकं कसं धोरण आखातात? समाजाची ही लढाई ते ताकतीने लढतील का.? जिंकतील का.? वेळ पडलीच तर मराठा आरक्षणासाठी केंद्राशी भांडताना खासदारकी लाथाडतील का.? याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधले आहे.

आजच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार तर उपस्थित होते, हे तर एका बाजूला आहेच, पण या मूकमोर्चाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ऍड प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणे आणि त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून खासदार संभाजीराजे यांना प्रत्यक्ष मैदानात येऊन पाठिंबा देणे, ही संभाजीराजे यांच्या नव्या सामाजिक, राजकीय समीकरणांची नांदी आहे.

खासदार संभाजीराजे व प्रकाश आंबेडकर यांना आंदोलनाच्या मैदानात एकत्र पाहून अनेकांना 'राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या नात्याची आठवण झाली. अनेकांनी 'शाहूशक्ती+भीमशक्ती' अशी मांडणी ही केली. पण गावागावातील वास्तव यापेक्षा खूप वेगळं व भयानक आहे.

मागील आठ दिवसातीलच महाराष्ट्रातील खेर्डा, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, फलटण येथील घटना जरी पाहिल्या तरी त्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या आहेत.

गावगावात मराठा - बौद्ध समाजात जो एकप्रकारचा तणाव आहे, तो तणाव तरी खासदार संभाजीराजे व ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या या सामाजिक युतीतून नक्कीच झाल्याचे दिसून येईल, अशी आशा सध्या आपण करूया!

- जगदिश ओहोळ, व्याख्याते

9921878801

#जगदिशब्द

Tags:    

Similar News