मनोहर भिडेचा पर्दापाश
मनोहर भिडेंच्या संघटनेचे काम कसे चालते? युवकांमध्ये भिडे धर्म द्वेष कसा पेरतात, त्यांच्या संघटनेला मोठे करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील कसा हातभार लावला? वाचा सागर गोतपागर यांचा सविस्तर लेख;
मनावरती शिवरायांच्या विचारांचा असलेला सळसळता अभिमान. गड किल्ले आणि शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांची प्रचंड आवड. स्वातंत्र्य लढा, क्रांतिकारकांचे, देशभक्तीचे मनात ठासून भरलेले विचार. या पार्श्वभूमीचे तरुण तारुण्यातच शिवप्रतिष्ठान संघटनेचे मनोहर भिडे यांच्या गळाला लागतात. तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी गळाला लावलेली असते खोटी देशभक्ती शिवभक्ती. गडकोट मोहिमेच्या माध्यमातून आणि मनोहर भिडे यांची भाषणे ऐकून अनेक तरुण शिवप्रतिष्ठान या संघटनेकडे खेचले जातात. तरुणांना अगोदरच शिवराय आपले वाटतात. हा माणूस शिवरायांविषयी बोलत आहे. देशभक्ती सांगत आहे. राष्ट्रप्रेम देशप्रेम याविषयी बोलत आहे. या प्रभावातून त्यांच्या संघटनेमध्ये तरुण खेचले जातात. सक्रीय धारकरी बनतात.
भिडे गावागावात बैठका घेतात. त्यातून देशभक्ती, देव धर्म यासह मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतात. सुरवात शिवरायांच्यापासून करतात पण यामागुन हळू हळू वैदिक धर्माचा विषय रेटतात. सुरवातीला दर महिन्याच्या ठरलेल्या वेगवेगळ्या रवीवारी त्यांच्या प्रत्येक तालुक्यात बैठका व्हायच्या . दुर्गमोहीम दुर्गा उत्सवाच्या काळात दुर्गादौड आणि संभाजी महाराजांचा मृत्यू ज्या महिन्यात झाला. तो महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. हे शिवप्रतिष्ठानचे मुख्य तीन कार्यक्रम आहेत. ते राबविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असते.
तरुणांना चिकित्सा करण्याचे मार्ग बंद करण्यात येतात. शिवप्रतिष्ठान हे संघटन केवळ तरुणांचे संघटन आहे. यामध्ये एखाद्या कार्यक्रमात केवळ ओवाळण्याशीच मुलींचा सहभाग असतो. या व्यतिरिक्त मुलीं या संघटनेत नाहीत. प्रभावात आलेल्या मुलांना बैठकीतून आपला धर्म वाचला पाहिजे, आपला देश वाचला पाहिजे, तो वाचवायचा असेल तर मोहिमेला गेल पाहिजे. देश वाचवायचा असेल तर बलिदान मास पाळला पाहिजे. दुर्गा दौडीला गेले पाहिजे. अशी शिकवण दिली जाते.
या कार्यक्रमात जी पुस्तके दिली जातात ती बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांचीच असतात. या सर्व कार्यक्रमातून कळत नकळत तरुणांमध्ये मुस्लीम द्वेष पेरला जातो. मुस्लीम या संघटनेच्या आसपासदेखील फिरकत नाही. कट्टर मुस्लीम द्वेष करणारी संघटना असल्याने मुस्लीम या संघटनेत येण्याचा प्रश्नच येत नाही.
ज्या वयात तरुण या संघटनेत येतात या काळात त्यांचे वाचन नसतं. अभ्यास नसतो. यामुळे भिडे जी भाषणे देतात, भिडे जे पुस्तके देतात तेवढच ऐकल आणि वाचल जातं. तोच इतिहास हा इतिहास आहे . महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली. असा मर्यादित इतिहास या युवकांना सांगितला जातो. या गोष्टींची चिकित्सा करण्याची तिथे सोयच ठेवलेली नाही. कारण या बैठकांमध्ये प्रश्न न विचारण्याचा अलिखित नियम असतो. प्रश्न विचारणाऱ्या युवकाचा भिडे गुरुजी असा अपमान करतात की त्यापुढे प्रश्न विचारायचे धाडसच कोण करायचे नाही.
मुस्लीम द्वेषाचा ब्रॅंड म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी पुढे आणले आहे. भिडे वारंवार सांगतात की त्यांना शिवराय आणि संभाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी निर्माण करायची आहे. पण लोकांच्या प्रश्नावर ते कधीही काम करत नाहीत. शेतीचा प्रश्न हाती घेत नाहीत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत नाहीत. रक्तदान घेत नाहीत. . भिडे कधीही म्हणत नाहीत वाचनालये काढूया. इतक्या मोठ्या संख्येने मागे असलेल्या तरुणांच्या रोजगारावर भिडे बोलत नाहीत. त्या बहुसंख्य तरुणांची कुटुंबे शेतकरी आहेत. गुरुजी या विषयांवर कधीही बोलत नाहीत. मुलांनी प्रशासकीय सेवेत जाऊन शिवरायांचे विचार अमलात आणले पाहिजेत हे मुलाना शिकवत नाहीत. या उलट केवळ मुस्लीम द्वेष आणि धार्मिक भावना भडकल्या जातील एवढच काम ते करतात. केवळ धार्मिक द्वेषाचा दारुगोळा या संघटनेत दिला जातो. या संघटनेने मुस्लीम द्वेषाचा ब्रॅंड म्हणून शिवाजी महाराजांना पुढे आणले आहे. धर्मांतर्गत जातीयवाद त्यांनी मांडला नाही.
भिडे गुरुजींचा पायात चप्पल न घालण्याचा त्याग, त्यांची धडपड, हा माणूस संसाराचा त्याग करू धडपडत फिरत आहे. हे तरुणांच्या मनाला अपील होते. ते महात्मा फुलेंचा द्वेष करतात. बैठकीत महात्मा फुलेंना माकड म्हणतात. गांधीजींचा द्वेष करतात.
लोकांच्या मुलभूत प्रश्नावर भिडे कधीही भाष्य करत नाहीत. तुझ्या घरात चूल पेटते का? हे कधीही तरुणांना विचारत नाहीत. केवळ आणि केवळ मुस्लीम द्वेष पेरण्याचे काम ते करतात. सांगलीत दुष्काळाची स्थिती होती. पाण्याचा प्रश्न होता यावर ते कधीही बोलले नाहीत. यासाठी त्यांनी काम केले नाही. ते कधी भ्रष्टाचारावर बोलले नाहीत. सामाजिक प्रश्नावर बोलले नाहीत. संघ कॉंग्रेस बरोबरच भिडेना कॉंग्रेस राष्ट्रवादीची साथ मिळाली. भिडे गुरुजी जिथे जिथे बैठका घ्यायचे ती बहुतांश ठिकाणे संघाची असतात. त्या भागातील स्थानिक संघाचे कार्यकर्ते त्यांची सोय करायचे. या पक्षांची संघटनांची त्यांना मदत होतीच. पण यानंतर त्यांना राजकीय ताकद दिवंगत आर. आर. पाटील यांची होती. दिवंगत पतंगराव कदम यांची होती. कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील तर त्यांच्या मोहिमेला जायचे. पतंगराव कदम यांनी त्यांच्या भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सभेला जागा उपलब्ध करून दिली आर्थिक ताकद दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मागे असलेली तरुणांची झुंड दिसायची. भिडेंना जवळ केलं तर त्यांच्या मागे असलेली ही डोकी आपलीशी होतील. हा त्यांचा भ्रम होता. इतकच नाही तर भिडे गुरुजींच्या एका कार्यक्रमाला शरद पवार हे देखील उपस्थित होते. पतंगराव कदम आणि शरद पवार हे त्यांच्या एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर होते. या सभेत मनोहर भिडे यांनी पतंगराव कदम धनाजी तर शरद पवार संताजी असे उद्गार काढले होते. या सर्व नेत्यांनी पक्षांनी दिलेल्या ताकदीच्या जोरावर शिवप्रतिष्ठान आणि भिडे हे महाराष्ट्रभर पसरले आहेत. भिडे पूर्वीपासूनच गांधीजीवर टीका करतात परंतु याच्यावर बोलण्याचे धारिष्ट्य कॉंग्रेसच्या नेत्यांनी दाखवले नाही. याला अपवाद म्हणून २०१४ च्या लाटेत कॉंग्रेसच्या प्रतिक पाटीलांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एका वाक्यात त्यांच्यावर टीका केली.
धार्मिक भावना भडकाविण्याचे या संघटनांचे काम सातत्याने सुरु आहे. १९८० पासून सांगली जिल्ह्यात त्यांनी काम सुरु केले. याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया २००९ च्या मिरज दंगलीत दिसली. कोरेगाव भीमा परिसरातदेखील घडलेल्या दंगलीमागे हि पार्श्वभूमी आहे. या संघटनांचे काम मिशन म्हणून सुरु आहे.
भिडेंचा विचार विषारी आहे. विघातक आहे. पण तो तरुणांच्या डोक्यात पेरण्यासाठी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते पायाला भिंगरी लाऊन फिरत आहेत. त्या गतीने त्या नियोजनाने पुरोगामी विचार पोहचवणारी मंडळी घराघरापर्यंत पोहचताना दिसतं नाहीत. यामध्ये काही अपवाद आहेत. पण पुरोगामी संघटनांतील कार्यकर्त्यांची निष्क्रियता मनोहर भिडे यांच्यासारख्या लोकाना अनुकूल ठरत आहे. जे चिकित्सा करत नाहीत. वाचत नाहीत ते अशा जाळ्यात अलगद अडकत जातात.
स्टेजवर कालीचरण महाराज गांधीजीबद्दल अनुद्गार काढतो. पोंक्षे आपले विचार व्यक्त करतो याचे लोकांना आश्चर्य वाटते पण भिडेंच्या संघटनेत काम करणारी अशी हजारो लोक आहेत ते गांधीजींना शिव्या घालतात. हिंदू धर्माच्या नावाखाली वैदिक धर्माचा अजेंडा रेटला जातो. हिंदू धर्माची परंपरा सर्व समावेशक आहे. इथे अनेक धर्म आहेत. या सगळ्यांना आपलेसे मानणारी विचारधारा हि भारताची आहे. ज्ञानेश्वरांची विश्वात्मक देवाची संकल्पना मांडली. भिडे जो धर्म सांगतात तिथे विश्व कुठे आहे ? त्यांच्या विचारांशी हिंदू धर्माचा काही संबंध नाही. हिंदू धर्माच्या आडून ते वैदिक धर्माचा अजेंडा रेटत आहेत. आज शेतकरी मरत आहेत ते हिंदू नाहीत का ? या देशातील करोडो युवक बेरोजगार आहे तो हिंदू नाही का ? अनेक दलितांवर अत्याचार होत आहेत, लोकाना प्यायला पाणी नाही. हि सगळी लोकं हिंदू नाहीत का ? या लोकांसाठी काम करायला भिडेनी युवकांना प्रेरीत का केलेले नाही?
तरुणांनो वेळीच सावध व्हा तरुणांच्या आयुष्यातला उमेदीचा काळात या संघटनेत तरुण येतात. वयाच्या तिशीनंतर ते संघटनेपासून दुरावतात. आयुष्य उभारण्याचा जो काळ आहे, कर्तुत्वाचा जो काळ आहे या काळात त्यांचा वेळ वाया घालवला जातो. विशिष्ठ अजेंड्यासाठी त्यांना वापरले जाते. भरकटवले जाते. यानंतर डिप्रेशन येण्याची वेळ येते. मुलांचे करियर बरबाद होते. त्यामुळे करियर बरबाद होण्याच्या अगोदरच तरुणांनी वेळीच सावध होऊन चिकित्सा करणे गरजेचे आहे.